सिल्लोडएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- महिला बचत गटांनीही लावले गणपती मूर्तीचे स्टॉल
आज गणरायाचे आगमन होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र गणेशमूर्ती स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. गावोगावी गणेश मंडळे, घरगुती गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी जमली होती. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. दरम्यान, जनतेमध्ये पर्यावरणाची जागृती झाल्याने शाडू मातीच्या गणपतींना लोक प्राधान्य देत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त सिल्लोड शहरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसून येत आहे. शहरातील शिक्षकनगरलगत असलेल्या मोकळ्या मैदानावर यंदा गणेशमूर्ती विक्री व सजावट साहित्याची दुकाने बसवण्यात आली आहेत. मोकळी जागा असल्यामुळे यंदा गणेशमूर्ती विक्रीची दुकाने वाढलेली असून रायगड, रत्नागिरी, पेण आदी मोठ्या शहरांसह तालुक्यातील भराडी, घाटनांद्रा, शिंदेफळ, आमठाणा, शिवना, अजिंठा आदी ठिकाणच्या मूर्ती व्यावसायिकांनी आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटामार्फत गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. आई-वडिलांसोबत येणाऱ्या बालगोपाळांच्या आग्रहास्तव मातीच्या मूर्ती विकत घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. यंदा गणेशमूर्तीच्या किमती मागील वर्षीसारख्याच स्थिर असून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विक्रीसाठी आलेल्या असल्याने नागरिकांना आकर्षक मूर्ती घेता येत आहेत.
नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी न करता शाडू मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीची खरेदी करावी व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, यासाठी आपले योगदान द्यावे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी प्रसाद सुनील राऊत याने दिली आहे.