अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची एकूण मतदार नोंदणी 2 लाख 6 हजार 172 झाली आहे. गेल्या चार महिन्यात तीन टप्प्यात ही नोंदणी केली गेली. 2 जानेवारी हा नोंदणीचा अंतिम दिवस होता.
निवडणूक घोषित झाली तोपर्यंत विभागातील पाचही जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 925 जणांनी मतदार म्हणून स्वत:चे नाव नोंदविले होते. त्यानंतरच्या काही दिवसात सुमारे 20 हजार मतदारांनी नाव नोंदणी केली. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ही यादी 2 लाख 6 हजार 172 वर पोचली आहे. जिल्हानिहाय आकडे विचारात घेतल्यास अमरावती जिल्ह्यात 64 हजार 344, अकोला जिल्ह्यात 50 हजार 606, बुलडाणा जिल्ह्यात 37 हजार 894, वाशिम जिल्ह्यात 18 हजार 50 तर यवतमाळ जिल्ह्यात 35 हजार 278 मतदारांनी आपापल्या नावांची नोंदणी केली. अशाप्रकारे विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीने 2 लाखांचा आकडा पार केला आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील ही मतदार नोंदणी तुलनेने बरी वाटत असली तरी गेल्यावेळच्या तुलनेत मात्र ती कमीच आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात 2 लाख 10 हजार 511 मतदार होते. मुळात पाच वर्षात पदवीधरांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. परंतु मतदारांचा निरुत्साह नडल्यामुळे यावेळी नोंदणी प्रभावीपणे झाली नाही. मोजकेच राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याबाबतचे जनजागरण केले, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी अशी
जिल्हा मतदारांची संख्या
अमरावती 64,344
अकोला 50,606
बुलडाणा 37,894
वाशिम 18.050
यवतमाळ 35,278
एकूण 2,06,172