अभिजात: इये बिनालेचिये नगरी.. व्हेनिस!! | Classic city Binalechie Venice art world zeitgeist Program Enthusiasm Cultural art schools amy 95अरुंधती देवस्थळे

Advertisement

दर दोन वर्षांनी भरवला जाणारा ‘व्हेनिस बिनाले’ म्हणजे कलाजगतासाठी पंढरीच्या वारीचा मौसम! बिनालेला अनेकदा कलेचं zeitgeist म्हटलं जातं.. म्हणजे समकालीन कलेचं ‘घागर में सागर’सारखं प्रतिबिंब! प्रशस्त हॉल्स, उत्तम सजावट, सुनियोजित प्रकाशयोजना, अंगणात छोटय़ा रंगीबेरंगी राहुटय़ा, झेंडे, सादरीकरणासाठी रंगमंच, फिल्म्स आणि संगीतासाठी प्रेक्षागृहे, मोक्याच्या जागी भव्य फलक आणि दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम.. इथे येणाऱ्यांच्या डोळ्यात उत्साह, मिळालेल्या मोजक्या दिवसांत आपल्याच क्षेत्राची नव्हे, तर ज्यात रुची असेल ते जमेल तितकं बघून घेण्याची धडपड.. कला खुलेपणाने लोकांना एकत्र आणते या सुंदर, आशादायी सत्याचा चालता-बोलता अनुभव. आशादायी अशासाठी, की वर्ण/ भाषा/ संस्कृतीविषयक उथळ अभिमानाची कात टाकलेलं, हे नव्याने उभरताना दिसणारं जग आता पूर्वीसारखं कप्प्याकप्प्यांचं राहिलेलं नाही हे पदोपदी जाणवत राहतं. आर्ट स्कूल्समधले दाखले ते बिनाले सगळीकडेच मिश्र सांस्कृतिक वातावरण आहे.. म्हणजे अमुक एक कलाकार मूळचा एका देशातला, शिकला दुसऱ्या देशात आणि आता काम तिसऱ्याच देशात करतोय, हे आम दृश्य! परिमाण म्हणा वा चलन- सर्जनशीलतेचा कसच स्थान ठरवणारा. वैविध्याचा मन:पूर्वक सन्मान करणारी, दुसऱ्याला जाणू पाहणारी, व्याख्येत न मावणारी, निरोगी सौंदर्यदृष्टी वातावरणात भरून राहिलेली. लोकांचे इंद्रधनुषी पेहरावही मजेदार. बोहेमियन तऱ्हेवाईकपणा ते बिझनेस सुट्स. विविध रंगांची, भाषांची माणसं एकमेकांत बेमालूम मिसळलेली.
तसे तर आता जगभरात स्थानिक हवामानानुसार वार्षिक प्रदर्शनं, कलामहोत्सव बिनाले/ त्रिनाले चालूच असतात. जसं की- व्हिटनी (अमेरिका), शारजाह (मध्य-पूर्व) किंवा सिडनी (ऑस्ट्रेलिया) वगैरे. जर्मनीत दर पाच वर्षांनी आयोजित होणारा ‘Documenta 5’- जो कासेल शहरभर पसरलेला आणि घसघशीत बजेट असलेला, मुख्य म्हणजे टिपिकल जर्मन व्यवस्थितपणात आयोजित होणारा. पण व्हेनिस बिनाले तो व्हेनिस बिनाले. त्याच्या तमाम गुणदोषांसह कलाजगताच्या इकोसिस्टीममध्ये पाय घट्ट रोवून उभा!! आर्थिक विवंचनांशी कायम झगडणारा, आयोजनात जरा ढिसाळच असलेला, ‘गोल्डन लायन’ या कलेतील श्रेष्ठत्वासाठी दिल्या जाणाऱ्या सन्मानाच्या निवडीवरून किंवा सध्या जिचा ‘टेट’मध्ये पस्र्पेक्टिव्ह चाललाय त्या यायोयी कुसुमांसारख्या शिल्पकार इन्स्टॉलेशन्स करणाऱ्या मातब्बर कलाकाराचा बिनालेत अनाहूत शिरकाव करून दिल्यावरून वादविवादाच्या भोवऱ्यात अडकणारा आणि तरी या सर्वाची ‘मामा मिआ’ म्हणा की मायमाऊली- आपलं स्थान आणि १२७ वर्षांचा वारसा राखून असणारा..
