अभिजात :  साऱ्या गावाचं नाटक ओबेरामेरगाऊ

अभिजात :  साऱ्या गावाचं नाटक ओबेरामेरगाऊअरुंधती देवस्थळे

Advertisement

असंही होतं कधी कधी की विशिष्ट अनुभवासाठी आपण अमुक एका ठिकाणी जातो. तो नाही मिळत, पण त्यानिमित्ताने शिरलेल्या परिघात असं काही भेटतं की तो अनुभव न घेताही त्यातलं काहीतरी मोलाचं हाती लागल्यासारखं वाटतं. एखाद्या उत्सवात उत्सवमूर्तीचं दर्शन होऊ नये, पण तिथे जाऊन आल्यासरशी बाकीचा उत्सव अनुभवावा तसं. आम्हा म्युनिकच्या व्हिला वालबेर्तातल्या मित्रमंडळाचं असंच झालं, कला आणि परंपरांवर रात्री रंगलेल्या गप्पांत ओलोफ आणि बार्बेल या स्थानिक जोडप्यानं ओबेरामेरगाऊची कहाणी आणि ३८७ वर्ष चालत असलेल्या पॅशन प्लेच्या (डॉइशमधे पॅसोनष्पीएल) परंपरेबद्दल  सांगताच आम्ही बाहेरून आलेले सगळे हरखूनच गेलो. सध्या तो चालू नाहीये, पण जवळच या भव्य सादरीकरणाचं म्युझिअम आहे हे ऐकून अगदी पुढल्याच शनिवारी तिथे जाण्याचा निर्णय उत्स्फूर्तपणे घेतला गेला आणि तो या उत्साही जोडप्याच्या मेहेरबानीने पार पडला. ओलोफ आणि बार्बेलने आपापल्या गाडय़ा आणल्याने सगळं बेतशीर चाललं होतं.

हेही वाचा >>> अभिजात : पॉल क्लेई अमूर्ततेतून संवाद

Advertisement

आल्प्सच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकडय़ांत वसलेलं गाव.. म्युनिकपासून जेमतेम दीड तासाच्या अंतरावर म्हणून आधी त्याच्याजवळचीच एत्तालची लांब-रुंद मोनॅस्ट्री पाहून घेतली. अतिशय देखण्या ओबेरामेरगाऊमध्ये प्रवेश केल्याक्षणीच एखाद्या परिकथेच्या रंगीबेरंगी पानावर उतरल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर लोककलेच्या उत्फुल्ल निळय़ा, लाल, हिरव्या रंगातल्या रेखाटनांनी नटलेली बैठी घरं. एका घरावर हॅन्सेल अँड ग्रेटलची परीकथा चितारलेली दिसली, तर दुसऱ्यावर ‘ब्रेमेन टाऊन म्युझिशिअन्स’ची कहाणी! गावाच्या मध्यभागी सेंट पीटर अँड पॉलचं रोकोको शैलीतलं, म्हणजे बरोकनंतर आलेलं, पण त्याची सममिती (सीमेट्री) न पाळणारं, नाटकीयतेकडे झुकणारं, फिक्या रंगसंगतीतलं हिरव्यागार कुरणांनी भरलेलं गाव. त्यात सुखेनैव पहुडलेल्या सुखवस्तू गायी, काही चरणारे तगडे घोडे, दगडगोटय़ांचे अरुंद रस्ते, आसपास लाकडी कलावस्तूंची लहान-मोठी दुकानं!

