अभिजात : लूव्र एक अजरामर सौंदर्ययात्रा


सौंदर्यानुभवात निखळ अभिजाततेचं असं साम्राज्य असेल ना, तर त्याची राजधानी असणार ‘दि लूव्र’!

Advertisement

अरुंधती देवस्थळे [email protected]

अरुंधती देवस्थळे.. इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या अभ्यासक. प्रकाशन व्यवसायात सरकारी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपमेंट क्षेत्रांत कार्यानुभव. युनेस्कोच्या दोन प्रकल्पांत काम. बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थांमध्ये काम केल्याने अनेक देशांत भ्रमंती. कला आणि बालसाहित्यातील शोधकार्यासाठी युनिव्हर्सिटीज्च्या फेलोशिप्स. इंग्रजी, हिंदी आणि मराठीत लेखन व अनुवाद. सध्या हिमालयातील एका खेडय़ात वाचनालयांचे नेटवर्क चालवत साक्षरतेचे कार्य करतात.

Advertisement

सौंदर्यानुभवात निखळ अभिजाततेचं असं साम्राज्य असेल ना, तर त्याची राजधानी असणार ‘दि लूव्र’! पॅरिसचा आत्मा म्हणवणाऱ्या लूव्रचा आवाका शब्दांत न मावणारा. ते फक्त कलासंग्रहालय नाही, कलाइतिहासात बरंच काही आहे. इसवी सनापूर्वी काही हजार वर्ष ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतची, ६०,६०० चौरस मीटर्समध्ये मांडलेली अभिजात कला कर्मचारी आणि कलाक्षेत्रातील मोजकेच जाणकार सोडता कोणी संपूर्ण व्यवस्थित पाहिली असेल अशी शक्यता कमीच. लूव्रवर काहीच भेटींच्या आधारे बोलणं म्हणजे धारिष्टय़ाचंच. कदाचित अप्रस्तुतही. ‘हत्ती आणि सहा आंधळे’सारखाच हा प्रयत्न आहे. संग्रहाची समृद्धी अपरिमितच आहे. त्यात अनेक कसोटय़ा लावून निवडलेल्या ३८,००० च्या वर कलाकृती आणि कलावस्तू दर्शकांसाठी अभिरुचीपूर्ण पद्धतीने मांडल्या आहेत. त्या मोजक्या वेळात किती आणि कशा बघता येतात, इतुकाच प्रश्न! आस्वादकांना आणखी एक ओढ म्हणजे पहिल्यानंतरच्या प्रत्येक भेटीत आधीच्या आवडलेल्या मास्टरपीसेसना जरासं न भेटता पाऊल पुढे पडत नाही. अभ्यासकांना मात्र प्राथमिकतांनुसार वेळ शिस्तशीरपणेच वापरावा लागतो. जगातल्या कलासंग्रहालयांच्या यादीत लूव्र आकाराने तिसऱ्या क्रमांकावर असलं तरी गुणवत्तेत त्याला कला- इतिहासात ‘अमृतातेहि पैजां जिंके’ हे स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण १७९३ मधल्या त्याच्या सुरुवातीपासून अनेक बरेवाईट प्रसंग झेलूनही याचं सौंदर्य कलेकलेनं वाढतच राहिलं आहे. मानवनिर्मित सौंदर्य कालजयी असू शकतं हे सिद्ध करणारं हे एक अत्यंत देखणं उदाहरण.

