अहमदनगर5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अहमदनगर शहर व परिसरात बुधवार मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी व हरभरा या पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गुरुवारी देखील शहर व परिसरात ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री देखील काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. नेवासे, अहमदनगर तालुक्यातील काही भागात हा अवकाळी पाऊस झाला होता. बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अहमदनगर शहरातील सावेडी, प्रोफेसर कॉलनी, कापूरवाडी, शेंडी, जेऊरसह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यामध्ये पाऊस झाला.
या पिकांना फटका
जिल्ह्यातील नगर,नेवासे, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बीच्या पिकांना बसला आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
बहुतांशी भागात हरभरा व गव्हाचे पीक मध्यावर आले असतानाच अवकाळी पावसाने घाला घातल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. अवकाळी पावसामुळे कांद्यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यंदा लाल कांद्याची लागवड झाली आहे.
थंडीचा कडाका कायम
मार्च महिन्यात हा कांदा शेतीतून निघणार होता मात्र अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक देखील धोक्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे पालेभाज्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणाबरोरच सकाळी उशिरापर्यंत थंडीचा कडाका देखील कायम होता.