जेव्हा कला आणि परंपरांचा विषय असतो, तेव्हा युरोपची बरोबरी कोणी नाही करू शकत. या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये पुन्हा चर्चेत आलेल्या बव्हेरियातल्या ओबेरामेरगाऊचंच उदाहरण बघावं तर इथे १६३४ पासून कलात्मक थाटामाटाने साजरी होणारी एक अखंड नाटय़परंपरा आहे. हे तंत्रशुद्ध अद्ययावत सादरीकरण म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मापासून ते मृत्यूनंतरच्या पुनरागमनापर्यंतची मानवी जीवनातल्या सुख-दु:खाच्या फेऱ्यांची दीर्घकथा! आधारित नाटकाची परंपरा, ‘पॅशन प्ले’ (खरं तर ख्रिस्तजन्मावर आधारित ‘नेटिव्हिटी’  नाटकांसारखाच) भव्य प्रमाणात सादर होत असते. २०२० मध्ये कोविडमुळे न होऊ शकलेलं नाटक यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये, इथे १४ मे ते २ ऑक्टोबरदरम्यान १०० प्रयोगांत सादर होत आहे. तिकिटं दीड वर्षांपूर्वीच विकली गेलेली आहेत. उघडय़ा आकाशाखाली अर्धगोल कमानीखाली भव्य मंचावर, ४५०० प्रेक्षकांसमोर होणारं हे नाटक हे मध्यंतराव्यतिरिक्त पाच तास चालणारं नाटक इ. स. १६८० पर्यंत दरवर्षी उन्हाळय़ाचे सहा महिने होत असे. नंतर ते दर दहा वर्षांतून एकदा होणार, तसंच सहा महिने चालणार हे ठरवण्यात आलं. चारशे वर्षांच्या आसपास काळ उलटलाय, पण मूळ एका शाळाशिक्षकाने लिहिलेल्या जर्मन संहितेत गाभा तसाच ठेवून दर दशकात नवनवीन तंत्रं आणि कलात्मक बदलांनी सादरीकरणाची परंपरा जिवंत ठेवण्यात आली आहे. आता तिचे वेगवेगळय़ा भाषेतील अनुवाद बिगर जर्मन प्रेक्षकांना वाटण्यात येतात. या तिकिटावर  जवळचं म्युझिअमही पाहता येतं. यावर्षी तारखा जाहीर होताच जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद आल्याने त्याचा कालावधी तेवढय़ाच उत्साहाने वाढवण्यात आला. हा सुदीर्घ नाटय़प्रयोग म्हणजे गावातल्या प्रत्येकाच्याच घरचं कार्य असा एकंदरीत माहौल असतो. इथे दृष्ट लागावी अशी एकजूट आणि शिस्त असते. जसं की, यावर्षी कोविडमुळे मागील दीड वर्ष वाया गेल्याने तीनेकशे नटांना रजा मिळू शकली नाही म्हणून  दोषारोपण वगैरे न करता, बाकीच्यांनी त्यांची उणीव न भासावी असे सादरीकरणात फेरफार केले.

Advertisement

हेही वाचा >>> अभिजात : जेम्स टिसो : आसक्तीकडून आध्यात्मिकतेकडे!

परंपरेमागची कथा अशी की, १६३३ च्या भयंकर प्लेगमध्ये जर्मनीत माणसं पटापट मरत होती. ओबेरामेरगाऊ नावाप्रमाणे खेडंच. लोकसंख्येतली २५% माणसं साथीला बळी पडली म्हणून गावच्या बडय़ा-बुढय़ांनी म्हणे देवाला साकडं घातलं की आम्हाला वाचव, दरवर्षी तुझ्या नावाने नाटक करू. (आपल्याकडे नवस बोलून ‘गोंधळ’ किंवा उत्तर भारतात ‘जागर’ घालतात तसंच काहीसं) आणि योगायोग म्हणा किंवा श्रद्धेचं सामर्थ्य की, त्यानंतर साथीनं गावातला मुक्काम उठवला! तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. नाटकाचा पहिला प्रयोग चर्चच्या कबरस्तानात झाला होता. विशेष म्हणजे, या नाटकात २००० कलावंत असतात. वय अगदी काही महिने (बाळ जीझस) ते नव्वदीपर्यंत. यातला प्रत्येक नट /नटी याच ५००० च्या आसपास लोकसंख्येच्या गावातले. म्हणजे अर्धेअधिक गाव नाटकात काम तरी करत असतं किंवा या ना त्या मार्गाने प्रयोगाशी जोडलेलं असतं. काहीकाही जनावरं, पक्षीसुद्धा म्हणजे गाढवं, मेंढरं, कबुतरं वगैरे.. नाटकात भाग घ्यायला तुम्ही या गावात जन्मलेले तरी असायला हवेत किंवा किमानपक्षी २० वर्ष इथले रहिवासी असायला हवेत. हा जर्मन नियम अगदी काटेकोरपणे पाळला जातो. आधी नाटकांत फक्त ख्रिश्चन्सना भाग घेता येई, इतक्यातच इतर धर्मीयांनाही ती परवानगी दिली गेली आहे. नाटकाच्या वर्षभर नटसंचाला कामावरून भरपगारी/ बिनपगारी रजा घ्यावी लागते. या प्रयोगाची सुरुवात करण्याआधी सगळय़ांनी जेरुसलेमला जायचं असतं. नाटकाचे सेट्स वगैरेही गावातच बनवले जातात. मुख्य म्हणजे पात्रांनी आधल्या वर्षांपासून केस कापायचे नसतात. मध्ययुगात असत तसे लांब ठेवायचे असतात. ऑक्टोबरमध्ये प्रयोग संपले की ते कापण्याची मुभा असते. एकावेळी ६०० नट-नटय़ा मंचावर मावू  शकतील एवढा तो प्रशस्त असतो. जीजसला क्रूसावर चढवावं हा निर्णय सुनावताना हजारेक पात्रं दाटीवाटीने मंचावर असतात. यातील समूहगीतं गाण्यासाठी स्थानिक चर्चमधलाच कॉयर असतो. नाटकांत साधारण दोन तास अधूनमधून येणारं संगीत असतं. काही प्रसंगात मंचावरून जाणारे भव्य १३ टॅब्लॉजही असतात. जसं की, ख्रिस्ताच्या जन्माआधीचा  त्याच्या आईवडिलांचा प्रवास, ख्रिस्ताचे पुनरागमन वगैरे. आजकाल या प्रयोगात ज्यू घरांमध्ये धर्माचं प्रतीक म्हणून असतो तसा मेणबत्त्यांचा सोनेरी मेनोरा ख्रिस्ताच्या घरात आणि ‘लास्ट सपर’च्या प्रसंगी टेबलावर मांडला जातो म्हणे. हे अर्थातच नाझी काळात शक्य नसणार. त्यातून हा नाटय़प्रयोग हिटलरचाही प्रिय! प्रयोगाच्या मध्यंतरात जवळच्याच ‘आल्टे पोस्ट’ किंवा कॅफे मॅक्सिमिलियनमध्ये जाऊन जुन्या बव्हेरिअन पद्धतीचे जेवण घेता येते. काळी  बिअर, श्नीटझेल, मॅशड पोटॅटोज किंवा केक्स. तेही एकंदर वातावरणनिर्मितीला मदत करत असणार. 

