आप ‘कतार’में हैं.. | The first World Cup in the Arab West Asia Football season in Europe amy 95

आप ‘कतार’में हैं.. | The first World Cup in the Arab West Asia Football season in Europe amy 95सिद्धार्थ खांडेकर

Advertisement

पश्चिम आशियातला, अरब विश्वातला हा पहिलाच विश्वचषक. पण त्याचे वैशिष्टय़ केवळ भौगोलिक नाही. या स्पर्धेच्या नऊ दशकांच्या प्रदीर्घ इतिहासात यंदा ती प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे युरोपातील फुटबॉल हंगामाच्या ऐन मध्यावर खेळवली जात आहे. या स्पर्धेची लोकप्रियता वैश्विक असली, तरी युरोप आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांबाहेर या स्पर्धेला विजेता लाभू शकलेला नाही. यंदाच्या स्पर्धेत हा इतिहास पुन्हा घडणार की नवा जगज्जेता लाभणार? या स्पर्धेचे कुतूहलशमन करणारा लेख..

‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ असं रास्त नामाभिधान झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला येत्या रविवारी (२० नोव्हेंबर) कतारमध्ये सुरुवात होत आहे. पश्चिम आशियातला, अरब विश्वातला हा पहिलाच विश्वचषक. पण त्याचे वैशिष्टय़ केवळ भौगोलिक नाही. या स्पर्धेच्या नऊ दशकांच्या प्रदीर्घ इतिहासात यंदा ती प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे युरोपातील फुटबॉल हंगामाच्या ऐन मध्यावर खेळवली जात आहे. कतारला विश्वचषक स्पर्धा बहाल केली गेली, त्यावेळी या मुद्दय़ावर जोरदार आक्षेप घेतला गेला होता. उष्ण हवामानाच्या या देशात जून-जुलै या विश्वचषकाच्या नेहमीच्या महिन्यांमध्ये ही स्पर्धा भरवणे हा खेळाडूंच्या जिवाशी खेळ ठरला असता. कारण ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असताना कोणताही खेळाडू एका मर्यादेपलीकडे मैदानावर पळापळ करूच शकत नाही. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरचा पर्याय आला, कारण त्या काळात कतारमधील तापमान तुलनेने सौम्य असते. ‘तुलनेने सौम्य’ म्हणजे किती? ‘अल जझीरा’ या कतारी वृत्तवाहिनीच्या मते ३५-४० अंश सेल्सिअस सरासरी. या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अनेकदा तापमान ४० अंशांच्या वर गेले, तेव्हा खेळ थांबवावा लागला होता. ब्राझीलमध्ये २०१४ मध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान काही सामन्यांमध्ये पाच मिनिटांचा पाणीविराम घेण्यात आला होता, कारण आसमंतातील तापमान फुटबॉलपटूंच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकेल, इतक्या प्रमाणात उच्च होते. कतारमध्ये परिस्थिती याहीपेक्षा आव्हानात्मक राहणार आहे. सगळेच सामने काही सायंकाळी किंवा त्यानंतर खेळवले जाऊ शकत नाहीत. काही काही सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजताही सुरू होताहेत. परंतु या समस्येवर वातानुकूलित मैदानांचा उपाय कतार सरकारने योजिला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फुटबॉल मैदाने वातानुकूलित असतील. त्यासाठी कतार विद्यापीठाकडून खास संशोधन करून मोठाले एअर कूलर्स बसवण्यात येत आहेत. प्रेक्षकांसाठी स्टँडमध्ये आणि खेळाडूंसाठी मैदानावर स्वतंत्र वातानुकूलन यंत्रणा राहील. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सौद अब्दुलअझीझ अब्दुल घनी यांना तेथे मिस्टर कूल म्हणून संबोधण्यात येते. मिस्टर कूल यांना सर्व मैदानांवरील वातानुकूलन यंत्रणांविषयी विश्वास आहे. ‘केवळ थंड हवाच नव्हे, तर शुद्ध हवादेखील मैदानातील सर्वाना पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील’, असा मिस्टर कूल यांचा दावा. या सगळय़ा व्यवस्थेच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या प्रत्यक्ष सामन्यादरम्यान कशा प्रकारे काम करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील.

Advertisement

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अंदाजे १३ लाख फुटबॉलरसिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी, तसेच फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक, सहायक कतारमध्ये दाखल होत आहेत. ही संख्या कतारच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी आहे. त्यांच्यासाठी आवश्यक निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था, करमणूकव्यवस्था पुरेशी असेल का, याविषयी कतारमधील कोणीही खात्रीलायक सांगू शकत नाही. इतक्या प्रचंड लोंढय़ाच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी कतारने संयुक्त अरब अमिरातींची मदत घेतलेली आहे. हे फुटबॉलप्रेमी यूएईच्या दृष्टीने फुटबॉल पर्यटकच. दुबई आणि अबूधाबी या दोन्ही अमिरातींच्या तुलनेत कतार अधिक सधन असला तरी चिमुकला आहे. आजवर इतक्या चिमुकल्या देशाने एकटय़ाने विश्वचषकासारख्या महास्पर्धेचे आयोजन केल्याचे दुसरे उदाहरण नाही.