असं नेमकं काय असावं या राजस संग्रहालयात, की करोनाकाळ वगळता रोज १५,००० च्या जवळपास दर्शक इथे येत असतात? त्यापैकी ७०% प्रवासी जगाच्या कानाकोपऱ्यांतून. जगात जो भी ‘नामवाला’आहे, मग तो कलाक्षेत्रातील नामवंत असो की राजकारणातले अगदी हिटलरपासून ते जेसिन्दा आर्डनपर्यंत पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्ष वगैरे नेते, फिल्म स्टार वा खेळाडू इथे एकदा तरी हजेरी लावतातच. वान गॉग, पॉल गोगँ, सेझाँ, मार्क शगाल, मात्तीस ते जॉर्जिया ओ कीफ आणि फ्रिडा काहलो यांसारखे अनेक चित्रकार इथे ओल्ड मास्टर्सची चित्रं पाहायला वारंवार येत असत. विसाव्या शतकात लूव्रजवळच्या  कॅफेज्मध्ये कलाकारांचे अड्डे असत. विख्यात स्विस चित्र आणि शिल्पकार आल्बेर्तो जूकोमेत्तीने कामासाठीच्या भेटी धरून लूव्रची तब्बल ५०,००० वेळा तीर्थयात्रा केलेली! रोजच्या येणाऱ्या गटांमध्ये युरोपातील दोन-चार शाळा- कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. इथवर म्हटलं जातं की, जो फ्रान्समध्ये जन्मतो तो देशाचा नागरिक म्हणवण्यासाठी त्याने लूव्र आणि नोत्रदामची सांस्कृतिक वारसा जाणणारी यात्रा केलीच पाहिजे! एखादं कलासंग्रहालय राष्ट्रीयत्वाची ओळख बनणं हे भाग्य देशाचं.. आणि नागरिकांइतकंच लूव्रचंही! अशी अलिखित परंपरा फ्रेंच संस्कृतीतच जन्माला येऊ शकते आणि पिढय़ान् पिढय़ा जतन होऊ शकते. काय आहे लूव्रच्या जन्माची कहाणी?

Advertisement

बाराव्या शतकात लूव्र- फ्रान्सचा राजा दुसऱ्या फिलीपने सेन नदीकिनारा आणि किल्ला परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली मजबूत तटबंदी होती. नंतर १५-१६ व्या शतकांत फ्रेंच रेनेसाँचं तंत्र आणि शैली वापरून बांधला गेलेला, राजाचं वैभवशाली निवासस्थान असणारा लूव्र राजवाडा म्हणजे आताचे कलासंग्रहालय. या दोन वेगवेगळ्या काळात भिन्न उद्देशाने बांधल्या गेलेल्या गोष्टी आजही शेजारी उभ्या आहेत. एकमेकींत मिसळल्यासारख्या. लूव्र राजवाडा आणि भोवतालच्या विस्तीर्ण ट्विलरी आणि कॅरूसेल गार्डन्स यांमध्ये प्रत्येक राजवटीत डागडुजी आणि बदल करण्यात आले; आणि आतल्या सजावटीतही! ग्रांद गॅलरीत भिंतींवर आधी वस्तू, चित्रं आणि शिल्पं मिसळून लावलेली होती असं फोटोंवरून दिसतं. विसाव्या शतकाच्या मध्यावर त्यांची सध्याच्या ‘व्हाइट क्यूब’ धाटणीवर पुनर्माडणी करण्यात आली. साधारण २०० वर्ष राजवाडा असलेल्या, रू दि रिवोलीवरल्या लूव्रच्या तीन विंग्जना ‘डेनन’, ‘रिशलियू’ आणि ‘सली’ ही नावं दिलेली असून, तिघांना प्रत्येकी ६५-७० दालनं आहेत. थोडक्यात हे की, मागच्या बाजूला असलेल्या सलीमध्ये लूव्रच्या अगदी पहिल्यापासून असलेल्या कलावस्तू आहेत. जुन्या जगात नेणाऱ्या, त्याकाळचे स्थापत्य दाखवणाऱ्या भिंती आणि बांधकामासकट. इथून थोडा बागेचा हिस्सा दिसतो. मांडणी अर्थातच सुंदर. अभ्यासकांसाठी पद्धतशीर ‘टाइम ट्रॅव्हल’ करून भूतकाळात नेणारी. उजवीकडे डेननमध्ये पहिल्या मजल्यावर भव्य पेंटिंग्ज आणि १७-१८ व्या शतकातील डच आणि बेल्जियन तैलचित्रं, पोट्र्रेट्स आणि मुख्य म्हणजे १९ व्या शतकातल्या फ्रेंच आणि इटालियन पेन्टिंग्जची गॅलरी. मार्क ट्वेनच्या शब्दांत सांगायचं तर, ‘यात एकदा शिरलात की पुढे मैलोन् मैल अजरामर पेंटिंग्ज आहेत..’ तर डावीकडे रिशलियूमध्ये ग्रीक, इटालियन आणि रोमन शिल्पकला आणि इजिप्शियन प्राचीन कलावस्तूंचं राज्य. एकंदर आठ क्यूरोटोरिअल विभाग!

