रॉयल चॅलेंजर बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जचा १३ धावांनी पराभव करत चेन्नईच्या प्ले ऑफच्या स्वप्नांवर जवळपास पाणी फिरवले. आरसीबीने ठेवलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १६० धावांपर्यंतच मजल मराता आली. चेन्नईकडून डेवॉन कॉनवॉयने ५६ धावांची झुंजार खेळी करत प्रतिकार केला. मात्र आरसीबीच्या फिरकी आणि वेगावान गोलंदाजांनी भेदक मारा करत सीएसकेला सातत्याने धक्के दिले. हर्षल पटेलने चांगला मारा करत ३ विकेट ३५ धावा देत घेतल्या, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आरसीबीकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक ४२ तर कर्णधार फाफ ड्युप्लेसिसिने ३८ धावा केल्या. त्यांना दिनेश कार्तिकने १७ चेंडूत २६ धावा चोपून चांगली साथ दिली.
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्ज समोर ठेवलेल्या १७४ धावांचा पाठलाग करताना सीएसकेच्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवॉय यांनी चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेनंतर शाहबाज अहमदने ऋतुराजला २८ धावांवर बाद केले. ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाने निराशा केली. तो अवघ्या १ धावेवर मॅक्सवेलची शिकार झाला. मॅक्सवेलने रॉबिन उथप्पाची शिकार केल्यानंतर सीएसकेचा अव्वल फलंदाज अंबाती रायुडूला देखील १० धावांवर माघारी धाडून चेन्नईला अजून एक मोठा धक्का दिला.
चेन्नईच्या फलंदाजीला गळती लागली असताना एका बाजूने चिवट फलंदाजी करत डेवॉन कॉनवॉयने अर्धशतक ठोकले होते. मात्र ३७ चेंडूत ५६ धावा करणाऱ्या कॉनवॉयला हसरंगाने १५ व्या षटकात बाद करत मोठा धक्का दिला. सीएसकेची अशी पडझड होत असताना मोईन अलीने एक बाजू सावरून धरली होती. मात्र रविंद्र जडेजाने ३ धावा करत त्याची साथ सोडली. दरम्यान, धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत चालले होते. जडेजा बाद झाल्यानंतर आलेल्या धोनी आणि मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षल पटेलने चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का दिला. त्याने २७ चेंडूत ३४ धावा करणाऱ्या मोईन अलीला बाद करत धोनीला एकटे पाडले. धावा आणि चेंडूमधील अंतर वाढत असतानाच जॉश हेजलवूडने महेंद्रसिंह धोनीला ३ धावांवर बाद करत चेन्नईच्या चेसमधील हवा काढून घेतली. अखेर चेन्नईला १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने सामना १३ धावांनी जिंकला.
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम आरसीबीला फलंदाजीला पाचारण केले. आरसीबीने आपल्या डावाची चांगली सुरूवात केली. सलामीला आलेल्या विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५७ धावा केल्या. मात्र त्यानंतर सीएसकेच्या संघात परतलेल्या मोईन अलीने आरसीबीला एका पाठोपाठ एक हादरे देण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा आक्रमक खेळणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसला (३८) बाद केले. मक्सवेल देखील ३ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर सावध फलंदाजी करत सेट होण्याचा प्रयत्न करणाऱ्या विराट कोहलीचा (३०) मोईन अलीने त्रिफळा उडवत आरसीबीला तिसरा धक्का दिला.
या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत महिपाल लोमरोर आणि रजत पाटीदार यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भागीदारी प्रेटोरियसने संपवली. त्याने पाटीदारला २१ धावांवर बाद केले. यानंतर लोमरोरने आक्रमक अवतार धारण करत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने संघाला दीडशतकी मजल मारून दिली. मात्र तिक्षाणाने आरसीबीला धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा २७ चेंडूत ४२ धावा करणाऱ्या महिपालला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात तिक्षाणाने हसरंगा (०) आणि शाहबाज अहमदला (१) बाद करत आरसीबीची अवस्था ७ बाद १५७ अशी केली. मात्र अखेरच्या षटकात दिनेश कार्तिकने पुन्हा आतशबाजी करत प्रेटोरियसच्या एकाच षटकात १६ धावा कुटल्या. याच जोरावर आरसीबीने १७३ धावांपर्यंत मजल मारली. कार्तिकने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.