अरतें ना परतें.. : आत-बाहेरचा ‘मी’प्रवीण दशरथ बांदेकर [email protected]

Advertisement

आपलं काहीतरी बिघडलं आहे हे अलीकडे सतत जाणवत असतं. उगाचच अस्वस्थ वाटत राहिलेलं असतं. काय ते नेमकेपणानं सांगता नाही यायचं, पण बारक्यासारक्या गोष्टींवरून सारखी चिडचिड होत असते. कधी कधी वाटतं, चारचौघांसारखी आपल्याला लाभलेली बाकीची ती सगळी इंद्रियं- बघण्या-बोलण्या-ऐकण्या-स्पर्श करण्याचं नि वास घेण्याबिण्याचं वगैरे- शाबूत असली तरी आणखीन दुसरंच काहीतरी बिघडलं आहे. ते कदाचित खास आपलंच असलेलं, आपल्यालाच लाभलेलं असं काहीतरी असू शकतं. किंवा कदाचित बाकी सगळ्यांपाशीच असलेलं, पण त्यांना न जाणवलेलं, आपल्यालाच कधीतरी जाणवलेलं असंही काही असू शकतं.

काय असावं ते? विचार करकरूनही लक्षात येत नाही. लक्षात येत नाही म्हणूनही पुन्हा पिरंगत-पिरपिरत राहणं. जास्तच चिडचिड व्हायला लागली की स्वत:वरचा राग काढायचं हक्काचं ठिकाण आपलं घर, आपली जवळची माणसं. ती बिचारी सहन करतात आपलं सगळं. निमूट समजून घेतात आपला त्रागा. कधी आपलं जरा अतिच व्हायला लागलंय असं जाणवलं तर कानही पकडतात. त्या दिवशी एकदा असंच झालं. नेहमीसारखंच काय झालेलं कळत नव्हतं. माझी नुसतीच आदळआपट चाललेली. ‘माझ्या इथल्या वस्तूंना हात कुणी लावला? या टेबलावरचं ते अमकंतमकं पुस्तक कुठे गेलं? टेबल आवरायला तुला आजचाच मुहूर्त बरा मिळाला! असेना होता पसारा. तुझं घर कोण टीव्हीत दाखवायला येणार होतं का? मला हवं असलेलं सगळं त्या पसाऱ्यातच बरोबर सापडतं नेहमी. माहितीय ना?’ वगैरे नेहमीचं करवादणं सुरू होतं. अर्थात माझं हे चिडचिड करणं त्या वेगळ्याच कसल्या तरी बिघडण्यातून आलेलं आहे हेही मला कळत होतं. हवी असलेली वस्तू न सापडणं नि घरच्यांवर राग काढणं वगैरे सगळं फक्त वडय़ाचं तेल वांग्यावर काढण्यातला प्रकार होता. पण झालं काय, आधीच घरच्या नि ऑफिसच्या कामानं घरकारीण वैतागून गेली होती. माझी सगळी आदळआपट ऐकून घेत ती म्हणाली, ‘‘तुम्ही लेखक-कवी ना एक नंबरचे लबाड लोक असता. लेखनातून नेहमी म्हणत राहायचं, आम्हाला लोकांच्या दु:खाची जाणीव आहे, त्यांच्या वेदनेचं गीत ऐकू येतं आम्हाला. एकापेक्षा एक मोठमोठे शब्द वापरायचे. काय तर म्हणे, समाजातल्या शेवटच्या माणसाला समजून घेण्यासाठी आम्ही लेखणी झिजवत असतो. राबणाऱ्यांची, शोषणाला बळी पडणाऱ्यांची बाजू घेत असतो. नुसते पोकळ शब्द! साधं घरातल्या माणसांना समजून घेता येत नाही. त्यांची घुसमट कळत नाही. त्यांच्या राबण्याची किंमत नाही.. आणि चालले जग बदलायला!’’

Advertisement

माझ्यातला लेखक एकदम चिडीचूप होऊन गेला. कितीही वैतागून बोलत असली तरी तिचं काहीच खोटं नव्हतं. स्त्रियांच्या दु:खावर लिहिणारे, स्त्री-पुरुष समानतेची भाषणं ठोकणारे आम्ही घरातल्या आमच्या स्त्रियांना मात्र गृहीत धरून चालत असतो. तिथं आपल्यातला पारंपरिक पुरुषसत्ताक वर्गाचा प्रतिनिधी कायमच वरचढ होत असतो हे आपल्या कधी लक्षातही येत नाही. तिनं सावित्रीमाय होऊन आपल्याला साथ द्यावी ही अपेक्षा करताना आपण मात्र एक शतांशानंही जोतिबाचं काही घेतलेलं नाहीये, हे आपल्या गावीही नसतं. बऱ्याचदा या गोष्टी आपल्याला फारशा महत्त्वाच्याही वाटत नाहीत. यात काही विसंगती आहे, विरोधाभासातून निर्माण होणारा आपल्या जगण्यातील दुटप्पीपणा आहे असं आपल्या मनात येत नाही. त्यात काय, हे असंच असतं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत. मग तो पुरुष काय नि बाई काय, सगळ्यांच्याच बाबतीत हे असं सारखंच असतं. सगळीच माणसं घरात नि घराबाहेर वेगवेगळी वागतात. घरातल्यांना, हाताखालच्यांना, नोकरचाकरांना गृहीत धरतात. आपल्या बारीकसारीक चुकांसाठी त्यांना जबाबदार धरतात, त्यांच्यावर राग काढतात, त्यांची मनं दुखावतात. हे असं आपल्या जगण्यात सगळीकडे कायमच सुरू असतं. त्यात काय एवढं विचारात घेण्यासारखं, असंच साधारणत: आपल्याला वाटत असावं.

पण गोष्टी अशा वाटतात तितक्या दुर्लक्षित करण्यासारख्या किरकोळ खरंच असतात का? किंवा असंही असू शकतं ना, वरकरणी किरकोळ वाटणाऱ्या या गोष्टी लक्षातही न घेण्याच्या आपल्या बेफिकीर वृत्तीतूनच हळूहळू एक प्रकारच्या निर्ढावलेपणाचा थर आपल्या मनावर साचत जात असावा का? त्यातूनच मग आपण हे असे दिवसेंदिवस अधिकाधिक असंवेदनशील, अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत जात आहोत का?

Advertisement

बऱ्याचदा असं होतं की, आपण बाहेरच्या जगासाठी आपली एक इमेज प्रयत्नपूर्वक घडवत जातो. बाहेरच्यांच्या नजरेतून आपण प्रगतिशील भूमिका घेणारे, समतेचा पुरस्कार करणारे, सर्वसामान्य जीवांविषयी अपार कणव असलेले वगैरे वगैरे असतो. सार्वजनिक जीवनात वावरताना आपण भलतेच सभ्य आणि सुसंस्कृत असतो. नीतिमान आणि चारित्र्यसंपन्न गृहस्थ असण्याचे भारतीय संस्कृतीचे सगळे तथाकथित निकष जणू आपल्या वर्तनावरूनच संस्कृतिरक्षकांनी बनवलेले असतात. आपल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याविषयी लोक आपल्या समंजसपणाचं, समजूतदार वृत्तीचं कौतुक करतात. सगळ्यांना समजून घेणारा, सोबत घेऊन पुढे जाणारा फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड वगैरे समजतात. थोडक्यात, बाहेरच्या जगातले आपण प्रत्यक्षातल्या आपल्यालाच अनोळखी असे असू शकतो. प्रत्यक्षातले आपण कसे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. ‘प्रत्यक्षातला मी’ असं म्हणण्याऐवजी ‘प्रत्यक्षातले आपण’ असं म्हणणंच योग्य होईल. याचं कारण आपल्याला जराही कल्पना नसते असे असंख्य कुणी कुणी आपलेच सगेसोयरे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी घट्ट जखडलेले असतात. म्हणजे माझ्याच व्यक्तिमत्त्वातला एक कुणीतरी लेखक म्हणून अमुक एक भूमिका घेत असला तरी माझ्यातला दुसरा एक बरोबर त्याच्या उलट वागत असतो. एक मी वर्गात मुलांसमोर विज्ञाननिष्ठेवर बोलतो, िलबू-मिरच्यावाल्या लोकांची खिल्ली उडवतो नि दुसरा मी वाडवडिलांची परंपरा आहे, मोडायची कशी, भाऊबंदांना, गाववाल्यांना दुखवायचं कसं, म्हणून गावच्या घरी जाऊन सगळे सणवार रीतिरिवाजानुसार साजरे करतो. एक प्रचंड निग्रही, संयमी, प्रामाणिकपणे आवडती कामं करणारा. दुसरा आळशी, खुशालचेंडू, उतावळा, अवसानघातकी. एक कुटुंबवत्सल, मित्र-सहकारी-वडीलधारे आणि आवडत्या माणसांवर भरभरून प्रेम करणारा. दुसरा माणूसघाणा, शिष्ट, तुच्छतावादी, हातचं राखून व्यक्त होणारा. आपल्यातला एकटा असलेला मी तर आणखीनच भयंकर प्रकार असतो. एखाद्या पशूपेक्षाही असंस्कृत आणि रानटी वर्तन असतं त्याचं. हा एकांतातला मी काय काय विचार करत असतो, काय काय गोष्टींचे कल्पनेनं अनुभव घेत असतो, हे नुसतं आठवलं तरी स्वत:ची शरम वाटत राहते. कदाचित यामुळेच आपल्याला आपण खरे कसे आहोत हे स्वत:पाशीच कबूल करणं जिवावर येत असावं. आपण त्याचा शोध घेणं, विचार करणं, त्याविषयी स्वत:पाशीही बोलणं- अगदी नेणिवेतही सतत टाळत असतो. या टाळण्याचीही एक दाट सवय होत असावी मनाला. ती सवयच विसर पाडते आपल्या खऱ्या असण्याची आपल्याला जाणीव करून देण्याची. त्यातूनच मग आपल्या अस्तित्वाची दोन जगं बनून जातात. एक आतलं आणि दुसरं बाहेरचं. एकाचा दुसऱ्याशी काहीही संबंध नाही असं वाटायला लावणारी. परस्परांहून भिन्न आणि विसंगत. 

आपलं हे आतलं एक नि बाहेरचं वेगळं असणं आपल्या वाटय़ाला आलेल्या त्या, त्या वेळच्या परिस्थितीच्या रेटय़ामुळे, जगण्यातल्या अभावांमुळेही घडत असावं का? की मुळात आपण असेच असतो.. अनेक सुप्त, आदिम, पाशवी इच्छा-वासनांच्या दलदलीत लडबडलेले? आपल्याला जसं वाटत असतं की, मी हा हा असा असा आहे, तसंच बाहेरच्या जगालाही आपल्याविषयी वाटत असतं. पण कधीतरी एखादा असा विचित्र क्षण येतो की अचानकच हा फुगा फटाक्कन् फुटतो. आपण जगाच्या दृष्टीने एकदम केविलवाणे होऊन जातो. कदाचित हेच खरे आपण, हे त्या दुबळ्या क्षणी आपल्यालाही जाणवून येत असावं.          

Advertisement

तसा थेटपणे संबंध जोडता आला नाही तरी याविषयी विचार करताना मला मध्यंतरी पाहिलेल्या ‘दिठी’ या सुमित्रा भावेंनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाची आठवण होतेय. दि. बा. मोकाशींच्या ‘आमोद सुनासि आले’ या कथेवर आधारलेला हा चित्रपट. किशोर कदम या आमच्या मित्रानं त्यात रामजी या मध्यवर्ती पात्राची अप्रतिम भूमिका वठवली आहे. हा रामजी म्हणजे गावातला एक शहाणासुरता, जाणता माणूस. ग्यानबा-तुकोबाच्या अभंगांत, विठ्ठलाच्या भक्तीत, पंढरीच्या वारीत आणि आपल्या अवतीभवतीच्या माणसांच्या सुखदु:खात आरपार बुडालेला. रामजीला जणू माणसाच्या जगण्या-मरण्याचं नेमकं मर्म गवसलं होतं. रामजी म्हणायचा, ‘माणूस म्हटला की सुखंदु:खं आलीच. त्यांचा काय इतका बाऊ करायचा? कुठचंही दु:ख हे तात्कालिक असतं. आणि आयुष्य प्रवाही. त्यामुळे दु:खात अडकून पडून पुढचं आयुष्य नासवायचं नसतं.’ न चुकता पंढरीच्या वारीला जाणाऱ्या रामजीच्या आयुष्याचं हे साधसुधं तत्त्वज्ञान. त्याला भेटलेल्या हरेक दु:खी माणसाला त्याच्या त्याच्या दु:खाचा विसर पडावा, त्यातून तो बाहेर यावा म्हणून माऊलींच्या ओव्यांचा दाखला देऊन तो हे ऐकवायचा. आता हे तसं ठीकच म्हटलं पाहिजे. अशी माणसं असतात आपल्याही आजूबाजूला. आपल्याला त्यांचा आधार वाटतो. आपल्या दु:खी मनावर फुंकर मारण्याचं ती काम करतात. आपल्याला माहीत नसलेल्या आध्यात्मिक वाटाव्यात अशा गोष्टी त्यांच्या जाणत्या वाणीतून ऐकताना आपल्याला पुन्हा उभारी घेण्याचं मानसिक बळही मिळतं नकळत. यामुळेच रामजीसारखी माणसं जगन्मित्र असतात. त्यांच्या शब्दाला गावात मान असतो. पण कधीकाळी अशा माणसांच्याच वैयक्तिक आयुष्यात त्यांना हादरवून टाकणारी एखादी गोष्ट घडली तर..? त्यावेळी ही माणसं कशी वागतील? दु:खाकडे अलिप्तपणे बघत त्याला सामोरं जातील की कोलमडून पडतील? रामजीच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी एक घटना घडते आकस्मिकपणे. अचानक नदीला आलेल्या पुरात रामजीचा एकुलता एक मुलगा वाहून जातो. ध्यानीमनी नसताना अंगावर येऊन कोसळलेल्या या आघातामुळे रामजीला प्रचंड धक्का बसतो. मनाने तो एकदम खचून जातो. रोजच्या पारायणांमध्ये, मित्रांच्या गप्पांमध्ये, अभंग-ओव्यांच्या गायनामध्ये.. कशातही त्याचं लक्ष गुंतत नाही. मुलाच्या मृत्यूदरम्यानच इकडे त्याची सून बाळंत होऊन तिला मुलगी होते. जन्माला आलेल्या नातीच्या पायगुणामुळे हे घडलं असंही त्याला वाटत राहतं. त्यामुळे तो तिचाही सतत राग राग करत राहतो. ‘तिला घेऊन घरातून तोंड काळं कर..’ असं तो वैतागून आपल्या सुनेला बजावतो. जगाला दु:खाच्या खाईतून बाहेर काढणाऱ्या, आयुष्यातून उन्मळून पडणाऱ्याला सावरणाऱ्या रामजीची ही अशी अवस्था झालेली बघितल्यावर आपल्या मनात येतं, ‘अरेच्चा!  म्हणजे हाही आपल्यासारखाच निघाला तर! हा लोकांना मारे असं आणि तसं सांगत होता; पण आपल्या जवळच्या माणसाचं निघून जाणं यालाही पचवता येत नाहीये.’ आजवर जगलेलं, जगाला सांगितलेलं रामजीचं सगळं तत्त्वज्ञान एका क्षणात असं गळून पडलेलं पाहताना प्रत्यक्ष जगण्यातलं सगळं फोलपण आपल्या अंगावर धावून येतं. पण याचा आता अर्थ काय घ्यायचा? बाहेरच्या धगधगीत वास्तवाला सामोरं जाण्याची धमक असलेल्या कणखर रामजीला त्याच्या आतला हळवा रामजी परकाच होता म्हणायचं का? त्याने कधी तो जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसेल, किंवा तो बाहेरचा आणि आतला- दोघेही एकच आहेत असंच तो समजून चालला होता असेल. ती घटना घडेपर्यंत त्याच्या कधी ते लक्षातही आलं नव्हतं असंही म्हणता येईल.

खरं तर नक्कीच कठीण असतं हे असं कठोरपणे स्वत:च्या दु:खाला रोखत आपण स्वीकारलेल्या भूमिकेशी, तत्त्वप्रणालीशी, विचारांशी ठाम राहत जगणं. काही मोजक्याच लोकांना ते जमत असतं. आपण त्यापैकी नाही हे स्वत:पाशी किमान कबूल करणंही आपल्याला जमत नाही. या अशा कसोटीच्या प्रसंगांचं तर सोडूनच द्या, पण रोजच्या जगण्यातील असंख्य छोटय़ा छोटय़ा क्षणांना प्रामाणिकपणे सामोरं जाण्याचंही धाडस आपल्यात नाहीये, हेही अनेकदा जाणवून येतं. आपण कितीही वार्ता केल्या की, मी इतका इतका तुकोबा पचवला आहे, माऊलींची पारायणं केली आहेत, दुनियेचा अमुक इतका भलाबुरा अनुभव घेतला आहे, आणि या सगळ्याच्या जोरावर आपण बाहेरून कितीही स्थितप्रज्ञ असल्याचा आव आणला तरीही आपले आतले हादरे मात्र आपल्यालाच जाणवत असतात. जगाला सांगणं, उपदेश करणं सोपं; पण आपल्यावर वेळ आली की सगळी स्थितप्रज्ञता गळून पडते. तुम्हीही चारचौघांसारखेच दु:खाच्या भारानं कोलमडून पडणारे, लोळागोळा होणारे सर्वसामान्य माणूस होऊन जाता. अशा वेळी आपल्या त्या आतल्या छुप्या व्यक्तित्वाला बाहेरच्या तुमच्या प्रतिमेशी काहीही देणंघेणं उरलेलं नसतं. दोघेही पुन्हा परस्परांहून वेगळे आणि विसंगत.

Advertisement

आपल्यापैकी बहुतेकांचं हे असंच असावं का? अनेकदा असं दिसतं की, बाहेरच्या जगाचे असंख्य आघात झेलून कणखरपणे जीवनाची वाटचाल करणारी एखादी व्यक्ती तिच्या कुटुंबातल्या एखाद्या घटनेनं कायमसाठी कोलमडून पडते. ती कधीच पुन्हा त्या धक्क्यातून उभारी घेऊ शकत नाही, सार्वजनिक जीवनात पूर्वीसारखी वावरू शकत नाही. कधी जगाला मायेनं पोटाशी धरणारी माणसं आपल्या घरच्यांना, जवळच्यांना समजून घ्यायला मात्र कमी पडताना दिसतात. हे असं कशामुळे होत असावं? आपल्याच आतल्या एका घटकाला आपल्या बाहेर डोकावणाऱ्या घटकाशी जुळवून घेता येत नाही. दोघांमध्ये सुसंगती नसते. सतत बाहेर वावरणाऱ्या ‘मी’ला माझ्या आतल्या ‘मी’सोबत कधी संवाद साधावासा वाटत नाही- ही अशी इतकी वरवरची कारणं यामागे असतील यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. विचार करूनही काही कळत नाही, एवढंच अशा वेळी कळत असतं. मला मीच कळत नाही. आतला-बाहेरचा. शतखंडित होऊन असंख्य तुकडय़ांतून या जगात वावरणारा. स्वत:चाच थांगपत्ता लागत नाही. दुखरी नस सापडत नाही. हेच असावं का आपल्याला अधूनमधून डंख करणाऱ्या त्या विचित्र अस्वस्थतेचं कारण? स्वत:ला एकत्रित सांधता येत नाहीये, इथंतिथं विखुरलेल्या माझ्या अस्तित्वाला एका ठायी गोळा करता येत नाहीये. तसं करता येण्यासाठी आवश्यक असलेलं एक आतलं अदृश्य इंद्रिय बिघडून गेलं असावं का आपलं? की तुकोबानं म्हटलंय तसं, माझ्या त्या दुभंगलेल्या ‘मी’पणावर आत्मप्रचीतीचा चिरा पडल्याशिवाय आपल्याला हे कधी कळायचंही नाही? कसं कळावं रे हे माझ्या आत-बाहेर वावरणाऱ्या अज्ञानी जीवा?

The post अरतें ना परतें.. : आत-बाहेरचा ‘मी’ appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement