अरतें ना परतें..  : कुठून येतं हे बीज?प्रवीण दशरथ बांदेकर samwadpravin@gmail.com
म्हाताऱ्या भागीरथीबायच्या दोन्ही डोळ्यांत फूल पडलं आहे. ठार आंधळी झाली आहे ती. म्हातारीचं नक्की वय किती असावं, कुणालाच सांगता यायचं नाही. डोळ्यांत थोडीफार धुगधुगी होती तोवर ती जाग्यावर कधी सापडत नव्हती. नदीपैलाडी नारळाची चुडतं, पिढे, पिसुर्ली गोळा करायला, माळावर शेळकुंडं गोळा करायला, डोंगरातले काजू, करवंदं, रातांबे काढून आणायला म्हातारी भिरभिरत असायची. अलीकडे अगदीच नजं झाल्यापास्नं घराच्या मागल्या पडवीतल्या बाजल्यावर म्हातारीचा मुक्काम असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमानी पोरं आलेली. तेव्हा सुना या कळकट बोंदरातल्या म्हातारीकडे नातवंडांना जाऊ देत नसत. तिच्या हातचं काही खाऊ देत नसत. आजीचा अवतार ‘अन्हायजिनिक’ असल्याने मुलांना काहीतरी ‘इन्फेक्शन’ झालं असतं म्हणे!

Advertisement

मध्ये गावी गेलो होतो तेव्हा सवड काढून म्हातारीला पाचारायला म्हणून गेलो, तर पोरांचं निमित्त करून तिने ‘भिरवंडेकरांची पोथी’ सुरू केली. ‘मेल्यांनो, तुम्कां इत्क्या सगळां आयतां गावलां तरी पिरंगत अस्तास. आमच्याकडे काय व्हतां? चिखलारानात राबलंव, रानावनात कंदमुळां हुडकली, दर्यावांगडा झुजान माशे धरले. मिळात् तां खाव्न दिवस काढले. मनाविरुद्ध जुगलव, पोरांचा लेंढार वाढय्ला.. तरीपण उनापावसात टिकून ऱ्हंवलंव. अन्नान् दुस्काळात, धकाधकीच्या लढायांत जगन्याचे दशावतार सहन करीत बीज राखलां.. म्हणान व्हयतें आज तुम्ही उडतास.. गमजा करतास.. ‘ तुम्चो वव्स कसो टिकवलो तो आमचो आमका म्हायती रे माज्या म्हापूर्सा रवळनाथा..!’

‘बीज राखलं..!’ म्हातारी बोलण्याच्या नादात बोलून गेली. मी अवाक्!

Advertisement

पुढच्या वेळी येईन तेव्हा ही या खाटल्यावर दिसेल- न दिसेल; पण प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत, हाडाची काडं करून या भागीरथीबायसारखंच माझ्याही आजी-पणजीनं.. साधं नावही ठाऊक नसलेल्या आदिमाउल्यांनी बीज राखलं, म्हणून आजचा हा मी आहे, हे सत्य कसं विसरता येईल? आज आम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतक्या विपरीत परिस्थितीत ही माणसं जगत होती. त्यातही स्त्रिया कसा इतका संसाराचा गाडा ओढत होत्या, त्यांचं त्यांना माहीत! पैसा ही गोष्ट बघायलाही मिळत नव्हती. सहा-सात महिने कसेबसे ढकलतील इतकं पिकलं तर पिकलं; उरलेल्या दिवसांत मग अर्धपोटी राहून, मिळेल ते पोटात ढकलून माणसं तगून राहिली. तरीही ताठ कण्यानं, चिकाटीनं कसं शाबूत राखलं असेल या फाटक्या जीवांनी हे माणूसपणाचं बीज?

गाववाले सांगतात, याच भागीरथीबायनं एकदा गोठय़ात रिघलेल्या वाघाशी झुंज दिली होती. हातातल्या साध्या पाळकोयत्यानं त्याला पिटाळून लावून गाय-वासरू वाचवलं होतं. पावसाळी दिवसांत एकदा रोंरावत वाहणाऱ्या नदीपात्रात उडी घेत लोंढय़ाबरोबर वाहत जाणाऱ्या नाना नायकाच्या नातवाला सुखरूप ओढून आणलं होतं. गावोगाव अशी कितीतरी माणसं. त्यांच्या या कर्तृत्वाची कुठंही कसलीही नोंद नसलेली. अगदी सामान्य वाटणाऱ्या आणि तसंच फाटकं आयुष्य जगणाऱ्या या जीवांमध्ये हे विलक्षण धैर्य कुठून येत असावं? की मुळातच त्यांच्यात ते असतं. फक्त योग्य त्या परिस्थितीच्या अभावामुळे ते दबलं गेलेलं असतं? फक्त धैर्य, धाडसच असं नाही, असे आणखी कितीतरी गुण. सोशीकता, कणखरपणा, चिकाटी, अभावातही टिकून राहण्याची असामान्य क्षमता.. सगळीच चिरगुटं पांघरून, कसलाही गाजावाजा न करता ही माणसं कैक पिढय़ांपासून या मातीत रुजत, वाढत, फोफावत राहिली आहेत.

Advertisement

आपल्याच मर्यादित विश्वात निमूटपणे जगत राहिलेल्या या बायाबापडय़ांच्या आयुष्यात काही वेळा असा एखादा क्षण येतो, की ती अकस्मात लख्खकन् उजळून निघतात. विजेचा लोळ कोसळावा नि सगळा आसमंत प्रकाशमान व्हावा, तशी. जणू आपल्यातल्या आंतरिक शक्तीला उजळवून काढत ती आपल्यासमोर येतात. कसलीतरी असामान्य ऊर्जा त्यांच्या सगळ्या अस्तित्वामधून पाझरत असते. आपले डोळे अक्षरश: दिपून जातात त्यांच्या अपूर्व तेजामुळे. आपण विलक्षण अचंबित होऊन जातो. मनात येतं, याच का त्या वाटय़ाला आलेलं आयुष्य मुकाट पदरात घेऊन खालमानेनं जगणाऱ्या मुक्या, दुबळ्या बाया? यांना सामान्य कसं म्हणता येईल? त्यांच्यात संचारलेल्या त्या शक्तीमुळे दशदिशाही थरथरत असतील, तर त्यांना दुबळं तरी कसं म्हणता येईल?

काही वर्षांपूर्वी शिरोडय़ाजवळ वेळागरच्या किनाऱ्यावर सामान्य कष्टकरी स्त्रियांचा असाच एक सामूहिक झंझावात दिसून आला होता. स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात मिठाच्या सत्याग्रहामुळे लक्षात राहिलेलं हेच ते समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं टुमदार शिरोडा गाव. तेव्हाच्या त्या लढय़ाची आठवण व्हावी असं काहीतरी त्या दिवशी अनपेक्षितपणे या किनारपट्टीवर घडलं होतं. निमित्त होतं- कोकणातल्या एका राजकीय दादाच्या कृपाशीर्वादाने वेळागरला होऊ घातलेला एका सुप्रसिद्ध हॉटेल्स ग्रुपचा नियोजित प्रकल्प. या प्रकल्पामध्ये अनेक मच्छिमार कुटुंबांच्या जमिनी, घरंदारं, माड-पोफळीसारखी शेती जात होती. त्यांच्या मासेमारी व्यवसायावरही परिणाम होऊ शकत होता. साहजिकच त्या परिसरातल्या मच्छिमारांची या प्रकल्पाला हरकत होती. तरीही बळजबरीने त्यांच्या जमिनी हिसकावून घेऊन त्या या पंचतारांकित हॉटेलसाठी देण्याचं घाटत होतं. त्यासाठी प्रशासन व्यवस्था, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे सगळं काही वेठीस धरलं गेलं होतं. राजकीय दादाची दहशत एवढी, की कुठल्याही पक्षाचा वा संघटनेचा ठोस पाठिंबा या लोकांना मिळाला नव्हता. पूर्णपणे निर्नायकी आणि दिशाहीन अवस्थेत त्यांचा संघर्ष सुरू होता. अशा परिस्थितीत जमिनी मोजून ताब्यात घेण्याच्या इराद्याने मोजणी अधिकाऱ्यांसह अन्य प्रशासकीय यंत्रणांतील माणसं तिथं पोहोचली, तेव्हा तिथल्या मच्छिमार बायकांनी एकच एल्गार पुकारला. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, डोकी फुटून वाहणाऱ्या रक्ताला न जुमानता शेकडो बायका तिथं आपली पारंपरिक गाणी गात ठिय्या देत बसून राहिल्या. एकदा, दोनदा नव्हे, प्रत्येक वेळीच हे असं घडत राहिलं. वाट्टेल ते झालं तरी माघार घ्यायची नाही असाच त्यांचा निर्धार होता. शेवटी या सर्वसामान्य महिलांच्या शक्तीसमोर दादागिरी करणाऱ्यांना नमतं घेणं भाग पडलं. आजमितीस पूर्ण न होऊ शकलेला तो प्रकल्प आता बारगळल्यातच जमा आहे. रक्ताचं पाणी करून वाडवडिलांनी वाढवलेल्या काजू-आंबा-नारळ-पोफळीच्या बागांना हानी पोचवणाऱ्या, डोंगर आणि नद्या नष्ट करून पर्यावरणाचा समतोल बिघडवू पाहणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात त्यानंतरही प्रामुख्याने इथल्या बायकाच लव्हाळ्याच्या तलवारी बनून उभ्या ठाकल्या आहेत.