एक बंदिस्त क्लब?
१९३४ मध्ये इटली आणि २०२२ मध्ये कतार यांच्यात साम्य काय? दोन्ही देशांना एकही विश्वचषक स्पर्धा न खेळता यजमानपद लाभले, हे! फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ खरा, परंतु या खेळाचा मेरुमणी ठरलेली विश्वचषक स्पर्धा मात्र बंदिस्त म्हणावी अशीच. आजघडीला दोनशेहून देश या खेळाच्या नियोजन-परिचालनाची जबाबदारी असलेल्या ‘फिफा’ या संघटनेचे सदस्य आहेत. इतक्या संख्येने बहुधा संयुक्त राष्ट्रांचेही सदस्य देश नसतील. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात १९३० मध्ये उरुग्वेत झाली. आजवर २१ विश्वचषक स्पर्धा झाल्या. अपवाद १९४२ आणि १९४६ या वर्षांचा. त्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामुळे स्पर्धेच्या आयोजनात खंड पडला. २१ स्पर्धा झाल्या, त्यांमध्ये आजवर खेळलेले देश आहेत ७९. यजमानपदाचा मान मिळाला केवळ १७ देशांना. ब्राझील, फ्रान्स, इटली, जर्मनी, मेक्सिको यांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा भरवून दाखवली. तर उरुग्वे, स्वित्र्झलड, स्वीडन, चिली, इंग्लंड, अर्जेटिना, स्पेन, अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया (संयुक्तपणे), दक्षिण आफ्रिका, रशिया यांनी प्रत्येकी एकेकदा ही स्पर्धा भरवली. पुढील विश्वचषक स्पर्धा (२०२६) अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे संयुक्तपणे भरवत आहेत. आशियात पहिल्यांदा स्पर्धा झाली, त्यावेळी जपान आणि दक्षिण कोरिया या तगडय़ा अर्थव्यवस्थांना ती एकटय़ाने भरवणे झेपले नाही. पुढील खेपेला अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांनाही संयुक्त यजमानपदाच्या मार्गाने जावे लागत आहे. अशा वेळी कतारसारख्या देशाने एकटय़ाने हा भार उचलला कसा, त्याला यजमानपद बहाल करण्याचे धाडस ‘फिफा’ने दाखवले कसे, याविषयी उत्सुकता उमटतेच. जितक्या देशांना यजमानपद लाभले, त्याच्या निम्म्याहूनही कमी देशांना ही स्पर्धा आजवर जिंकता आली. ते देश आहेत केवळ आठ. ब्राझील (५ वेळा), जर्मनी व इटली (प्रत्येकी ४ वेळा), उरुग्वे, अर्जेटिना व फ्रान्स (प्रत्येकी २ वेळा), इंग्लंड व स्पेन (एकेकदा).. निव्वळ उपविजेते ठरलेलेही मोजकेच. नेदरलँड्स (३ वेळा), तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी (प्रत्येकी २ वेळा), स्वीडन व क्रोएशिया (एकेकदा). म्हणजे १३ देशांव्यतिरिक्त कोणत्याही संघाला अंतिम फेरीपर्यंतही पोहोचता आलेले नाही. विश्वचषक फुटबॉल स्पर्धा हा त्यामुळे एका अर्थी ‘एलिटिस्ट क्लब’च ठरतो.

