आयपीएल २०२२ मधील अंतिम संघ निश्चित झाले आहेत. २९ मे रोजी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. गुजरातने पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. या मोठ्या सामन्यापूर्वी या हंगामात कोणत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल हे जाणून घ्या.
आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबी खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले. मात्र, पराभव होऊनही या संघावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हंगाम संपवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेत्रदीपक आयपीएल हंगामासाठी आरसीबीला ७ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यात ६.५० कोटी रुपये जमा होतील.
आयपीएल १५ चा अंतिम सामना उद्या, रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. रात्री आठ वाजल्यापासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची ऑनलाईन तिकिटे काही तासांतच संपली. ज्यांना तिकिटे उपलब्ध होऊ शकली नाहीत, ते ब्लॅकमध्ये तिकीट घेण्याची तयारी दाखवीत आहेत. यासाठी नऊपट अधिक रक्कम मोजण्याचीदेखील अनेकांची तयारी दिसते. एका बाजूला खेळाडू मालामाल आणि प्रेक्षक कंगाल अशी परिस्थिती ओढवली आहे. सर्वांत स्वस्त तिकीट ८०० चे आहे. त्यासाठी आता आठ हजार, तर १५०० च्या तिकिटासाठी १५ हजार मोजावे लागतील. एक लाख ३२ हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम खच्चून भरण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. फायनलआधी ५० मिनिटांचा मनोरंजन सोहळा होणार आहे. त्यासाठी ए. आर. रहमान, नेहा कक्कड आणि रणवीरसिंग सारखे ३०० कलावंत उपस्थिती दर्शवतील.
हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल १५ चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १३ कोटी मिळतील. याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस रक्कम दिली जाईल. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तथापि लीग टप्प्यात बाहेर पडलेल्या संघांना किती रक्कम मिळेल याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
२००८ मध्ये विजेत्या संघाला किती मिळाले
आयपीएलचा पहिला सीझन २००८ मध्ये खेळला गेला, त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी राजस्थान संघाला ४.८ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिल्लई होती. त्यांनतर ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली, तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आणि आज जेतेपद पटकावणाऱ्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.