Advertisement

अनेकदा मनात येतं, महात्मा गांधींसारख्या नेत्यानं स्वातंत्र्य आंदोलनात खेडय़ापाडय़ांतल्या सर्वसामान्य स्त्रियांना सामावून घेताना त्यांच्यामधलं हेच असामान्यपण तर हेरलं होतं ना? या सामान्य जिवांमधली सुप्त ऊर्जा ओळखून, त्यांचं स्फुल्लिंग चेतवून त्यांना विधायक कार्याकडे वळवलं होतं. गांधींसारख्या स्वत:ही मुळात एक सर्वसामान्य माणूस असलेल्या नेत्याचं मोठेपण कदाचित याच गोष्टीत सामावलं असावं. गांधींपाशी कसलंही वलयांकित व्यक्तिमत्त्व नव्हतं की भव्यदिव्य पूर्वसंचित नव्हतं. तुमच्या माझ्यासारखंच प्रयत्ने प्रमादे पद्धतीनं हा माणूस सगळं शिकत गेला. जगताना आलेल्या छोटय़ा-मोठय़ा अनुभवांवरून शहाणं होत त्यांनी काही आडाखे बांधले; त्यावरून निर्णय घेतले. या माणसाचं असामान्य नैतिक धैर्य, हेतूंमागचा प्रामाणिकपणा, मूल्ययुक्त जगण्यातील पारदर्शकता अशा अनेक गोष्टी एखाद्या सर्वसामान्य माणसासारख्या जगण्यातूनच त्यांच्यात आल्या होत्या. देशपातळीवरचा नेता होऊनही गांधींमध्ये टिकून राहिलेल्या याच सामान्यपणामुळे त्यांना देशभरातील कोटय़वधी सामान्य लोकांशी स्वत:ला नि आपल्या चळवळीलाही जोडून घेता येणं शक्य झालं असावं. हे तेच सामान्यपण असावं, जे तुकोबांजवळ होतं.. गाडगेबाबांजवळ होतं. आणखीनही काही जणांपाशी असल्याचं दाखवता येईल.

आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या काही माणसांतलंही हे असं प्रखर असामान्यपण आपल्याला एखाद्या विशिष्ट परिस्थितीत जाणवून येऊ शकतं. माझ्याबाबतीतही तसं झालं आहे. तो प्रसंग आणि त्यावेळी माझ्या कुटुंबानं दाखवलेलं धैर्य मला कधीच विसरता येणार नाही. झालं होतं असं की, दोनेक वर्षांपूर्वी एका सकाळी मला मुंबईहून असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिसांच्या कार्यालयातून एक फोन आला होता. ‘एक गंभीर गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला सरकारकडून विशेष संरक्षण पुरवण्यात येणार आहे..’ मला सांगण्यात आलं.

Advertisement

हे ऐकताच छातीचे ठोके वेगाने पडू लागले. काय झालं? कशासाठी? मी असं काय केलं? त्यांनी पुढे सांगितलं, ‘घाबरू नका. फक्त आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. थोडं सावधपणे वावरावं लागणार आहे.’

मी कसंबसं विचारलं, ‘पण सर, हे कशासाठी ते कळेल का?’

Advertisement

‘तुम्हाला माहीत असेलच, गेल्या महिन्यात त्या अमक्यातमक्या सामाजिक नेत्यांच्या खुनाच्या संदर्भात संशयित म्हणून काही जण पकडण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी एकाकडे सापडलेल्या डायरीत काही लेखक-पत्रकारांची नावं आहेत. त्या सगळ्यांना सरकारकडून संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे..’

हे ऐकताना माझ्या अंगाला कंप सुटला होता. कसल्यातरी अनामिक भयाच्या सावटानं विलक्षण अस्वस्थ वाटू लागलं होतं. हे कळल्यावर माझ्या घरच्यांची काय अवस्था होईल, मला कल्पना करवत नव्हती. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या एका छोटय़ाशा गावातील शिक्षक-लेखकासाठी हे फारच धक्कादायक असं काहीतरी होतं. मी कॉलेजला येता-जाताना, बाजारात भाजी वा किराणा घेताना, मासे घेताना, लायब्ररीत गेल्यावर, नदीपारच्या गावी जाताना कुणीतरी आपल्यावर अदृश्यपणे पाळत ठेवून सोबत असणार आहे, हा विचारही अस्वस्थ करणारा होता.

