आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी: निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे

आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी: निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे


अहमदनगर10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरता बांधले गेले आहे. या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असून पिके वाया गेली. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे धरण कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारकडे बुधवारी केली.

Advertisement

निळवंडे कालव्यांमधून पाणी सोडण्याबाबत आग्रही मागणी करताना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार थोरात म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत कमी पावसामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भाग उद्ध्वस्त झाला. अशा दुष्काळी परिस्थितीत सरकारने काळजी म्हणून बैठका घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न, रोजगार याबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यातील जनतेला दिलासा दिला पाहिजे.

मात्र असे काहीही होताना दिसत नाही. निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांकरिता निर्माण केले. अनेक अडचणीवर मात करून आपण धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. यावर्षी उन्हाळ्यात भंडारदरा व निळवंडे धरण मिळून दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. अशावेळी कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी सोडण्याची मागणी आपण सरकारकडे केली होती. या मागणीनंतर सरकारने केवळ चाचणीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडले. अवघ्या काही दिवसात पाणी सोडणे बंद केले. त्यावेळेस अजून काही दिवस पाणी सुरू राहिले असते, तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता.

Advertisement

आता सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे. याचबरोबर उजव्या कालव्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून त्या कालव्यातूनही पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी करत आहोत. निळवंडेच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कोणताही विलंब न करता पाणी सोडावे. यासाठी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला दिला.

शेतकऱ्यांना मदत मिळावी

Advertisement

राज्यासह नगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणीही माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.Source link

Advertisement