आईचा ‘एकच प्याला’?डॉ. शंतनु अभ्यंकर [email protected]
‘आपल्याकडे फारशा बायका पीत नाहीत’ असा एक सार्वत्रिक समज आहे. पण या समजुतीला सांस्कृतिक धक्के  देणारे अनुभव वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती क्षेत्रातीलमंडळी हल्ली सांगू लागली आहेत. भविष्यात आपल्याकडे व्यसनी पुरुषांइतकं च व्यसनी स्त्रियांचंही प्रमाण वाढेल का? किंवा व्यसनी स्त्रिया गर्भवती असतील तर काय? पाश्चात्त्य देशांत भेडसावणारे हे प्रश्न काहीच वर्षांत आपल्यालाही लागू होऊ शकतील. संस्कृतीमंथनाच्या कल्पनेच्या धक्क्यातून उमटलेलं एका डॉक्टरांचं हे विचारमंथन!   

Advertisement

तिनं जे काही सांगितलं, तो एक सांस्कृतिक धक्काच होता मला. रोज ती कित्येक पेग दारू रिचवत होती. गर्भारपण सुरू असूनही. पाचवा महिना चालू होता. गर्भावर दारूचे दुष्परिणाम होणार नाहीत, असं औषध तिला हवं होतं; दारू न सोडता! तिच्या मागणीमुळे पाश्चात्त्यांचा हा प्रश्न, आपल्याही किती निकट आला आहे, याची मला जाणीव झाली.

मुळात आपल्याकडे बायका फार कमी दारू पितात. सॉरी, फार बायका, कमी दारू पितात! सॉरी, सॉरी.. आपल्याकडे बायका, फारशा दारू पीत नाहीत. जमलं बुवा. पाहिलंत, सोमरसाच्या नुसत्या नामस्मरणानं लेखणी झोकांडय़ा खायला लागली!

Advertisement

मला इंग्लंडमधील एका खटल्याची गोष्ट आठवली. तिथली एक कन्या आईच्याच राशीला लागली. तिनं आईविरुद्ध खटला भरला. तिचं म्हणणं असं, की ‘माझ्या वेळी गर्भवती असताना हिनं इतकी दारू ढोसली, की त्याचे दुष्परिणाम आता मला भोगावे लागत आहेत. दारूमुळे गर्भावर दुष्परिणाम होतात, हे आईला माहीत होतं. तिनं मला जाणूनबुजून इजा केली आहे. सबब आईनं मला नुकसानभरपाई द्यावी. आणि गर्भिणींनी दारू टाळावी, असं सरकार सांगतंय. तेव्हा कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल, सरकारनंही नुकसानभरपाई द्यावी.’

आई महावस्ताद. ती म्हणाली, ‘हो, प्यायले मी दारू. व्यसनमुक्ती केंद्रात आहे हे रेकॉर्ड. पण त्याच्याशी हिचा काय संबंध? हिचा जन्म तरी झाला होता का हो तेव्हा?’

Advertisement

मातृपक्षाचा हाच मुद्दा कळीचा ठरला. ‘गर्भारशीला ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणून अधिकार आहेत, पण गर्भस्थ बाळाला ‘स्वतंत्र व्यक्ती’ अशी कायदेशीर मान्यता नाही. सबब ‘अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीला इजा’ हे कसं शक्य आहे?’ शिवाय ती माऊली असंही म्हणाली, की ‘एका  नागरिकाच्या, दारू पिण्याच्या ‘व्यक्तिस्वातंत्र्यात’ कोणतंही कोर्ट ढवळाढवळ करू शकत नाही.’ पण खालच्या कोर्टानं मम्माच्या विरुद्ध निकाल दिला. यावर, ‘ज्यूरीने निकाल दिला, तरी मी निर्दोष आहे, असंच मनोदेवता मला सांगत आहे. सृष्टीवर कोर्टापेक्षा श्रेष्ठ परमेश्वराचं प्रभुत्व आहे. माझ्या हालअपेष्टांनीच माझं कार्य अधिक भरभराटीला यावं असा ईश्वरी संकेत दिसतो.’ असं काहीतरी ती म्हणाली. पुढे ‘सोमरसपान हा माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच!’, असंही  म्हणाली असण्याची शक्यता आहे. पुढे सुप्रीम कोर्टानं ‘स्वतंत्र व्यक्ती’ आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ हे दोन मुद्दे विचारात घेत निर्णय आईच्या बाजूनं दिला. पण हे होईपर्यंत अनेक मुद्दय़ांचा कीस पाडला गेला.

