जळगाव4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
देशाच्या स्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षाबरोबरच आपल्या समाज संस्थेचाही 75 वा वर्धापन दिन साजरा करीत विविध देशभक्तीपरगीते, जोगवा, नाटीकांमधून शिंपी समाजबांधवांनी शनिवारी समाज अविष्कार जागविला. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे बालगंधर्व सभागृहात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सभागृहास रामकिसनशेठ सोनवणेनगर असे नाव देण्यात आले होते. यावेळी संत नामदेवाचा जयघोष व समाजातील विद्यार्थी, युवती, महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून खानदेशी संस्कृतीवर आधारित अहिराणी गाणी, नृत्य यासह मंगळागौर, जोगवा या गीतांमधून संस्कृती, समाजाचे चित्रण मांडले. ए मेरे वतन के लोगो, मर्द मावळा… लल्लन भंडारी यासह विविध 41 सांस्कृतीक गीतांवर समाजबांधवानी आनंद लुटला. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी अमृतमहोत्सवी वर्ष सणावार लग्न सोहळ्याप्रमाणे साजरा केला.
प्रत्येक समाजबांधवांकडून मिळेल ती कामे करून समाजासाठी हातभार लावण्याचा प्रयत्नही समाजबांधवांकडून दिसून आला. संत नामदेव महाराजांच 17 वे वंशज एकनाथ महाराज (पंढरपूर) व विजया महाराज नामदास यांच्यासह आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सीमा भोळे यांची विशेष उपस्थिती होती. समाजअध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रकल्प प्रमुख मुकूंद मेटकर, मनोज भांडारकर, विवेक जगताप, रेखा बिरारी, सतीश पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सन्मानाने भारावले ज्येष्ठ
समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या 88 ज्येष्ठांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान झाल्याने ज्येष्ठ भारावल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळीही 75 दिवे लावून, फटाक्यांची आतषबाजी करून समाजबांधवांनी जल्लोष केला. या सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयासह मंगलकार्यालय वसतीगृहास विदयुत रोषणाई करण्यात आली होती.
आज भव्य शोभायात्रेसह होणार विविध ठराव
रविवारी सकाळी 9 वाजता नामदेव महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा गोलाणी मार्कट जवळील हनुमान मंदीरापासून निघेल. यासह दुपारी 12 वाजता बालगंधर्व नाट्यगृहात समाज मान्यवरांच्या उपस्थितीत समाजाचे विविध प्रश्न, रिती रिवाज, परंपरा, आवश्यक ते बदल याविषयी चर्चा होवून विविध ठराव करण्यात येणार आहे.