इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. साखळी फेरी जवळपास संपली आहे. लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. चालू हंगामात अनेक नवीन विक्रम नोंदवले गेले आहेत आणि काही जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. चालू हंगामात काही अशा घडामोडी पाहायला मिळाल्या, ज्या मागच्या एका दशकात देखील पाहिल्या गेल्या नव्हत्या. आपण या लेखात अशाच ५ गोष्टींचा विचार करणार आहोत, ज्या आयपीएलच्या मैदानात १० वर्षांनंतर घडल्या आहेत.
आयपीएलमध्ये एक दशक उलटल्यानंतर घडल्या आहेत ‘या’ गोष्टी ५.
आयपीएल २०११ नंतर डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर पहिल्यांदा खेळला गेला
आयपीएल सामना
आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील सर्व ७० सामने महाराष्ट्रात खेळले गेले. भारतातील कोरोना महामारीच्या कारणास्तव सर्व सामने पुणे आणि मुंबई स्थित चार स्टेडियमवर खेळवले गेले. या चार स्टेडियमपैकी एक होते मुंबईचे डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम. क्रिकेटप्रेमींना तब्बल १० वर्षानंतर या स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचा सामना पाहता आला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात पंजाब किंग्ज आणि पुणे वॉरियर्स यांचा सामना झाला होता, त्यानंतर थेट चालू हंगामात याठिकाणी आयपीएल सामन्याचे आयोजन केले गेले.
४. ख्रिस गेल आयपीएलमध्ये कोणत्याच संघाचा भाग नाहीये
आयपीएल २०११च्या मेगा लिलावात वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलला एकही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएलच्या या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये गेल या स्पर्धेत सहभागी नव्हता, पण नंतर आरसीबीने त्याला बदली खेळाडूच्या रूपात सहभागी केले. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर आता पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे, जेव्हा गेल या लीगमध्ये खेळत नाहीये. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात गेलने वैयक्तिक कारणास्तव सहभाग घेतला नव्हता.
३. आयपीएलमध्ये १० संघांचा सहभाग
आयपीएल २०२२मध्ये यावर्षी आठ ऐवजी १० संघ खेळत आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ यावर्षी स्पर्धेत सहभागी झाले. यापूर्वी आयपीएलच्या चौथ्या हंगामात देखील १० संघ एकत्र खेळले होते. त्या हंगामात कोची टस्कर्स केरला आणि पुणे वॉरियर्स या दोन संघांचा समावेश केला गेला होता. परंतु हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नव्हते. त्यांच्या तुलनेत लखनऊ आणि गुजरातने चालू हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान देखील पक्के केले आहे.
२. मिचेल मार्शला मिळाला सामनावीर पुरस्कार
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात पुणे वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल २०११च्या ५३व्या सामन्यात मार्शने डेक्कन चार्जर्सविरुद्ध केलेल्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते. या सामन्यात त्याने २५ धावा खर्च करून ४ महत्वापूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर थेट आयपीएल २०२२ मध्ये मार्शला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. चालू हंगामातील ५८वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. या सामन्यात मार्शने दिल्लीसाठी गोलंदाजीत दोन विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना ८९ धावा ठोकल्या. या उत्कृष्ट प्रदर्शानंतर तब्बल १० वर्षांपेक्षा अधिक काळानंतर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
१. मॅथ्यू वेडचा आयपीएलमध्ये सहभाग
ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त दोन हंगाम खेळला आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते. दिल्ली संघाने त्याला पदार्पणाची संधी दिली, पण त्याने तीन सामन्यांमध्ये अवघ्या ७.३३च्या सरासरीने २२ धावा केल्या. आयपीएल २०११नंतर झालेल्या मेगा लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर थेट आयपीएल २०२२ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेडने चालू हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ११६ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने ११४ धावा केल्या आहेत.