बिनालेची सुरुवात इथे एक कलाप्रदर्शन म्हणून १८९५ मध्ये झाली. त्या काळात उपलब्ध प्रसार माध्यमे अगदीच मर्यादित. प्रयोगशील असूनही दोन लाखांवर कलाप्रेमी तिथे उत्साहाने एकत्र झालेले पाहून हा महोत्सव भरत राहावा असा सर्वमुखी निर्णय झाला. अर्थात कलेचा व्यवहार/ व्यापार आणि पर्यटन हे दुहेरी आर्थिक हेतूही त्यामागे होतेच. मधली काही वर्ष तो दरवर्षी भरवायचाही बूट निघाला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यात सहा-सहा वर्ष आणि अलीकडे करोनाकाळातही खंड पडला. पण गेली काही दशकं मात्र त्याचं वेळापत्रक म्हणजे दोन वर्षांतून एकदा आणि सहा महिन्यांचा कालावधी कायम राहिला आहे.
कोविडने पडलेल्या खंडानंतर यंदा २३ एप्रिल ते २७ नोव्हेंबरदरम्यान भरणाऱ्या या ५९व्या कलासोहोळ्यात ज्येष्ठ आणि नव्या दमाचे कलाकार, संगीतकार, नृत्यकर्मी, आर्किटेक्ट, नाटक-सिनेमावाले, म्युझियम्सशी संबंधित जाणकार, कलासंग्राहक, क्युरेटर्स, समीक्षक, अभ्यासक, कलाशिक्षक आणि त्यांचे विद्यार्थीगण आणि अर्थातच रसिकजन जगातील अगदी प्रत्येक देशातून इथे कधी ना कधी येत असतात. प्रत्येक कलेसंबंधी राखीव दिवस वर्षांच्या सुरुवातीलाच जाहीर झाल्याने आपण कधी जायचं हे त्या- त्या कलेच्या संबंधितांना ठरवता येतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना काही मोजके दिवस मुक्त प्रवेश असतो. बिनालेची दोन प्रमुख स्थळं : ज्योर्दिनी (गार्डन) आणि आर्सेनल. ऐन व्हेनिसमध्ये हिरवळ आणि हिरवाईने भरलेल्या एकमेव ज्योर्दिनीचाच एकूण विस्तार ४२,००० स्क्वे. मीटर्सचा. आजूबाजूला विस्तीर्ण बाग- म्हणजे कलेच्या दुष्मनांची (तसं व्हेनिसमध्ये नसणार म्हणा फारसं.) आरडाओरड नको की, काय हे कलाप्रदर्शनांनीच सगळी जागा व्यापली.. मुलांनी खेळायचं कुठे? आम्ही फिरायचं कसं? वगैरे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाटय़ आणि सिनेमा कलेमागोमाग आर्किटेक्चरचाही बिनालेत समावेश झाला आणि नवीन देशांचा सहभाग वाढतच राहिला. या वर्षीही पाच नवे देश यात सामील होणार आहेत. जागा कमी पडायला लागली म्हणून काही वर्षांपूर्वी बंदराचे प्रशस्त शिपयार्ड आर्सेनाले हेही बिनालेच्या आयोजनाचे आणखी एक स्थळ बनवण्यात आलं. इथे आता मागाहून सामील झालेल्या २५ देशांचे स्थायी पॅव्हिलियन्स आहेत. आपला भारत दरवर्षी भाग घेतो, पण अजून व्हेनिस बिनालेत आपला राष्ट्रीय पॅव्हिलियन नाही. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे सध्याच्या यादीत एकमेव भारतीय नाव म्हणजे पुण्याचे आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेले चित्रकार प्रभाकर पाचपुते. त्यांच्या कलेबद्दल, चित्रं आणि इन्स्टॉलेशन्सबद्दल आपण सगळ्यांनी जाणून घ्यायलाच हवे. या बिनालेतील सहा टाइम कॅप्सूल्समध्ये वेगवेगळ्या कलाकारांच्या कलाकृती भविष्यकाळासाठी सांभाळून ठेवण्यात येणार आहेत. त्यात दिल्लीच्या जलरंग, ब्रॉन्झ आणि मेण या माध्यमांतून निसर्गाचे विन्यास टिपणाऱ्या मृणालिनी मुखर्जीच्या (१९४९-२०१५) कलाकृतीचा समावेश आहे. पण दुर्दैवाने हा सन्मान त्यांना त्यांच्या हयातीत बघता आला नाही.
