अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
दिवसेंदिवस हायटेक होत असलेल्या अमरावतीच्या गणेशोत्सवात यावर्षी गोवर्धन पर्वत उचललेल्या ३० फूट उंच श्रीकृष्ण मुर्तीचा देखावा पहायला मिळणार आहे. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणारे हे गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन देखावे सादर करीत असते. या क्रमात यावर्षी स्वामी चक्रधर यांच्या अष्टजन्मशताब्दीमुळे गोवर्धन पर्वताचा देखावा सादर केला जात असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले व उपाध्यक्ष माजी खासदार अनंतराव गुढे यांनी आज, शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
आझाद हिंद मंडळाच्या हरिभाऊ कलोती स्मारकात पार पडलेल्या माध्यम संवादात ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार शिवा प्रजापती आणि त्यांचे सहकारी गेल्या दोन महिन्यापासून देखाव्याचे काम करीत आहे. याशिवाय अकोला येथील गुलाब डेकोरेशनची आकर्षक रोषणाई आणि येथील प्रसिद्ध मुर्तीकार गजानन सोनसळे यांनी तयार केलेली बाप्पांची मुर्ती हे यावर्षीचे विशेष आकर्षण राहणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मंडळाच्या प्रांगणातून श्रींची शोभायात्राही काढली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिंडी, पालखी, लेझीम, शंभर मुलींचे टिपरी नृत्य, पाऊली भजन व शारीरिक कवायतींसह ढोल पथकाचा समावेश असलेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरुन परिक्रमा करेल. त्यानंतर पुन्हा परत मंडळाच्या प्रांगणातच या शोभायात्रेचा समारोप केला जाईल.
पत्रकार परिषदेला मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. किशोर फुले, सचिव दिलीप दाभाडे, इतर पदाधिकारी दिलीप कलोती, चंदूभाऊ पवार, विवेक कलोती, किशोर बोराटणे, भूषण पुसतकर, शरद गढिकर, संजय मुचळंबे, गणेशोत्सवाचे अध्यक्ष विजय भुतडा, स्वागताध्यक्ष सुभाष पावडे, कार्याध्यक्ष अॅड. ब्रजेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
२७ ला अनुप जलोटा यांची भजन संध्या
२० सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून २३ ला सायंकाळी श्री कृष्ण भजन संध्या तर २४ ला सायंकाळी स्वर बहार हा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम घेतला जाईल. दरम्यान २५ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाणार असून २७ ला प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजन संध्येचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २८ सप्टेंबरला सायंकाळी श्री च्या मुर्तीचे विसर्जन केले जाईल.