अरतें ना परतें.. : आयनाच्या बायना..प्रवीण दशरथ बांदेकर [email protected]

Advertisement

या सगळ्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली असावी सांगता यायचं नाही. काल असेल किंवा परवा. कदाचित दहा-पाच वर्षांपूर्वी. पण हळूहळू आपल्या आसपासचं काही तरी बिघडत चाललं आहे याची जाणीव ठळक होऊ लागलेली. अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चाललेली. अस्वस्थता बरीचशी आपल्या हतबलतेतून येत असावी. स्वत:चे स्वार्थी नि मतलबी हेतू साध्य करण्यासाठी आपला कुणीतरी वापर करून घेतंय, आजूबाजूच्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना रोजच्या बारक्यासारक्या गोष्टींसाठीही वेठीस धरलं जातंय, आपण मात्र त्या प्रवृत्तींच्या विरोधात काहीच करू शकत नाही आहोत, ही जाणीव आतल्या आत सतावत राहिली आहे. काही म्हणजे काहीच करू नये, कुणाशी बोलू नये, सगळ्या दुनियेशी संपर्क तोडून टाकावा, नुसतंच निमूट पडून राहावं देहाची मुटकुळी करून, असंच काहीसं वाटत राहतं अशा वेळी. मन निराशेनं काळवंडून जातं. विश्वास उडून गेलेला असतो सगळ्यांवरचा. आतबाहेर घेरून असलेली उदासीनता नि जीवाची नुसतीच तगमग.

परशा ठाकर नावाच्या एका जुन्या शाळकरी मित्राच्या अकाली जाण्याची बातमी कुणाकडून तरी कानावर आली नि हे सगळं भस्सकन उफाळून आलं अंगावर. खरं तर आपण आपल्याच रोजच्या जगण्याच्या धबडग्यात गुरफटून गेलेलो असतो. रोजची कामं सवयीने पार पाडत असतो. तशातच अचानक काही तरी अनपेक्षित घडून येतं. आपण एकदम हडबडून जातो. अवाक् होऊन जातो. काय बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावी, काहीच कळेनासं होतं.

Advertisement

 म्हटलं तर, या सगळ्याची सुरुवात स्थानिक वर्तमानपत्रातील एका बातमीपासून झाली असावी. या बातमीशी परशाचा थेटपणे संबंध होता असं म्हणता यायचं नाही. पण तो ज्या प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाशी जोडलेला होता, तिथला कुणीही सहजपणे परशा ठाकर म्हणता आला असता. त्याच्यासह त्याच्यासारख्या कुणाच्याही बाबतीत घडलेलं असावं असंच ते वर्तमान होतं. बातमी साधारणपणे अशी होती : मारुती, कृष्ण, राधा अशा देवादिकांची सोंगे घेऊन नाच करणाऱ्या, गाणी म्हणत शबय मागत गावोगाव फिरणाऱ्या मुलांना अमुक तमुक संस्कृतिरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या मुलांनी आमच्या देवांची विटंबना केली आहे, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, सबब पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.

या बातमीत एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय होतं? म्हटलं तर, सहज नजर फिरवून विसरून जावं अशा असंख्य किरकोळ बातम्यांपैकी ही एक. पण तसं होत नाही ना! या बातमीचं बोट धरून आपल्याला आपल्या शाळेत असलेला परशा ठाकर आठवतो. परशा दशावतारी लोकनाटय़ांतून काम करायचा. शिमग्याच्या दिवसांत देवादिकांची सोंगं काढून फिरायचा. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करायचा. वाडवडलांच्या लोककलेचा हा वारसा आपल्या परीनं त्यानं सुरू ठेवला होता. पण त्यामुळेच कधीकाळी आपल्यावर काही आफत येईल असं परशाला स्वप्नातही वाटलं नसेल. खरं तर शिमग्याच्या दिवसांत अशी सोंगं घेऊन राधाकृष्णाचे, गोमूचे नाच करण्याची गावागावांतली गेल्या कैक पिढय़ांपासूनची परंपरा. दशावतार, नमन खेळे, तमाशा, बतावण्या अशा बहुजनांच्या मनोरंजनाशी निगडित असलेल्या किती तरी लोककलांमधूनही पुराणकथांतल्या अनेक देवादिकांची सोंगे वठवली जातात. आमच्या दशावतारातला संकासुर थेटपणे ब्रह्मदेवाच्या दाढीला हात घालून त्याची थट्टामस्करी करतो. तुझ्यामुळे माझं वाटोळं झालं, म्हणत त्याची विद्या चोरून नेतो. तमाशातला कृष्णा आणि त्याचे सवंगडी गवळणींची चावट शब्दांतून छेड काढतात. अनेक लोककलांमधून देवाधिदेव इंद्राच्या लंपटपणावर, कृष्णाच्या गौळणींची वस्त्रे पळवण्यावर, आणखीन कुणाकुणा ऋषिमुनींच्या कामातिरेकावर वगैरे जोरदार शब्दांत रेवडी उडवलेली असते. पण या गोष्टींमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, कुणाच्या देवदेवतांची विटंबना झाली आहे, लोकश्रद्धांवर घाला घातला गेला आहे, असं कुणी काही म्हटल्याचं या आधी कधी कानांवर आलं नव्हतं.