कन्या पक्षाचं म्हणणं; समजा कारखान्याच्या प्रदूषणामुळे बाळं मतिमंद निपजली, तर कारखानदाराला नुकसानभरपाई द्यावी लागते. जेव्हा ती मुलं जन्माला येतात, तेव्हाच त्यांच्यातील दोष लक्षात येतात. इजा  होते तेव्हा ती बाळं गर्भस्थच असतात. पण तरीही कारखानदाराला दोषी धरलं जातं. तेव्हा ‘अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीला’ इजा झाल्याचा मुद्दा पोकळ आहे.

Advertisement

यावर मातृपक्षानं बरेच मुद्दे मांडले. समजा, एखाद्या बाईला डास चावल्यानं झिका व्हायरसनं ग्रासलं, त्यामुळे तिच्या मुलाचं डोकं लहानच राहिलं, तर मग मच्छरदाणी वापरली नाही म्हणून आईवर खटला भरायचा का? आईला आणि एकूणच बाईला, तुम्ही असं कशाकशासाठी आणि कुठवर जबाबदार धरणार आहात? दारूडय़ा आईनं अपत्याला भरपाई द्यायची, तर आधीच जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती आणखी बिघडणार, कौटुंबिक वाद सुरू होणार. आज हा पायंडा पडला, की उद्या अशा खटल्यांचं पेव फुटेल. ब्रिटनमध्ये दारू पिणाऱ्या बायका भरपूर आहेत! आणि काय सांगावं, उद्या समजा आई म्हणाली, की विशिष्ट सामाजिक, आर्थिक, परिस्थितीमुळे मला व्यसन जडलं, सबब सरकारनं मलाच नुकसानभरपाई द्यावी; तर? आणि खटला भरणाऱ्या मुलांनी, उद्या आईबरोबर दारू दुकानदार आणि कारखानदार यांनाही प्रतिवादी केलं तर?

खटल्याची ही मनोरंजक कथा मला आठवली आणि यापुढील काळात असे खटले केवळ तथाकथित ‘प्रगत’ देशांतच होतील, असं नाही, असं समोर बसलेल्या माऊलीचं बोलणं ऐकताना वाटून गेलं.

Advertisement

आता गर्भवती आणि तिचं ‘बाटली’प्रेम याबद्दल थोडं गंभीरपणे बोलण्याचा प्रयत्न करतो. ‘मम्मा’च्या मदिरासक्तीचे गर्भावर अनेक अनिष्ट परिणाम होतात (फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसीज). सुमारे ५ टक्के  बाळांमध्ये हे दोष आढळतात. मात्र इतकी दारू प्यायली की इतका त्रास होतो, असं गणित नाही. वारुणी वारेतून बाळापर्यंत जाते. अर्थातच आईचा एकच प्याला बाळाला ‘आउट’ करणारा असतो.  यकृतात (लिव्हर) दारूवर उत्तरक्रिया होत असते. पण बाळाचं यकृतही बालच असतं. मग दारू बाळाच्या शरीरात साठून राहते आणि बाळाची वाढ खुंटते. ऊंची कमी राहते. बौद्धिक उंचीही कमी राहते. वर्तनावर परिणाम होऊ शकतो.  नकटं नाक, बारीक डोकं, पातळ ओठ, अशी या मुलांची चेहरेपट्टी वेगळीच दिसते. या साऱ्या त्रासाचं निदान करणं महामुश्कील. त्रास दुरुस्त करणंही दुरापास्त. त्यामुळे प्रतिबंध हाच खरा उपाय.