या राजवाडय़ात सन किंग चौदावा लुई आणि काही राजवटींनंतर आलेला, अदम्य महत्त्वाकांक्षेइतकाच कमालीचा कलासक्त असणारा नेपोलियनही राहत असे. दोघांनी आपापल्या कारकीर्दीत इथल्या मूळच्या राजवाडय़ाच्या संग्रही असलेल्या ५३७ ऐतिहासिक भव्य तैलचित्रांत प्रूशिया (जर्मनी), ऑस्ट्रिया, स्पेन आणि पोलंडसारख्या देशोदेशींची शेकडो चित्रं आणि शिल्पं लुटून आणून भर घातली. नेपोलियनबद्दल इतिहास सांगतो की, त्याचं कलेचं वेड आणि जाण जोखून अनेक देशांचे राजेमहाराजे त्याला खूश ठेवण्यासाठी आपल्या देशातली उत्कृष्ट चित्रं व कलावस्तू भेट करत असत. युद्धात पराभूत राजाशी तहाची बोलणी होत, त्यात त्यांनी अमुक एक आकडा कलाकृती जेत्याला- म्हणजे नेपोलियनला बहाल करायच्या असेही एक कलम असे. राजघराण्यात कलाप्रेम इतके मनस्वी, की १५ व्या शतकाच्या सुरुवातीला राजा फ्रान्सवा याने तर इटलीहून लिओनार्दो द विंचीला दीर्घ मुक्कामासाठी फ्रान्समध्ये आमंत्रित करून त्याच्याकडून चित्रं काढून घेतली. लिओनार्दोनं त्याच्या आयुष्याची शेवटची तीन वर्ष फ्रान्सच्या राजवाडय़ाजवळच्या एका किल्ल्यात काढली. बहुचर्चित ‘मोनालिसा’चा जन्म याच दरम्यानचा. तिची तीन-चार नावं आहेत. मूळ नाव ‘ए फ्लोरेनटाईन लेडी.’ फ्रान्सवाला फारच पसंत पडलेली ही गूढ भासणारी सुंदरी राजसत्ता संपल्यावर नेपोलियनची झाली आणि मग लूव्रकडे सुपूर्द करण्यात आली. ३०ह्णह्ण  ७ २१ह्णह्ण फ्रेममधली मोनालिसा आणि तिचं ते अर्धस्मित यांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नांत अनेक कविता, लेख, गोष्टी जगभर लिहिल्या गेल्या. पॉल सेझाँ, रेने माग्रीते, दालीसारख्या कलाकारांनी चित्रं, शिल्पं बनवली, हे विशेषच! तिच्यावर लिहिलेल्या उपहासात्मक कृतींची संख्याही कमी नाही. आणि तरी ती आजही दर्शकांसाठी एक जबरदस्त आकर्षण आहे, हे मानायलाच हवं. बाईंचा पत्ता : पहिल्या मजल्यावर डेनॉन विंग, कक्ष क्रमांक ७११. त्या एकटय़ा नसतातच बहुतेक वेळा. कोणी ना कोणी दर्शक समोर उभा असतोच. ‘हाच तो क्षण’ हे अनुभवत डवरलेल्या मुद्रेनं, किंवा प्रश्नार्थक मनानं. मोनालिसाच्या निमित्ताने सांगायचं तर कडेकोट बंदोबस्त असूनही लूव्र चोरांपासून सुरक्षित नाही राहू शकत. २०११ मध्ये खुद्द  ‘मोनालिसा’  अपहरण झाल्याने बेपत्ता होती. लूव्रमध्येच काम करणाऱ्या  इटालियन कर्मचाऱ्याने दोन मित्रांच्या मदतीने पळवून ती इटलीत नेली होती. त्याचा पैसे कमावण्याचा उद्देश नव्हता, हे विशेष. त्याला तीव्रतेने वाटत होतं की मोनालिसा तिच्या मूळ देशात एखाद्या प्रतिष्ठित संग्रहालयात असायला हवी. दोन वर्ष लपवून, गुप्त ठिकाणी ठेवून, एके दिवशी तो एका संग्रहालयाकडे तिला सोपवायला घेऊन गेला तेव्हा िबग फुटलं. तेथील अधिकाऱ्यांनी ती कुशलतेने हस्तगत केली आणि नंतर- म्हणजे अडीचेक वर्षांनी ती लूव्रमध्ये परतली. तीही एक सुरस आणि मनोरंजक कहाणी आहे. पण त्यानंतर तिच्या दर्शकांची संख्या आणखीनच वाढली. तिचं मोल पैशात करायचंच झालं तर ते आता ७०० मिलियन डॉलर्स असल्याचं कळतं. अशा चोऱ्या लूव्रमध्ये होतच आल्या आहेत. पण लूव्रचं भाग्य हे की अशांपैकी अनेक कलाकृतींमागचा लूव्रचा अमीट शिक्का त्यांना कोणाकोणामार्फत परत घेऊन येतो.

