पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोंढव्यातून एका 16 वर्षीय तरूणाचे अपहरण करून सासवडला नेले. त्यानंतर तेथे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती देत असल्याच्या संशयावरून हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
साईराज लोणकर (25, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (25, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणकर, कापरे ही दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत अल्पवयीन तरूण हा शिवनेरीनगर भागात राहण्यास आहे. शनिवारी (दि.2) तो ढोल ताशा सरासावासाठी बाहेर पडला. दुसर्या दिवसापर्यंत तो परत न आल्याने रविवारी त्याच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी या अल्पवयीन तरूणाचा आणखी एक साथीदार फरार असून तो नुकताच परत आल्याचे समजले. त्याच्या पायाला जखम झाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेत माहिती घेतली.
त्यावेळी हा प्रकार समोर आला. आरोपींनी दोघांनाही मारहाण केली होती. लोणकर, कापरे व त्यांच्या साथीदारांनी अल्पवयीन तरूणाला सासवडला नेले. त्याठिकाणी त्याला गंभीररित्या मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले करीत आहेत