तुम्ही जर दारू पीत असाल तर तसं डॉक्टरांना बेलाशक सांगा. ते तुम्हाला नीतिमत्तेचे धडे देतील अशी शक्यता कमीच! आल्या प्रसंगाला आणि झाल्या आजाराला तोंड द्यायला सहाय्य, हेच डॉक्टरांचं  काम. आणि कोणी चित्रगुप्ताची खतावणी पुढय़ात ओढून जमाखर्च लिहायला लागलाच, तर तुम्ही सरळ डॉक्टर बदला.

Advertisement

बाळ जन्माला घालण्याच्या निर्णयाबरोबरच दारू सोडायचा निर्णय घेणं उत्तम. निदान दिवस राहिले की तात्काळ दारू बंद करायला हवी. सुरुवातीला बाळाचे अवयव तयार होत असतात. तुम्ही पीत राहिलात तर यात समस्या येऊ शकते. इतके दिवस केली नसेल, तर आज हे वाचल्यापासून, प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन दारू बंद करा. काही तरी फायदा होईलच.

‘मी तर फक्त ‘बियर’ घेते’ किंवा ‘ ‘वाईन’च घेते, त्यात काय एवढं?’ असा कॉलेजीय युक्तिवाद करू नका. ‘दारू’ याचा अर्थ वैद्यकीय परिभाषेमध्ये अल्कोहोल असलेलं कोणतंही पेय. काही तथाकथित साध्याशा पेयांमध्ये बियरपेक्षाही जास्त ‘दारू’ असते. त्यामुळे ‘सुरक्षित दारू’ असा प्रकार संभवत नाही. एकच प्याला चालेल का?, नवव्या महिन्यात चालेल का?, पहिले तीन महिने वगळून एरवी चालेल का?, असले प्रश्नही गैरलागू आहेत. थोडय़ाच वेळा घेतलेली थोडीशी  दारूसुद्धा वाईटच.

Advertisement

मदिरारत माता आणि त्यांची मदिरा-बाधा झालेली मुलं, हा प्रश्नच उद्भवू नये, म्हणून लोकशिक्षण, समाजातून दारूचं प्रमाण कमी करणं, प्रसूतीपूर्व प्रबोधन करणं, व्यसनी स्त्रियांना गर्भनिरोधक/ गर्भपात सहज उपलब्ध असणं, असे उपाय आहेत. पण याबाबत पाश्चात्त्य देशांत चर्चिल्या जाणाऱ्या काही सूचना मात्र वादग्रस्त आहेत. उदाहरणार्थ- गर्भवतींना दारूच विकली जाणार नाही असा कायदा करणं किंवा त्यांना गर्भपात करायला भाग पाडणं किंवा प्रसूती होईपर्यंत त्यांना सुधारगृहात डांबणं.

गोची अशी, की सुधारगृहाचा बागुलबुवा असला, तर अशा बायका मुळात दवाखान्यातच जाणार नाहीत. बायका आणि त्यांची बाळं यांची अधिकच आबाळ होईल. बाळाला इजा व्हावी, या हेतूनं आयांनी प्यायलेली नसते, तर दारू पिणं ही व्यसनी  व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक गरज असते. व्यसनी जननी स्वत:च आजारी असते. मग तिच्या कृतीचं गुन्हेगारीकरण करणं कितपत योग्य आहे?

Advertisement

असे अनेक प्रश्न आहेत. आपल्या ‘रुद्राक्ष’ संस्कृतीत हा प्रश्न अजून फारसा गंभीर नाही. आपल्याकडे बाई ही ‘बाटली’पासून सहसा चार हात लांबच असते. पुलंच्या भाषेत सांगायचं तर, ‘त्यांची ‘द्राक्ष’ आणि आपली ‘रुद्राक्ष’अशा दोन संस्कृती आहेत.’ आता ‘संस्कृतीमंथन’ सुरू आहे. या मंथनातून सुरा बाहेर येणारच आहे. तिचं नेमकं काय करायचं हे आधीच ठरवलेलं बरं..

The post आईचा ‘एकच प्याला’? appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement