मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होता; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. याप्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया देत ही फाइल पुन्हा उघडली जाईल, असा इशारा दिला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, शिंदे आज मविआवर खापर फोडत असले तरी त्यांचाही तेव्हा सरकारमध्ये सहभाग होता हे विशेष.
पटोले म्हणाले, सत्तेच्या जोरावर भाजपने ही फाइल बंद केली असली तरी भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ही फाइल पुन्हा उघडली जाईल. माझ्यासह भाजपतील नेत्यांचेही फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केले होते. त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला होता, पण कोर्टाने अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. शिंदे-फडणवीस सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले व सीबीआयने हे प्रकरण बंद केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टने हे सिद्ध केले आहे की याप्रकरणी आरोपीला वाचवण्यात आले आहे. यामुळेच आता सीबीआयवर देशातील जनतेचा विश्वास राहिलेला नाही.
आता दूध का दूध पानी का पानी झाले : मुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या प्रकरणात अटक करून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टने ‘दूध का दूध पानी का पानी’ झाले आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केले जात होते त्यांनाही क्लीन चिट मिळाली आहे. यावरून पूर्वीच्या मविआच्या सरकारमध्ये सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे सिद्ध झाले आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात भाजप नेते गिरीश महाजन, महिला खासदार नवनीत राणा, अभिनेत्री कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांवर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावरून त्या वेळी मोठ्या प्रमाणात राजकारण रंगले होते. आता पुन्हा एकदा याच विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “तू तू-मैं मैं’ सुरू असल्याचे दिसत आहे.
रश्मी शुक्लांचे फोन टॅपिंग प्रकरण नेमके काय?
मार्च २०२१ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता. यासोबतच त्यांनी पुरावा म्हणून पेनड्राइव्हही दिला होता. यामध्ये अनेक अधिकारी आणि नेत्यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग होत्या. २६ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण १९ ऑगस्ट २०२२ रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीबीआयने मे २०२३ मध्येच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. २१ ऑगस्ट २०२३ रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयवंत सी. यादव यांनी हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.