Advertisement

मग आता अचानक गेल्या काही वर्षांपासून हे असं काय व्हायला लागलंय? माणसं इतकी असहिष्णू, असहनशील, देवाधर्माच्या बाबतीत इतकी टोकाची संवेदनशील वगैरे कशी काय व्हायला लागलीत? कुठं काय बिघडलं नेमकं? 

धमक्या, मारहाणीची भीती, दहशत अशा गोष्टींना कंटाळून परशाने गाव सोडलं होतं. मुंबईत मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी तो धडपडत होता. कुठे कुठे नाटक कंपन्यांतून वगैरे गाववाल्यांच्या ओळखीपाळखी काढत होता. याच्या त्याच्या दाढीला हात लावून, बाबापुता करून, मिळेल ते काम पदरात पाडून घेत होता. कधी बॅकस्टेज वर्कर म्हणून, तर कधी एखाद्या नाटका-मालिकेत काही छोटय़ामोठय़ा भूमिका मिळवून, आयुष्याचं भरकटलेलं गाडं स्थिरावू पाहत होता. तशातच गेल्या दोन वर्षांपासून अंगावर येऊन कोसळलेल्या महामारीला थोपवण्यासाठी आपल्या मायबाप सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला. त्यामुळे ठप्प झालेले जवळपास सगळेच सांस्कृतिक जीवनव्यवहार, बंद पडलेली नाटय़गृहे, बेकार झालेले कलावंत आणि बॅकस्टेज कामगार सगळ्यांचीच धानाधिस्पट सुरू होती. असलेली नसलेली पुंजी संपून गेल्यावर परशाचंही पुन्हा या नाही तर त्या कामासाठी वणवण फिरणं सुरू झालेलं. हातावर पोट असलेल्या माणसांना मरणाच्या भयानं झालं तरी घरात बसून राहणं कसं काय परवडणार होतं? आणि मरण तर दबा धरूनच बसलेलं असतं अशांसाठी. कधी एकदा सावज आपल्या टप्प्यात येतंय नि कधी त्याच्यावर झेपावतोय म्हणत. जगण्यानं उभ्या केलेल्या संघर्षांसमोर सहजासहजी हार न मानलेल्या परशाला मरणानं मात्र कधी चकवलं कळलंच नाही. कुणालाच काही कळलं नाही. कळली, आपल्यापर्यंत पोचली ती फक्त व्हॉटस्अ‍ॅपवर फिरणारी एक बेवारशी बातमी. चटका लावणारी. उदास करणारी. कसा गेला? काय झालं? नशेत होता का? गाडीखाली आला का? जीवाला कंटाळून ट्रेनसमोर झोकून दिलंन का की गावच्या गुंठाभर तुकडय़ासाठी कुण्या भावबंदाने काटा काढला? .. काही म्हटल्या काहीच कुणी सांगू शकला नाही.

Advertisement

डोळे थोडे किलकिले करून पाहिलं तर परशासारखी किती तरी माणसं आपल्या आजूबाजूला सहजपणे दिसून येतील. अगदी तुम्हीसुद्धा परशा ठाकर असू शकता. किंवा म्हटलं तर मी स्वत:सुद्धा! उपलब्ध अवकाशात स्वत:च्या मर्यादांचं भान राखून स्वत:ला व्यक्त करण्याची जीवापाड धडपड करणारा आणि तसं करताना अंगावर कोसळणाऱ्या आसपासच्या व्यवस्थेमुळे सतत खच्चीकरण होत असलेला कुणीही सामान्य माणूस परशा ठाकर असू शकतो. अशीच माणसं या निर्दयी व्यवस्थेच्या कराल दाढांखाली सर्वात आधी चिरडली जातात. त्यांचं सर्जनशील असणं, अतिसंवेदनशील असणं, अव्यवहारी असणं, हाही काही वेळा शाप ठरत असतो त्यांच्यासाठी. त्यांचं असं हळूहळू कोमेजून जाणं आणि काही तरी निमित्त होऊन अनपेक्षितपणे अकाली कोलमडून पडणं त्यांच्या या भावूक, भावरति स्वभावाशीच जोडलेलं असावं का?

परशा अगदी पहिल्यांदा भेटला तोही सर्जनशील भूमिकेत वावरत असतानाच. त्याच्या आज्यासोबत कळसूत्री भावल्यांचा खेळ करायला तो आमच्या आवाठात आला होता. नंतर त्याचं हे रूप दिसलं ते विठोबाच्या देवळातल्या जत्रेतल्या दशावतारी खेळाच्या वेळी. दशावतारी नाटक बघायला मी गेलो होतो. संकासुराचा प्रवेश सुरू असताना बिलिमाऱ्याचं सोंग घेतलेलं पात्र देवाच्या आरतीची तळी घेऊन प्रेक्षकांतून फिरत होतं. बिलिमारो म्हणजे देवाच्या सेवेकरी स्त्रीचं सोंग घेतलेला पुरुष. दशावतारी नाटकांतून पुरुषच प्रथेप्रमाणे ही स्त्रीची भूमिका वठवत असतात. तर ही देखणी बाई प्रेक्षकांतून तळी घेऊन फिरत होती. बायामाणसं तळीतल्या निरांजनावरून हात ओवाळून तळीत पैसे टाकत होती. काही पुरुष चावटपणा करीत बिलिमाऱ्याची कळ काढत होते. कुणी चिमटा काढल्यावर बिलिमाऱ्याचं सोंग घेतलेला बाप्या बाईसारखाच लाजून चित्कारत होता. इतक्यातच माझ्या बाजूला बसलेला मित्र म्हणाला, ‘ह्यो का वळाखलंस ना रे? ह्यो तुमच्या शाळेतलो परशा ठाकर. बघ, कसो मस्त बायलमानूस सोबतांसां बिलिमाऱ्याच्या सोंगात.’

Advertisement

हुबेहूब एखाद्या बाईसारख्याच दिसणाऱ्या परशाला मी कसं काय ओळखणार होतो? खरं तर परशाला मी याआधीही शिमग्याच्या दिवसांत तोंड रंगवून कसलं कसलं सोंग घेऊन नाचताना पाहिलं होतं. रोंबटाच्या धुळवडीत तर परशाच्या राधेशी स्पर्धा करणारा कुणी नसायचा. पायात चाळ बांधून, कमर लचकवत, ठुमकत चालणाऱ्या देखण्या राधेला पाहून गावातल्या तरुण मुलींनाही न्यूनगंड वाटत असावा. शिमग्यातला त्याचा गोमूचा नाचही अफलातून असायचा. याच राधेला की गोमूला बघून दशावतारी पार्टीने त्याला संधी दिली असावी का?

.. पण मग तशातच त्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

Advertisement

आयनाच्या बायना दोन गोटे खाय ना, घेतल्याशिवाय जायना, शबय शबय.. अंगाला निळा रंग चोपडलेला कृष्ण ओरडत होता. त्याच्या पाठीमागे पेंद्या आणि बाकीचे गवळी. परशाची राधा मात्र कुठेच दिसत नव्हती. मग कुणीतरी म्हणालं, त्याला संस्कृतिरक्षक कार्यकर्त्यांनी धमकावून बोलावून घेतलंय. इतक्यातच घामाघूम झालेली राधा धावतच तिथं आली. अंग थरथरत होतं तिचं. धावत आल्याने की घाबरल्यामुळे तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. धड उभंही राहावत नव्हतं तिला. तिथं मातीतच थपकल मारून बसली ती. जोरजोरात श्वास घेत हुंदके देत राहिली.

‘काय झालां रे, परशा? कित्याक्  रडतं? कोन काय बोल्लो काय तुकां? उगी ऱ्हंव आणि काय झालं तां सांग बघू या.’ सगळ्यांचे भांबावलेले प्रश्न.

Advertisement

आणि स्वत:ला सावरत, हुंदके आवरीत राधेनं त्यांना काही सांगण्याआधीच मागून आवाज आला, ‘हे धर्मबुडवे अजून इथंच आहेत काय रे? देवाधर्माची विटंबना कराहेत ७७७ चे! आमची परंपरा आहे म्हणे! ही कसली देवादिकांची सोंगं घेऊन भिका मागायची परंपरा? अरे, रामकृष्णमारुती ही काय निस्ती पोथ्यापुराणांतली पात्रं नाय्येत. एकेका तेजाची रूपं आहेत ती! शक्तीची प्रतीकं आहेत. त्यांना असे रस्त्यावर आणता काय रे, ७७७नो?’ आम्ही बिलकूल सहन करणार नाही. अजिबात चालू देणार नाही तुमची ही थेरं! सोडणार नाय असे तसे. नाय एकेकाची चामडी लोळवली तर नाव नाय सांगणार संस्कृती-साधक म्हणून..’

आणि नाही तरी चामडी लोळवली गेली होती याची जाहीर वाच्यता कोण करू धजावणार होतं? आपल्या थोर भारतीय संस्कृतीचं डोळ्यांत तेल घालून रक्षण करणारे कार्यकर्ते असे कोवळ्या पोरांच्या पाठी-पोटावर मारून मोक्ष मिळवत असतील, धर्मरक्षण करत असतील, हे कुणाला खरं वाटेल सांगून?

Advertisement

या प्रवृत्तींच्या दहशतीला घाबरून परशासारख्या किती हुन्नरवंतांनी वाडवडलांचं गाव सोडलं असेल. किती जणांनी घराण्याचं नाव टाकलं असेल. लाजलज्जा गुंडाळून ठेवत पोटापाण्यासाठी मिळेल तशी वणवण सुरू केली असेल. जगण्याच्या या लढाईत थकलेल्या, हरलेल्या किती जणांनी मरणाला मिठी मारली असेल. साडेतीनशे वर्षांपूर्वी अशाच प्रवृत्तींच्या छळाला कंटाळून तुकोबांना गाथा इंद्रायणीत बुडवावी लागली होती. त्याच प्रवृत्तीने तुकोबांना गायब करून सदेह वैकुंठालाही धाडलं असावं. आज तर काय, परिस्थिती अधिकच बिघडत गेलेली दिसते आहे. कधी देवादिकांचं निमित्त करून, कधी महापुरुषांच्या विचार वा चरित्राची चिकित्सा केली म्हणून, कधी नाटका-सिनेमांतून देवाधर्माची चेष्टा केल्यावरून, एवढय़ा तेवढय़ावरून आमच्या अस्मिता दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. सारासार मूल्यविवेक गुंडाळून माणसं पाशवी पातळीवर येऊ लागलीत, हिंस्रपणे आपल्याच भावाबहिणींचे लचके तोडू लागलीत, अस्तित्व पुसून टाकू लागलीत.

