अमरावती/रवींद्र लाखोडे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अमरावती जिल्ह्यातील ४८२ गावांना पुराचा धोका आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या गावांजवळून वाहणाऱ्या नद्या तेथील गावकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.
घनदाट जंगलाने व्यापलेल्या मेळघाटातील काही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे तेथील जनजीवन शाबूत ठेवण्यासाठीच्या उपाययोजनाही आखाव्या लागणार आहेत.
मेळघाटात तुटतो १५ गावांचा संपर्क
सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९८५ गावांपैकी पूरप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या ४८२ गावांकडे सर्व यंत्रणांचे लक्ष वेधले आहे. मेळघाटातील तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या मते पावसाळ्याच्या दिवसांत धारणी व चिखलदरा तालुक्यातील किमान १५ गावांचा संपर्क तुटतो.
कच्चे व नागमोडी रस्ते, मधोमध वाहणारे काही मोठे नाले आणि सर्वत्र घनदाट जंगल व वन्यप्राण्यांचा संभाव्य धोका यामुळे एका गावाहून किंवा तालुक्याच्या ठिकाणाहून पल्याडच्या गावी जाता येत नाही. त्यामुळे तेथे अन्न-धान्य आणि औषधींचा साठा आधीच करुन ठेवावा लागतो.
रस्ते दुरुस्त करुन गावांचा संपर्क कायम राखणे शक्य आहे. मात्र मेळघाटमध्ये कोणतीही सुधारणा करण्यासाठी वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक असते. माणसांपेक्षा प्राण्यांची व जंगलाची काळजी अधिक घ्यावी, अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात असल्यामुळे तेथील काही भागात पक्के रस्तेही बांधता येत नाहीत. जुजबी दुरुस्ती करण्यापलीकडे प्रशासनाला फार काही करता येत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे तेथील रस्ते चिखलमय होणे, पावसाळ्याच्या दिवसांत गावांचा संपर्क तुटणे आणि नागरिकांनी त्रास भोगणे हे दुष्टचक्र सुरुच आहे.
आपत्तीस कारण ठरणाऱ्या ‘या’ आहेत नद्या
अमरावती तालुका – पेढी नदी व भिवापुरकर तलाव,तिवसा तालुका – वर्धा व सूर्यगंगा नदी, भातकुली – पूर्णा व पेढी नदी आणि पूर्णा धरण, दर्यापुर – चंद्रभागा व पूर्णा नदी आणि पूर्णा धरण,अंजनगाव – शहानूर धरण व भुलेश्वरी नदी, अचलपूर – चंद्रभागा व सापन धरण, सापन नदी, चांदूरबाजार – पूर्णा धरण व पूर्णा नदी, चांदूर रेल्वे – मालखेड व बासलापुर धरण, धामणगाव रेल्वे – वर्धा, विदर्भा व चंद्रभागा नदी, नांदगाव खंडे. – बेंबळा नदी, मोर्शी – माडू व नळ-दमयंती नदी, अप्पर वर्धा धरण, वरुड – वर्धा व चुडामन नदी, धारणी – सिपना व गडगा नदी