- Marathi News
- Local
- Maharashtra
- Amravati
- New Crisis Facing Farmers In Amravati, Ration Off From Current Month; The Question Of Farmers Is How To Get Food For Such A Small Amount Of Five Rupees A Day
अमरावती22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. या महिन्यापासून त्यांना रेशनऐवजी प्रतिव्यक्ती दरमहा 150 रुपये दिले जाणार आहे. दीडशे रुपये महिना म्हणजेच पाच रुपये रोज या सूत्रानुसार 3 लाख 81 हजार 862 शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.
रेशन वितरण प्रणालीतील उणीवा दूर करणे शक्य नसल्याने हळूहळू ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा घाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच रेशन दुकानदारांनीही नव्या योजनेला विरोध दर्शविला आहे. अमरावती जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना किमान दिलासा या हेतूने स्वस्त धान्य दुकानांतून रेशन पुरवठा केला जायचा. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यात कपात करीत आता एकदाचे रेशनच बंद करण्याचा उफराटा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या शेतकरी कुटुंबाला प्रतिव्यक्ती एक किलो गहू आणि चार किलो तांदुळ असे वितरण केले जात होते. आता तेही बंद झाले आहे. त्याऐवजी प्रतिव्यक्ती दररोज पाच रुपये एवढी रक्कम संबंधित कार्डधारकाला दिली जाणार आहे. यासाठी त्या कुटुंबातील महिलेच्या नावे बँकेत खाते उघडावे लागणार असून त्या खात्यातच ही रक्कम वळती केली जाणार आहे. मुळात एवढ्या कमी रकमेत धान्य खरेदी करायचे कसे, असा कळीचा मुद्दा संबंधित कुटुंबप्रमुखांद्वारे विचारला जात आहे.
या योजनेंतर्गत सर्वाधिक 51 हजार 363 शेतकरी दर्यापुर तालुक्यात आहेत. त्याहून कमी 49 हजार 971 वरुड, 34 हजार 620 अचलपूर, 31 हजार 551 धामणगाव रेल्वे, 30 हजार 315 नांदगाव खंडेश्वर, 29 हजार 929 चांदूर रेल्वे तालुक्यात आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात 27 हजार 399, चांदूर बाजार तालुक्यात 25 हजार 634, मोर्शी तालुक्यात 23 हजार 301, धारणी तालुक्यात 17 हजार 612, अमरावती ग्रामीणमध्ये 16 हजार 661, अमरावती शहरात 16 हजार 615, भातकुलीमध्ये 15 हजार 499, तिवस्यात 10 हजार 966 तर सर्वात कमी अवघे 426 शेतकरी चिखलदरा तालुक्यात आहेत.
रेशन दुकानदारांचा दिल्लीत मोर्चा
आगामी 17 व 22 मार्चला रेशन दुकानदारांच्या दोन मोठ्या संघटनांनी दिल्लीच्या संसद भवनावर मोर्चाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांचे रेशन बंद झाल्याने स्वाभाविकच सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांची धान्याची उचल कमी झाली असून आपोआपच त्यांना मिळणारे कमीशनही कमी होणार आहे. आधीच हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. अशा स्थितीत या नव्या संकटाचा सामना कसा करावा, असा जिल्ह्यातील 2 हजार दुकानदारांचा सवाल आहे. रेशन कमी करत आहात, तर हरकत नाही पण किमान त्यापोटी मिळणाऱ्या कमीशनची भरपाई करुन द्यावी.