यावेळची थीम असणार आहे- ‘दि मिल्क ऑफ ड्रीम्स’! कलामहोत्सव- तोही व्हेनिसमध्ये- अशी भावना जनमानसात असल्याने कलाजगतातल who’ s who आणि what’ s what इथे हजेरी लावतात. बिनालेचे क्युरेटर एखाद् दोन अपवाद वगळता इटालियनच असतात. बहुतेक आर्ट गॅलरी किंवा म्युझियममध्ये किंवा आपापल्या क्षेत्रांत कलाइतिहासाचे अनुभवी अभ्यासक. त्यांना बजेट देऊन पूर्वतयारी आणि आराखडा तयार करायला दोन वर्ष दिली जातात. यावर्षी २५००० कलाकार, कलासंग्राहक, संग्रहालये, क्युरेटर्स, पत्रकार आणि अर्थातच आम जनतेचा सहभाग अपेक्षित असून, सहा लाख तिकिटं विकली जातील असा अंदाज आहे. १९३०च्या दशकात संगीत, नाटक आणि चित्रपट बिनालेत दाखल करून घेतले गेले. १९८०मध्ये आर्किटेक्चर आणि शतकाअखेर नृत्याचाही समावेश झाल्याने बिनाले समृद्ध होत गेला खरा, पण त्याचा व्यापही अवाढव्य झाला. आता चित्रकला, शिल्पकला, पॉप आर्ट (अमेरिकेचं योगदान), संगीत, नृत्य, सिनेमा आणि आर्किटेक्चर यांना वेगवेगळे निर्देशक आहेत. सहा महिने चालणाऱ्या या जत्रेत प्रत्येक कलेला वेगवेगळे कालावधी देऊन कॅलिडोस्कोप फिरता ठेवला जाणार आहे. म्हणून आता बिनालेचे आर्थिक नियोजन हा विश्वव्यापी चर्चेचा आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासाचा विषय बनला आहे. ‘सदबीज’ आणि ‘क्रिस्तीज’ या कला- व्यवसायातील आंतरराष्ट्रीय जुन्या, मातब्बर दलाल कंपन्या तर मोठी टीम घेऊन मैदानात उतरत असतात. यांचा कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार लाखो अमेरिकन डॉलर्स किंवा ब्रिटिश पौंडांखाली नसल्याने त्यांच्या बैठकांना अतिशय काटेकोर खलबतांचं स्वरूप असतं. या दोन्ही संस्थांनी आता अनेक कोर्सेस सुरू केलेत.. ऑनलाइनसुद्धा! त्यामुळे कला-व्यवसायात जाऊ इच्छिणाऱ्यांना अनेक सुसंधी मिळू शकणार आहेत. कलाकाराची जिंदगी बनवण्याचं सामथ्र्य या एका कलाजत्रेत असतं.