Advertisement

जवळच्या मित्रांना ही बातमी कळल्यावर संध्याकाळी सगळे माझ्या घरी आले होते. मला भीती वाटत होती ती शीलाची- माझ्या पत्नीची. ती खूप भित्र्या स्वभावाची आहे. भावनाप्रधान नि संवेदनशील आहे. तिला हे समजल्यावर काय वाटेल, तिची काय प्रतिक्रिया येईल, याची मला काळजी लागून राहिली होती. आधीच माझे नातेवाईक, गाववाले वगैरे मी राजकीय विषयांवर लिहितो, व्यवस्थेवर टीका करतो म्हणून माझ्याविषयीची नाराजी तिला ऐकवत असत. आता हे त्यामुळेच उद्भवलं असावं असं तिला वाटणं सहजशक्य होतं. मित्र धीर द्यायचा प्रयत्न करत होते, पण तेही मनातून धास्तावले होते. कुणीतरी म्हटलं, ‘वहिनी, नका टेन्शन घेऊ. काही होणार नाही. याच्या संरक्षणासाठीच या लोकांची नेमणूक केलीय ना आता!’ मला एकदम वाटलं, झालं! आता हिचा बळेबळेच आणलेला धीर संपणार. आता काही खरं नाही. आता हिला सावरणं, समजावणं मुश्कील आहे. पण मलाच नव्हे, तर माझ्या मित्रांनाही अचंबा वाटावा अशा कणखर आवाजात ती म्हणाली, ‘टेन्शन आहे, ते असणारच. शेवटी मी बायकोच आहे ना त्यांची. भीतीही वाटते आहे थोडी. पण मी खचणार नाही. माझ्या नवऱ्याने काही वाईट काम केलेलं नाहीये, मला माहीत आहे. त्यांचं लेखन समाजातल्या काही प्रवृत्तींना खटकत असेल, त्यासाठी ते लोक ह्य़ांच्या जिवावर उठले असतील. समाजाला काही सत्य सांगू पाहणाऱ्याच्या नशिबात हे असतं, मला माहीत आहे. पण मला माझ्या नवऱ्याचा अभिमानच आहे. मरण काय, कसंही कधीतरी येतंच; ते असं येईल. पण मरणाच्या भीतीनं लिहायचं थांबवलेलं मला आवडणार नाही. काय वाट्टेल ते होऊ दे, मी खंबीरपणे त्यांच्यासोबत आहे.’

हे ऐकताना मी अक्षरश: अवाक्झालो. एक सामान्य गृहिणी.. घर, संसार यापलीकडे जगाचा फारसा अनुभव नसलेली, साध्या झुरळा-पालींनाही घाबरून किंचाळणारी एक बाई हे बोलत होती. माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या मित्रांचीही तीच अवस्था झाली होती. माझे डोळे भरून आले. हे तिचं रूप मला आजवर अपरिचित असंच होतं. हे अनपेक्षित असंच काहीतरी मी अनुभवत होतो. तिनं समजा चारचौघींसारखं म्हटलं असतं की, ‘बाकी लेखक लिहितात तसं तुमचं काय लिहायचं ते लिहा, पण घरातल्या माणसांना का संकटात टाकताय? आधीच माझ्या डोक्याला कटकटी कमी आहेत का? हे आणखी कुठं निस्तरत बसायचं? उद्या काही बरं-वाईट झालं तर आमचं काय होईल, हा विचार नको का करायला माणसानं? असलं लिहायचं होतं तर संसार तरी कशाला करायला हवा होता?’ तरी मला आश्चर्य वाटलं नसतं. पण त्या क्षणी त्या चारचौघींसारखंच सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या, तसाच विचार करणाऱ्या त्या बाईने जे असामान्य मनोधैर्य दाखवलं, जो अफाट संयमितपणा दाखवला, तो माझ्यासाठी कल्पनातीत असाच होता.

Advertisement

मनात येतं, तुकोबा, गांधींसारख्यांना गवसलेलं सामान्यांतील असामान्यपण हेच तर नाही का? हीच ती त्यांच्यातील आंतरिक शक्ती, हीच ती सुप्तावस्थेत असलेली अद्भुत ऊर्जा- जी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, जगात काहीही उलथापालथी होत असल्या तरी हार मानत नाही.. तीच तुम्हाला प्रकाशाची वाट दाखवते. सामान्य जीवांमधली ही असामान्य ताकद, हे निर्विष बीज जोवर जिवंत आहे, तोवर माणूस नावाचा हा जीवही या जगात तगून राहील, हे नक्की.

The post अरतें ना परतें..  : कुठून येतं हे बीज? appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement