छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 24 नोव्हेंबर 2021 रोजी सेक्शन 35 ए नुसार मलकापूर अर्बन बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे 175 नागरी सहकारी पतसंस्थांच्या 300 कोटींची ठेवी अडकून पडली आहे. बँकेचे चेअरमन व व्यवस्थापक फोन घेत नाहीत.
समस्या सोडवत नसल्याने ठेवेदार हैराण झाले आहेत. पतसंस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी 20 मार्चला हडको शाखे समोर धरणे, निदर्शने आंदोलन केले जाईल. माजी चेअरमन चैनसुख संचेती यांनी येऊन तोडगा काढावा. अडकलेला निधी परत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
पुढे कोयटे म्हणाले की, मलकापूर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराच्या कामकाजाची कलम 88 नुसार तातडीने चौकशी करावी. तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्यात. त्यांचीही सखोल चौकशी व्हायला हवी. दोषी संचालकांवर गैरव्यवहाराच्या रकमेची जबाबदारी निश्चित करून मालमत्ता जप्त कराव्यात. बँकेवर ठेवीदार पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे प्रशासक मंडळ नेमावे.
बँकेच्या तरलतेमधून आतापर्यंत 520 कोटी रूपये डीआयजीसीला परत केल्याची माहिती असून आणखी 587 कोटी रूपये देणे बाकी आहे. बँकेकडे सद्यस्थितीत 520 कोटी रुपये तरलतेची रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम प्राधान्याने ठेवीदार पतसंस्थांना देण्यात यावी व नंतर उर्वरित रक्कम 900 कोटींची कर्जे वसुली करून डीआयजीसीला द्यावी. यासाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत. मात्र, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील हडको शाखासमोर आंदोलन होणार असल्याचे कोयटे म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, समन्वयक सुदर्शन भालेराव यांनी उपस्थिती होती.