आचार्य अत्रे: ‘विनोदाचा’ जन्म

स. का. पाटील हे संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक तर अत्रे हे खंदे समर्थक, इतके कि संयुक्त महाराष्ट्र शक्य झाला तो त्यांच्यामुळे असे मानले जाते तर हा त्यांचा किस्सा. स.का पाटलांवर टीका करण्याची एकही संधी अत्रे सोडत नसत. मुंबई हि महाराष्ट्राला मिळणार नाही अस ते वारंवार ठामपणे म्हणत त्यामुळे अत्र्यांचा त्यांच्यावर राग होता. एका सभेत बोलतांना, “दोन चांगल्या गोष्टीत एक वाईट गोष्ट घडते,” असे सांगून ते म्हणाले, ’१३ ऑगस्ट ला माझा जन्म झाला, १५ ऑगस्ट ला भारताला स्वातंत्र्य मिळाले या दोन चांगल्या गोष्टी झाल्या, पण १४ ऑगस्ट ला स. का. पाटील जन्माला आले.” असे विनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला. 

एक क्षेत्र असं आचार्य अत्र्यांच्या बाबतीत सांगता येत नाही, जेही त्यांनी हाती घेतलं त्याला त्यांनी अत्युत्तम केलं. ‘रायटर एन्ड फायटर ऑफ महाराष्ट्रा’ अस भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आचार्य अत्रे याचं वर्णन केले आहे. पुणे व लंडन इथे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं. भारतात परतण्यापूर्वी हरो येथे त्यांनी अध्यापन केले, व पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटी च्या शाळेत ते अध्यापन करत व नंतर तेथेच मुख्याध्यापक झाले आणि आचार्य हे बिरूद प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नावामागे लागले ते कायमचेच पण या व्यतिरिक्तही शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची कारकीर्द बरीच मोठी आहे. नवयुग मधील लेख, शालेय अभ्यासक्रमातील ‘झेंडूची फुले’ मधील  कविता आणि ‘दिनुच बिल’ सारख्या कथा ह्या पाठ्यपुस्तकाचा भाग बनल्या. 

Advertisement

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण २२ नाटके लिहिली, ‘साष्टांग नमस्कार’, ‘मोरूची मावशी’, ‘लग्नाची बेडी’,  ‘भ्रमाचा भोपळा’, हि त्यांची निखळ आनंद देणारी नाटकं. तर ‘तो मी नव्हेच’ हे उत्कंठा वाढवणारे नाटक. विनोद प्रधान नाटकांची नवी परंपरा त्यांनी घातली. मराठी विनोदाचा पाया रचणाऱ्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी त्यांचे शिष्य म्हणजे आचार्य अत्रे.. पुलं व अत्रे हि महाराष्ट्राच्या चतुरस्त्र व्यक्तित्वाची नाव, एक निखळ विनोद तर एकाच्या हातात विनोदाचं अस्त्र होत. महाराष्ट्राची विनोदाची हि वैभवशाली परंपरा.

चित्रपट क्षेत्रातही अत्रे यांची प्रदीर्घ कारकीर्द होती ‘ब्रान्डीची बाटली’, ‘पायाची दासी’, ‘धर्मवीर’, ‘ब्रम्हचारी’ हे काही उल्लेखनीय चित्रपट. अत्रे पिक्चर्स च्या निर्मिती नंतर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले व या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर- राष्ट्रपतींचे सुवर्णपदक लाभले. विनोद आणि सामाजिक आशय यांची सांगड मात्र अत्रेंचा दुर्मिळ गुण. आज विनोदाच्या नावावरील थिल्लरपणा आणि सामाजिक आशय म्हटल कि फक्त गंभीर आणि रडके चेहरे असे जे पाहायला मिळत त्या पार्श्वभूमीवर अत्रे यांचे साहित्य व कार्य खूप मोलाचे ठरते. 

Advertisement

पत्रकारिता हि देखील आचार्य अत्रे यांची ओळख. ‘नवयुग’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले. कालांतराने त्यांनी ‘दै. मराठा’ हे वृत्तपत्र सुरु केले त्यांचे अग्रलेख हा त्याचा गाभा होता. त्याला विविध विषयांवर परखडपणे, मार्मिक कधी चिमटा काढणारी उपहासाची जी किनार होती. त्यामुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. प्रवास वर्णने, भाषणे, चरित्र, आत्मचरित्र अशा सोबतच ‘विडंबन’ हा काव्य प्रकार त्यांनी ‘केशवसुत’ ह्या टोपण नांवाने मराठीत रुजवला व प्रतिष्ठित केला. 

त्यांच्या परखड आणि स्पष्ट वक्तव्य यांचा बद्दल जितके ते ओळखले जातात तितकच हलक, आणि मऊ त्यांच चरित्रपर लेखन किंवा मृत्यू बद्दल लेख होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मृत्यू नंतर लिहिलेले श्रद्धांजली पर लेख आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यु प्रसंगी झालेल्या एकमेव भाषणात हे प्रकर्षाने जाणवते. 

Advertisement

वक्तृत्व हि कला आहे आणि ‘वक्ता दशसहस्रेषु’ हि उक्ती त्यांच्या बाबत सार्थ ठरते. त्यांच्या निधनानंतर ५० वर्षे उलटूनही वक्तृत्वावरील त्याचं निर्विवाद श्रेष्ठत्व वक्ते आणि श्रोते मान्य करतात. त्यांच्या भाषाणाप्रसंगीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत ज्याला समय सूचकता आणि हजरजबाबीपण यांनी त्यांच्या साहित्या इतकीच प्रसिद्धी मिळाली. त्या काळातील ना. सी. फडके, बाळासाहेब ठाकरे, श्री. म.माटे यांच्या सोबतचे वैचारिक वादही चर्चेचा विषय होते. परंतु जितके ते लिहिताना बारीक बारीक गोष्टीचा आढावा घेतात तितकच सहज ते कौतुकही करत, त्यांचा सत्कार ना. सी. फडकेंनी केला त्या प्रसंगीचे त्या दोघांचे भाषण हे त्याचे द्योतक होते. 

‘कर्हेचे पाणी’ हे पाच खंडातील आत्मचरित्र म्हणजे आपल्या पिढीसाठी मागे राहिलेले अत्रे आहे. ज्यांना आपण पाहिलं नाही, प्रत्यक्ष ऐकलं नाही पण अनुभवु शकतो.

Advertisement

साहित्य आणि विनोद यांच्यापासून जसे अत्रे हे नाव वेगळे करणे अशक्यच तसंच त्यांच्या समाजकारणाचे देखील. राजकारणातही ते चमकले, महाराष्ट्र विधानसभेचे आमदार, पुणे शहरातील नगरसेवकपद हि कारकीर्द देखील गाजली. ‘भांबुर्डा’ या गावाचं ‘शिवाजी नगर’, आणि ‘रे मार्केट’ चे ‘महात्मा फुले’ असे नामकरण करण्यातही त्यांचा पुढाकार होता. त्यावेळी ते विरोधी पक्षात असूनही त्यांच राजकारणावर, समाजावरच वर्चस्व निर्विवाद होत. आजची ‘नावाला विरोधक’ अशी राज्यांची किंवा केंद्रातील स्थिती पाहता हि गोष्ट उल्लेखनीय आहे हे मान्य करावे लागते. विरोधी पक्षात असूनही हिताच्या किंवा साधक कार्याला फक्त विरोधक म्हणून ते आड आले नाही तर ज्या कारणास्तव विरोधी पक्ष हा राज्यघटनेत महत्वाचा ठरतो ते अंकुश ठेवण्याचे, लोकांसमोर आणण्याचे, धाडसाने जाब विचारण्याचे खरे कार्य त्यांनी केले. 

त्यांनी एक किस्सा सांगितला होता.. कि ‘लोक म्हणत अत्रे तुमचे सर्व मान्य आहे, चांगले आहे ते विनोद तेवढे वर टोचतात हो.. ते थोडे दूर करा…’ यावर ते म्हणाले होते ‘विनोद गेला तर उरते ते काय?’ ‘एकदा पर्वती चढताना ते दमले त्यावेळी त्यांना टोचण्याची खोड अंगात आलेला एक व्यक्ती म्हणाला मी चार वेळा चढून आलो .. तुम्ही पहिल्यातच दमलात, अजून दोनदा चढलो तर काय द्याल ? त्यावर अत्रे सहज म्हणून गेले “खांदा”. असा ज्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक विनोद होता.. तो महान साहित्यिक, नेता, पत्रकार, आणिहि बरच काही असलेले आचार्य अत्रे वयाच्या ७०व्या वर्षी १३ तारखेलाच जून १९६९ ला मागे पुढील अनेक पिढ्यांना पुरेल इतकं प्रचंड देवून अनंताच्या यात्रेला निघून गेले.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here