Advertisement

यजमानपदासाठी काहीही..
यजमानपदाबाबत आणखी एक मुद्दा. गतशतकात ही स्पर्धा केवळ युरोप आणि अमेरिका खंडांमध्येच भरवली जात होती. नवीन सहस्रकात या पॅटर्नमध्ये बदल होत गेले. प्रथम आशिया (जपान-कोरिया २००२), मग आफ्रिका (द. आफ्रिका २०१०), नंतर पूर्व युरोप (रशिया २०१८) असा प्रवास करत आता कतार २०२२च्या निमित्ताने ही स्पर्धा पश्चिम आशियात होत आहे. हे सीमोल्लंघन स्वागतार्ह असेच. या सीमोल्लंघनाचे प्रेरणास्रोत होते फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर. विश्वचषक स्पर्धेने नवी क्षितिजे ओलांडली पाहिजेत, या मताचे ते होते. पण त्यासाठी जे भले-बुरे मार्ग त्यांनी अवलंबले, त्यातून त्यांनाच भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगवास घडला हेही वास्तव. आता हेच महाशय कतारला यजमानपद बहाल करणे ही चूकच होती, असेही नुकतेच म्हणते झाले. रशिया आणि कतारला अनुक्रमे २०१८ आणि २०२२ या स्पर्धाचे यजमानपद बहाल करण्याचा फार्स फुटबॉल जगतासाठी – विशेषत: पाश्चिमात्य फुटबॉल जगतासाठी धक्कादायक ठरला होता. पायाभूत सुविधा आणि पूर्वेतिहास या दोन निकषांवर निभाव लागणार नाही याविषयी खात्री असल्यामुळे, सदस्य देशांच्या प्रतिनिधींची मते विकत घेणे एवढा एकच मार्ग होता. तो अत्यानंदाने स्वीकारला गेला, कारण त्यावेळी तेलदांडगे आणि म्हणून धनदांडगे असलेल्या या दोन्ही देशांना यजमानपद पदरात पाडण्यासाठी थैल्या रित्या करण्यात काहीच वाटले नाही. क्रिमियापश्चात चालून गेले, तरी रशियाला युक्रेन आक्रमणापश्चात ही स्पर्धा भरवणे शक्यच झाले नसते. दोन्ही देशांचे मानवी हक्कांच्या मुद्दय़ावरील प्रगतीपुस्तक दिव्य होते. तरीही युरोपातच मुख्यालय आणि युरोपिय पुढारलेल्या जगातील पदाधिकारी असलेल्या फिफाने यजमानपद त्यांना बहाल केलेच. हा विरोधाभास हे फुटबॉल विश्वचषकाचे नवीन वास्तव बनत चालले आहे. एकतर ही अत्यंत महागडी स्पर्धा भरवण्याची ताकद फार देशांमध्ये नाही. भविष्यात चीन, सौदी अरेबिया, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि कदाचित भारत या देशांना यजमानपद आर्थिकदृष्टय़ा पेलवू शकते. परंतु यांतील बहुतेक देश फुटबॉलमधील गुणवत्तेच्या बाबतीत बऱ्यापैकी सुमार म्हणावे असेच. त्यात सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेत अधूनमधून दिसत असले, तरी पात्रता फेरी सुरू झाल्यापासून भारत या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या आसपासही पोहोचू शकलेला नाही. १९५०मधील विश्वचषक स्पर्धेसाठी भारत निमंत्रित होता, कारण त्या काळात पात्रता फेरीच नसायची. आपली अर्थव्यवस्था आणि फुटबॉलमधील प्रगती यांचा वेध घेतला असता, कतारप्रमाणे बहुधा आर्थिक ताकदीवर यजमान बनूनच या स्पर्धेत शिरकाव करण्याची शक्यता आपल्यासाठी अधिक वास्तव दिसते.

यंदा विजेता कोण?
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची लोकप्रियता वैश्विक असली, तरी युरोप आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांबाहेर या स्पर्धेला विजेता लाभू शकलेला नाही. आफ्रिकी देशांनी गेल्या काही स्पर्धामध्ये चमक दाखवली खरी, तरी तेव्हा आणि आजही त्यांची गणना संभाव्य विजेत्यांमध्ये होत नाही. यंदाच्या स्पर्धेत नवीन विजेता उद्भवण्याची शक्यता तशी धूसरच. आजवर स्पर्धा न जिंकलेल्यांपैकी नेदरलँड्स आणि बेल्जियम या दोनच देशांमध्ये यंदा ही स्पर्धा जिंकण्याची क्षमता दिसते. परंतु दोन्ही युरोपिय देश आहेत आणि कतारची हवा (वातानुकूलन वगैरे काहीही असले तरी) त्यांना फारशी मानवणारी नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अर्जेटिना, उरुग्वे आणि ब्राझील या तिन्ही माजी विजेत्या दक्षिण अमेरिकी देशांनी गेल्या काही वर्षांतील मरगळ झटकली असून, ते पुन्हा महत्त्वाच्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करू लागले आहेत. हे तीन देश, नेदरलँड्स, बेल्जियम, तसेच फ्रान्स, इंग्लंड, काही प्रमाणात स्पेन यांची नावे दावेदारांमध्ये समाविष्ट करता येतील. माजी विजेता इटली यंदा पात्रच ठरला नाही, तर जर्मनी पुनर्बाधणीच्या प्रक्रियेत असल्यामुळे संधी कमी दिसते. बहुतेक आघाडीच्या संघांतील फुटबॉलपटू युरोपातील क्लबांमध्ये खेळत असल्यामुळे, ऐन हंगामाच्या मध्यावर प्राधान्य कशाला द्यायचे – रोजंदारीला की देशाकडून खेळण्याला – या द्वंद्वाचा सामना ही मंडळी स्वतंत्रपणे करत असतील. तोवर मद्य संस्कृती, मुक्त संस्कृती हे आजवरच्या स्पर्धाचे अविभाज्य अंग असलेल्या छंदांना फाटा देणे स्पर्धास्थळी गेलेल्या फुटबॉलरसिकांसाठी क्रमप्राप्त आहे. येथे बंदिस्त केवळ फुटबॉल मैदानेच नाहीत तर यजमानांचे नियमही आहेत. कारण आप ‘कतार’में है!

Advertisement

siddharth.handekar@expressindia.com

Source link

Advertisement