इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे वळत आहे. स्पर्धेत आता २० पेक्षा कमी सामने बाकी आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच अंतिम सामन्याची ओढ लागली आहे. आयपीएल २०२२ हंगामतील अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान आता असे समोर येत आहे की, यंदा आयपीएलचा समारोप समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार या सोहळ्यात ऑस्कर विजेता संगतीकार आणि गायक एआर रेहमान आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंग परफॉर्म करणार आहेत. दरम्यान, अद्याप समारोप समारंभाचे पूर्ण तपशिल तयार होत आहे. गेले तीन वर्षे आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळा आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता. पण यावेळी समारोप सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (बीसीसीआय) भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त समारोप समारंभात कार्यक्रम आयोजित करणार असल्याचीही चर्चा आहे. सध्या भारतीय सरकार ‘आजादी का अमृत महोत्सव’ नावाने अनेक कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यानुसार बीसीसीआय देखील भारतीय क्रिकेटचा इतिहास आयपीएलच्या समारोप समारंभातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच असेही समोर येत आहे की, भारताच्या माजी कर्णधारांना देखील या सोहळ्यासाठी पाहूणे म्हणून बोलावले जाऊ शकते.
बीसीसीआयने याआधी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना २९ मे रोजी शानदार समारोप समारंभ आयोजित करण्यासाठी बोली लावण्याची विनंती केली होती. बीसीसीआयला यंदाचा आयपीएल समारोप खास बनवायचा आहे. कारण गेले दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल सर्वाधिक भारताबाहेर खेळले गेले. २०२० सालचा हंगाम संपूर्णपणे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला गेला, तर २०२१ हंगामातील सुरुवातीचे काही सामने भारतात झाले, नंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले. पण, त्यानंतर आता २०२२ आयपीएल हंगाम पूर्णपणे भारतात होत आहे.
आयपीएल २०२२ मधील प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद या दोन ठिकाणी होणार आहेत. प्लेऑफला २४ मे पासून सुरुवात होईल. क्लालिफायर १ आणि एलिमिनेटर हे दोन सामने अनुक्रमे २४ आणि २५ मे रोजी कोलकाता येथे होणार आहेत, तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना अनुक्रमे २७ आणि २९ मे रोजी अहमदाबादला होणार आहे.