Advertisement

तर नेपोलियनच्या अधिपत्यात स्पेनचे राजवाडे, किल्ले, चर्चेस आणि सरदारांच्या घरांतून हजारहून जास्त पेंटिंग्ज वसूल करण्यात आली. त्यात इसवी सनपूर्व काळातील ‘क्वाद्रीगा’ या रोमन पुराणातल्या देवांच्या चार घोडय़ांच्या रथाच्या शिल्पाचा समावेश होता. छोटय़ाशा ऑस्ट्रियातून २५० चित्रं बळकावली गेली. इटालियन रेनासान्सकालीन चित्रकार टिईशनने चितारलेली भव्य ‘पोट्र्रेट ऑफ अ  लेडी’, ‘एनटूम्बमेन्ट ऑफ ख्राइस्ट’ आणि ‘वूमन विथ या मिरर’ ही खंडणीचाच भाग. या चित्रातील स्त्रिया घरंदाज, गोल चेहऱ्याच्या आणि गुटगुटीत, बाळसेदार आहेत, हेही नोंद घेण्यासारखं. सौंदर्याच्या कल्पनांची बदलत जाणारी परिमाणं.. आपणा सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कुठला अनुभव आपण अगदी घ्यायचाच हे ठरवून, स्वत:ला कबूल केलेली! उत्कट स्वप्नांचे रोडमॅप्स शोधून ठेवायचे असतात, कारण सहजसाध्य नसतंच काही. प्रेम आणि कलेचं प्रतीक असलेलं पॅरिस खूप काही ऐकल्या-वाचल्यामुळे बघणं अनेकांच्या संकल्पात असतं. पॅरिसमध्ये दाखवलं जातं त्यातलं एखाद् दुसरं  स्थळ पाहून घ्यावं.. पण हे शहर  पायी भटकत आपल्या आत उतरवून घ्यायची चीज आहे. अनेक जण पर्यटन कंपन्यांबरोबर पॅरिसयात्रा करतात. ते लोकांना शांजेलिजेमधली खरेदीची दुकानं, डिस्नी लँड वगैरे दाखवू पाहतात. पण बाकी सगळं विसरून जगातल्या सर्वोत्कृष्ट कलासंग्रहालयात- म्हणजे लूव्रमध्ये दिवस घालवावा.. ते पाहिल्यावर  इथली बाकी प्रेक्षणीय स्थळं न पाहिली तरी काही बिघडत नाही. काही अनुभव ‘उरकून टाकण्यासाठी’ नसतातच घ्यायचे. डॉम पेरीयॉनचा एक ग्लास की मर्लोचे चार, हा निर्णय काहींसाठी सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो.. काहींना तो सुजाणपणे करावा लागतो. ही लेखमालिका सुदैवाने माझ्या वाटय़ाला आलेल्या लूव्रचे ‘गुण गाईन आवडी’ म्हणून सुरू होतेय. काम आणि मजा दोन्ही करत मिळालेला मॉनेंची गिव्हर्नी, वेनिस त्रिनाले, कांदिंस्की आणि गॅब्रिएला मुन्टर यांचं नातं आणि म्युझिअम झालेलं घर, पिकासोच्या बायकोशी  स्टुडिओत भेट..  प्रत्येक अनुभव या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यालायक! आयुष्यातल्या तमाम बऱ्या-वाईटाचा विसर  पाडून फक्त सृजनशीलतेच्या सोहोळ्यात वेधून टाकणारी ही सौंदर्ययात्रा अनुभवण्याची संधी प्रत्येक रसिकाला मिळावी, एवढंच! (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement