मुंबई16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
23 ऑगस्ट, सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटे, ही वेळ भारता इतिहासात आता स्वर्णअक्षरांनी कोरली गेली आहे. याचवेळी चांद्रयान-3 अलगदपणे चंद्रावर उतरले व देशभरात जल्लोष पाहायला मिळाला. मात्र, यावरून आता राजकीय टोलेही पाहायला मिळत आहेत.
संभाजी भिडेंची खिल्ली
भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी केवळ भगवा असावा, अशी मागणी करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. “मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, असे म्हणत अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंची खिल्ली उडवली आहे.
पंडित नेहरूचेंही योगदान
तसेच, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे देशासाठी काहीही योगदान नाही, असेही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, ‘चंद्रावर तिरंगा फडकला, लई वाईट वाटलं असल तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात… आता कसं’ अमोल मिटकरी ट्विट करत संभाजी भिडेंना हा टोला लगावला आहे.
अब्दुल कलामांची आठवण
अमोल मिटकरी यांनी चांद्रयानच्या यशानंतर इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही आठवण काढली. मिटकरी म्हणाले, हा भारत माझा देश आहे. या क्षणी अब्दुल कलाम आणि विक्रम साराभाई यांची आठवण येते आहे.
कर्मकांडाने यश मिळाले नाही
चांद्रयान ३ चे लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतानाचा आपला एक व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी म्हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. हा विक्रम ज्यांच्या मेहनतीमुळे शक्य झाला त्या सर्व वैज्ञानिकांना सलाम. भारतीय शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा. हे यश केवळ तुमचे आणि तुमचेच. कुठल्याही कर्मकांडाने व प्रार्थनाने हे यशस्वी झाले नाही. यामागे शास्त्रज्ञांची अखंड मेहनत आहे.
संबंधित वृत्त
तीन पावलांत जिंकला चंद्र:लँडरवरून उतरताना प्रज्ञान रोव्हरचा पहिला फोटो आला समोर, आता चंद्राच्या पृष्ठभागावर फिरतोय
भारताने तीन पावलांत चंद्र पादाक्रांत केला. 23 ऑगस्टची संध्याकाळ होती, देश स्तब्ध उभा होता, श्वास रोखले होते, पापण्या स्थिर होत्या आणि अवघे जग भारताच्या आशेवर चंद्राकडे पाहत होते. पृथ्वीवर संध्याकाळ होत होती, चंद्रावर सूर्य उगवत होता. सायंकाळी 6.04 वाजता भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. यासह, चंद्राच्या सर्वात कठीण भागात उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. वाचा सविस्तर