Advertisement

हेही वाचा >>> कलास्वाद : रंगानंदात रंगलेली कलावंत

इथे बाहेरूनही गावातल्या घरांसारखं सजवलेलं लहानसं तीनमजली कलासंग्रहालय आहे. सगळी दालनं एकमेकांशी जोडलेली. त्यात मुख्यत: या नाटय़प्रयोगाशी संबंधित वस्तू इथे पाहायला मिळतात. म्हणजे सेट्स, कपडे, नेपथ्याचं सामान, छायाचित्रं आणि गावकऱ्यांच्या कलाकुसरीच्या विशेषत: लाकडी वस्तू. गावाचा पिढीजात व्यवसाय सुतारकामाचा. त्याचं आधुनिकीकरण झालं असलं तरी तो अजूनही काही कुटुंबात टिकून आहे. त्यातल्या शोकेसेसमध्ये गेल्या ४००-४५० वर्षांतल्या ५००० हून आधिक कलावस्तू लावलेल्या दिसतात. एके ठिकाणी दोरखंडासारखं वळून ठेवलेलं काही तरी दिसलं. माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून तिथल्या एका गृहस्थांनी सांगितलं की, हे ऑक्टोबरमध्ये प्रयोग संपल्यावर कापल्या जाणाऱ्या केसांचे वळून बनवलेले मजबूत दोर आहेत. संग्रहालयात काम करणारी माणसंही ‘नोकरी करणारी’ वाटत नाहीत, अगदी आपल्याच घरात अकृत्रिमपणे वावरताना दिसणाऱ्या कुटुंबीयांसारखी दिसतात. त्यात इथे एक छोटंसं साधंसं प्रेक्षागृह आहे, त्यात नाटकासंबंधी आणि नाटकाचे अंश दाखवणारी फिल्म दाखवतात. प्रत्यक्ष प्रयोगाची मजा त्यात नसली तरी दहा वर्षांनंतर नाटय़मंचावर उभं राहणारं भव्य नाटय़ कल्पिता येतं. थोडंसं आपल्याकडल्या कथकलीसारखं? पण कथकलीत रामायण किंवा महाभारतातला एखादाच प्रसंग घेऊन त्यावर वैयक्तिक सुधारणांची सूट घेऊन ६-७ तास नाटय़प्रयोग चालतो, इथे जीजसचा जन्म, जीवन कार्य, त्याने आणि त्याच्या अनुयायांनी केलेले चमत्कार, ज्यूडाससारख्या प्रिय अनुयायाने केलेला विश्वासघात, मृत्यू आणि पुनरागमन हा संपूर्ण जीवनपट उलगडला जातो.

Advertisement

या नाटकाचे प्रयोग वेगवेगळय़ा वर्षी जगभरातून आवर्जून पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांत स्पेन आणि स्वीडनच्या राण्या, ज्यॉं पॉल सात्र्, सिमोन दे बोव्हा, जर्मन संगीतकार स्ट्रॉस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर  प्रभृतींबरोबर आपल्या रवींद्रनाथ टागोरांचाही  समावेश आहे, हे ऐकून फारच आनंदले. संग्रहालयात या नाटय़प्रयोगाचा अगदी सुरुवातीपासूनचा  इतिहास अनेक छायाचित्रं आणि कागदपत्रं यांसह जपून ठेवण्यात आला आहे, तो आता जिज्ञासू त्यांच्या वेबसाइटवरही बघू शकतात. ३८८ वर्षांपासूनची नाटय़परंपरा आणि तो बघायला आजची तंत्रविज्ञानाने शक्य झालेली जगाच्या कानाकोपऱ्यातली खिडकी म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहे!

arundhati.deosthale@gmail.com

AdvertisementSource link

Advertisement