सोलापूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
- जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही, प्रशासन प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत
- सिंचन विभाग म्हणतोय, इंडी कॅनॉलमधून पाणी यायला ४५ दिवस लागतील
हकर्नाटक व महाराष्ट्र राज्यात एकमेकांना पाणी देण्याविषयी २०१६ मध्ये करार झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कर्नाटक अलमट्टी धरणातून पाणी सोडू शकते. यंदा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. उजनी धरणात पुरेसे पाणी नाही. शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारला सांगून औज धरणात पाणी घेता येईल, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चंद्रशेखर हविनाळे यांनी पत्रकारांना दिली.
अलमट्टी धरणातून सोडलेले पाणी तुरशी-बबलेश्वर आणि हिप्परगा (कर्नाटक) या योजनेतून चडचण ओढा व इंडी कॅनालमधून औज बंधाऱ्यात सोडता येईल. ते औज बंधाऱ्यात आठ दिवसांत येईल. यामुळे कर्नाटकातील उमराणीसह दोन बंधारे भरतील. कर्नाटकच्या आणची योजनेसाठीही पुरेसे पाणी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अलमट्टी धरणातून सोलापूरला पाणी येण्यासाठी ४५ दिवस लागतील, असे सिंचन विभागाचे म्हणणे आहे. वस्तुस्थिती तशी नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यासाठी डॉ. हविनाळे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मात्र, जिल्हाधिकारी रजेवर असल्याने त्यांची भेट झाली नाही.
डॉ. हविनाळे म्हणाले की, जत तालुक्यातील २८ गावांतील नागरिकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी कर्नाटक सरकारने पाणी सोडले होते, ते चार दिवसांत महाराष्ट्रात पोहोचले होते. आता पाणी आल्यास सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटेल. यामुळे उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी वाचेल.
अलमट्टीतून पाणी औजमध्ये आल्यास शहराचे पाणी प्रश्न मिटेल, असा मुद्दा डॉ. हविनाळे यांनी नुकताच झालेल्या जिल्हा नियोजन समितीत मांडला होता. त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार कर्नाटक सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दाखवली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी बुधवारी प्रस्ताव पाठवणार आहेत. यात सिंचन विभागाकडून चुकीची जाऊ नये, असे मत डॉ. हविनाळे यांनी मांडले.
तुरशी-बबलेश्वर योजनेतून पाणी आणता येईल
हइंडी कॅनॉलमधून पाणी येण्यास ४५ दिवस लागतील, असे सिंचन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मागील वर्षी जत तालुक्यातील २८ गावांना चार दिवसांत पाणी कर्नाटकातून आले होते. इंडी कॅनॉलमधून ४५ दिवस लागेल. पण तुरशी-बबलेश्वर योजनेतून पाणी सोलापूरसाठी आणता येईल. शासनाकडे चुकीची माहिती जाऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी आलो. त्यांच्याशी संपर्क साधून कळवणार आहे.’’
डॉ. चंद्रशेखर हविनाळे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती
पाणी देण्या-घेण्याचा करार काय?
कर्नाटकास पाण्याची गरज असेल तर महाराष्ट्राने पाणी सोडवे, महाराष्ट्रास पाण्याची गरज असेल तर कर्नाटकाने सोडावे, असा करार कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या काळात झाला. त्यानुसार महाराष्ट्राने एकवेळचे पाणी पंचगंगेतून सोडले. महाराष्ट्रास आता पाण्याची गरज आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारकडे पाण्याची मागणी करता येईल.