व्हेनिसचं एक वैशिष्टय़ आहे की ते दीडेक हजार वर्षांपूर्वी समुद्राच्या लॅगूनकाठी दलदलीचा उपसा करून त्यावर लाकडाची पायाभरणी करून वसवलं गेलं आहे. म्हणून तर त्याला ‘सिटी ऑफ वॉटर’ किंवा ‘सिटी ऑफ ब्रिजेस’ असंही म्हटलं जातं. पाण्यावरून जाणाऱ्या वॉटर बसेस आणि वॉटर टॅक्सीज् इथेच पाहिल्या मी प्रथम आणि त्यांचं अप्रूप अजूनही मनात असतंच. पण यात दरवेळेला येणारं आव्हान म्हणजे महोत्सवासाठी बाहेरचा दर्शनी भाग बनवणं. सतत येणाऱ्या खाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे दर्शनी उभारणी टिकूच शकत नाही. फार काय, तर भरतीच्या वेळी वर्षांतून तीन-चार वेळा सगळ्या बाजारपेठेत पाणी भरण्याचे प्रसंग येतात. त्यापासून दुकाने सांभाळायची व्यवस्था मालकांनी केली आहे. एकदा कधीतरी स्टुलांवरून इकडून तिकडे जायचा अनुभव माझ्याही वाटय़ाला आला. मुख्य म्हणजे कोणी चिडचिडत नव्हतं. एका छोटय़ाशा दुकानदाराने तर थांबवून आग्रहाने पानिनीबरोबर (बेक्ड सँडविचसारखं!) कापुचिनो पाजली आणि थोडय़ाशा गप्पांनंतर पैसे देऊ केले तर ‘नमस्ते’ करून हसत सांगून टाकलं, ‘इथे आम्ही शिळं नाही ठेवत. या अशा हवेत कोण गिऱ्हाईक येणार? म्हणून म्हटलं, चला, ताज्या ताज्या या दोघांनाच खाऊ घालू या. आवडल्या ना?’ सांगायचा मोह आवरत नाही म्हणून. इटलीत खाण्यापिण्याची अफाट चंगळ. अनेक प्रकारचे ब्रेड्स, पास्ताज् आणि चविष्ट सॅलड्सबरोबर इटालियन वाइन्स, कंपारी किंवा प्रोसेस्को. काही नाही तर कॅफे फ्लोरिअनमध्ये बसून माणसं न्याहाळावीत. आगासी, जॉर्ज क्लूनी आणि अमलसारखी बडी माणसं इथं सहज वावरताना दिसतात. जिलेटो आइसक्रीम तर खाल्ल्याशिवाय इथून जायचंच नसतं! २०१३ मध्ये मी बिनालेला प्रथम गेले होते तेव्हा योगायोगानं मूळचे भारतीय, पण आता बर्लिनवासी असलेल्या विशेष नृत्यकार टीनो सहगलना (ते वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये थीमवर आधारित नृत्य करतात, एवढंच कळलं होतं.) ‘गोल्डन लायन’ सन्मान मिळाला होता. त्यांचं काम तेव्हा फार पाहायला नाही मिळू शकलं.. फक्त त्यांच्यावर आधारित काही चित्रफिती पाहिल्या आणि त्यातून त्यांचं नृत्यशैलींच्या वैविध्याचं फ्यूजन करणारं वेगळेपण मात्र जाणवलं. त्या वर्षी इटालियन फिल्मकार बर्नाडरे बार्तोलूची यांना ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट’ सन्मान मिळाला होता. त्यांच्या ‘दि कन्फर्मिस्ट’ आणि ‘दि लास्ट एम्परर’ या दोन केवळ अजोड फिल्म्सचा जरा वेगळ्या तऱ्हेने पुन्हा आस्वाद घेऊ शकलो. या लेखाचा उद्देश स्मरणरंजन नाही; तर ही पडदा उघडण्यापूर्वीची नांदी आहे.
arundhati.deosthale@gmail.com

Source link

Advertisement