हिंगोलीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज मंदिर संस्थान मध्ये सोमवारी तारीख 18 झालेल्या बैठकीत आमदार तानाजी मुटकुळे व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये झालेली ‘तू तू मै मै’ तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. नर्सी येथे मागील काही वर्षांपासून मंदिर संस्थान व मंदिर जिर्णोद्धार समिती मध्ये वाद सुरू आहे. आज संस्थानचे प्रसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार नवनाथ वागवाड यांच्या उपस्थितीत मंदिरात दोन समित्यांच्या विश्वस्त व पदाधिकारी यांची बैठक झाली.
यावेळी मंदिर संस्थांच्या जीर्णोद्धार समितीने पावत्या फाडाव्यात अशी भूमिका या समितीने घेतली. मात्र मंदिराचे बांधकाम झाले असून मंदिर बांधकामासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंदिर जिर्णोद्धार समितीची स्थापना करण्यात आली होती. तर सोयी सुविधा व मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी येथे धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मंदिर संस्थानची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे संस्थांनी पावत्या फाडाव्यात अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली. यातून जीर्णोद्धार समिती व मंदिर संस्थान पदाधिकाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले. यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे व माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली.
यावेळी संस्थांनचे सचिव व्दारकादास सारडा विश्वस्त सुभाष हुले,भागवत सोळंके, मनोज आखरे,राहुल नाईक,रमेश महाराज मगर, अंबादास गाडे,आदी उपस्थित सदस्य अवाक् झाले. तर जिर्णोद्धार समितीचे माधवराव पवार,गिरीष वरूडकर, नारायण खेडकर,के के शिंदे यांनीही त्यांची बाजू लावून धरली.
दरम्यान वाद वाढत गेल्यानंतर तहसीलदार वाघवाड यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर दोन्ही बाजूंचा तणाव निवळला व बैठक पार पडली. यावेळी जिर्णोद्धार समितीच्या पावत्या फाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बैठकीत झालेला वाद जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत आमदार मुटकुळे व माजी आमदार गोरेगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.
वाद झाल्याचा प्रकार खरा : तहसीलदार नवनाथ वागवाड
नरसी येथे संस्थांच्या बैठकीमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. जीर्णोद्धार समितीच्या पावत्या फाडाव्या की संस्थांच्या पावत्या फाडाव्यात यावरून हा वाद झाला. मात्र काही वेळातच हा वाद मिटला. जिर्णोद्धार समितीने पावत्या फाडून मंदिराचे बांधकाम तातडीने पूर्णकरून मंदिर संस्थान कडे द्यावे असेही ठरले आहे.