जळगाव20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट असताना हवामान विभागाने जळगावसह चार जिल्ह्यांत गुरुवारी गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. या अलर्टमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश असून, गारपिटीमुळे रब्बीतील शेतमालाच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शहरात बुधवारी रात्री ८.३० ते ९.२० वाजता वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाचा शिडकावा झाला.
साेमवारपासून जिल्ह्यावर पुन्हा अवकाळी पावसाच्या ढगांची चादर आेढली गेली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १६ मार्च राेजी जळगावसह छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात वादळासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १७ मार्च राेजी राज्यभर अवकाळी पाऊस पडू शकताे. त्यानंतर मात्र अवकाळी पावसाचे ढग निवाळून उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.
तापमानात माेठ्या प्रमाणात घट : अवकाळी पावसाच्या ढगांमुळे जिल्ह्यात तापमान व उन्हाची तीव्रता घटली आहे. आर्द्रता वाढल्याने उकाडा मात्र कायम आहे. बुधवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअसवर हाेते. मार्च महिन्यातील पहिला पंधरवडा ढगांच्या छायेत गेल्याने मार्चहीटची तीव्रता कमी झाली हाेती. पुढील आणखी ५ दिवस राज्यावर ढगांची छाया कायम राहणार आहे. त्यामुळे तापमान मार्च महिन्यातील सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी राहणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
वादळाने शहर अंधारात
बुधवारी रात्री ९.२० वाजता वादळासह तुरळक पाऊस पडला. त्यामुळे शिवाजीनगर, योगेश्वरनगर, पिंप्राळा परिसर, आदर्शनगर, खोटेनगर, महाबळ परिसर, एमजे कॉलेज परिसर, नवीपेठ, शिव कॉलनी, कोल्हेनगर, रामानंदनगर, आशाबाबानगर, रामेश्वर कॉलनी, तांबापुरा परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. मात्र, वादळ थांबल्याने २० मिनिटांत अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत झाला.