तुमचं अस्तित्व म्हणजे नक्की काय? फक्त तुमचं शरीर का? नक्कीच नाही. तुमचा मेंदू, तुमचे विचार, तुमची माणूस म्हणून असलेली ओळख, एक व्यक्ती आणि एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून तुमच्या सगळ्या कृतिउक्ती.. हे सगळंच तुमच्या अस्तित्वाशी जोडलं गेलेलं असतं. माणूस म्हणून जगत असताना तुम्ही अनेक गोष्टींचे निर्णय घेत असता. अनेक गोष्टी स्वीकारत असता. नाकारीत असता. हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला असतं. घटनेच्या चौकटीत राहून, कायद्याचा आदर राखून आणि माणूस म्हणून इतरांच्याही जगण्याच्या स्वातंत्र्याचा संवेदनशीलपणे माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करून जगण्याचा हक्क कुणीच हिरावून घेतलेला नसतो. पण हे असं आपल्याला जे काही वाटत होतं कालपरवापर्यंत त्यालाच तर अचानक तडे जाऊ लागले होते. तुम्हाला वाटत असतं तसं जगण्याच्या, विचार करण्याच्या, निर्णय घेण्याच्या, खाण्यापिण्याच्या, सगळ्या सगळ्या तुमच्या मूलभूत मानवी हक्कांवर कुणीतरी टाच आणायला लागतं. आम्ही सांगतो आहोत ते आणि तसंच तुमचं जगणं असलं पाहिजे, आम्ही म्हणतो ते नैतिक, आम्ही सांगतो तीच संस्कृती, आम्हाला वाटतं तोच स्वातंत्र्याचा अर्थ ही बळजबरी सुरू होते. तुमच्या पारंपरिक सवयी, रूढीपरंपरा, खानपान, बोली, कपडेलत्ते, सणवार, देव सगळं धर्मबा आणि अडाणीपणाचं ठरवलं जाऊ लागतं. तुम्ही या सगळ्या अडाणीपणाला कवटाळणं म्हणजे विशुद्ध भारतीय संस्कृतीला कलंकित करणं म्हटलं जातं. तसं करणाऱ्यांना मग प्रायश्चित्त, दंड करण्यावाचून पर्यायच उरलेला नसतो. आणि प्रायश्चित्त वा दंड फक्त एकाच प्रकारचा असतो. तो म्हणजे या जगातून त्याचं अस्तित्व संपवून टाकणं.

Advertisement

माणसांचं अस्तित्व संपवणं इतकं सोपं होऊन गेलं आहे एकाएकी. मग कुणी देशपातळीवर वावरणारा विचारवंत, लेखक, कार्यकर्ता अशीच त्याची ओळख असायला हवी, असंही काही नाहीये. तो अगदी रोजच्या रोजीरोटीसाठी घाम गाळणारा, मजुरी मेहनत करणारा रस्त्यावरचा कुणी आम आदमी असला तरी काही फरक पडत नाही. त्याने आमच्या संस्कृतीला मान्य नसलेलं काही केलं तरी त्याचं चामडं लोळवायला, त्याला नरकात पाठवायला आम्ही मागेपुढे बघणार नाही, हे आमच्यापुरतं आम्ही ठरवूनच टाकलं आहे. 

पण माझ्यातल्या लेखकाला या प्रवृत्तींपेक्षाही अधिक भीती माझ्यासोबत वावरणाऱ्या माझ्याच चेहऱ्यामोहऱ्याच्या माझ्या बांधवांची वाटतेय. गोष्टी अशा डोळ्यांदेखत बिघडत जात असतानाही आपल्या आसपासच्या जगण्यातलं काही बिघडत चाललंय असं त्यांना मुळी वाटतच नाहीये, त्यांच्या बुडाला काहीच चटके जाणवत नाहीयेत, हे जास्त भीतीदायक आहे. ज्या शहाण्यासुरत्या बुद्धिजीवींनी, लेखक-कलावंतांनी या अविचारी प्रवृत्तींच्या कच्छपी लागून कळसूत्री भावल्यांगत नाचणाऱ्या सामान्य लोकांना विवेकाचा अंकुश टोचून भानावर आणायचं, तेच आम्ही आमच्या शब्दांची शस्त्रे म्यान करून बसलोय. आमच्यातलेच काही सत्तेच्या तालावर डोलत आपल्या सहिष्णू परंपरांचा गळा घोटू लागलेत. जागल्याच्या भूमिकेत वावरणाऱ्यांनाच आपल्या आयडेंटिटीचं विस्मरण होऊन तेही मंबाजीच्या तालावर नाचू लागलेत. डोळ्यांदेखत होऊ लागलेल्या या माझ्याच अपमृत्यूपेक्षा अधिक भयावह काय असू शकतं? की आता चेहऱ्यावर त्यांना हवा असलेला मुखवटा डकवून आम्हीही ओरडत फिरायला हवंय, आयनाच्या बायना, घेतल्याशिवाय जाय ना, शबय शबय..?

Advertisement

The post अरतें ना परतें.. : आयनाच्या बायना.. appeared first on Loksatta.Source link

Advertisement