अब तो हवा भी बिकने लगी है!


हे हवेतले, पाण्यातले वा आवाजाचे प्रदूषण- किंवा कुठलेही प्रदूषण कसे घालवायचे त्याची तांत्रिक उत्तरे सापडतील.

Advertisement

रवीन्द्र दामोदर लाखे [email protected]

जगभरातील सगळ्याच प्रदेशांत हवा, पाणी, प्रकाश आणि ध्वनी प्रदूषणाने परमोच्च पातळी गाठली आहे. हवामानबदलाचे तडाखे निरनिराळ्या निसर्गप्रकोपांतून आपण सारे अनुभवतो आहोतच. या आसमंतातील प्रदूषणाचबरोबरच माणसेही प्रदूषित झाली आहेत. त्याचेच फलित म्हणजे हे सार्वत्रिक प्रदूषण होय!

Advertisement

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून (‘डब्ल्यूएचओ’) प्रदूषणासंदर्भात अलीकडेच प्रसारित झालेले मार्गदर्शक तत्त्व असे आहे की, आधी प्रत्येक २४ तासांमागे हवेतील २.५ ढट (पार्टिक्युलेट मॅटर) इतके प्रती २५ मायक्रो ग्राम केंद्रीकरण (‘संकेद्रण’ असाही शब्द वापरता येईल.) प्रती घनमीटर  हे प्रमाण सुरक्षित मानले जाईल. तथापि ‘डब्ल्यूएचओ’ने आता म्हटले आहे की, हे केंद्रीकरण (संकेंद्रण) १५ मायक्रो ग्रामहून अधिक असेल तर ते सुरक्षित नाही. म्हणजे या तत्त्वानुसार, आजच्या घडीला संपूर्ण भारत देश हा प्रदूषित असल्याचे समजायला हरकत नाही. अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने असेही म्हटले आहे की, जगातला नव्वद टक्के प्रदेश प्रदूषणाखाली जगतो आहे.. जे अनेक प्रकारे माणसाच्या आरोग्याला घातक आहे आणि माणसाच्या आरोग्यविषयक नवीन समस्यांना जन्म देणारे आहे. (पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेतले धुलीकण, रासायनिक बाष्प वगैरेंची एकत्र घनता.. जी शुद्ध हवा व्यापून बसली आहे.)

हे हवेतले, पाण्यातले वा आवाजाचे प्रदूषण- किंवा कुठलेही प्रदूषण कसे घालवायचे त्याची तांत्रिक उत्तरे सापडतील. त्याप्रमाणे प्रदूषण करणाऱ्यांवर तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कारवायाही होतील आणि त्या काही काळ अमलातही आणल्या जातील. परंतु पुढे बडे कारखानदार किंवा त्यांत आपला पैसा ओतलेले राजकारणी याला भीक घालेनासे होतील. हे वरवरचे उपाय असेच असतात. असे उपाय प्रदूषणाची मुळे उखडून नाही काढू शकत. त्यासाठी समाजात त्याविषयीची जागरुकता निर्माण करण्याचे उपायच शोधायला हवेत. यास्तव वैयक्तिक मन आणि समाजमन प्रदूषणरहित कसे करता येईल हे पाहायला हवे. 

Advertisement

मी सकाळी उठतो आणि टूथपेस्ट टूथब्रशवर घेऊन दात घासतो. आजच्या भाषेत ब्रश करतो. तो टूथब्रश असतो प्लास्टिकचा. टूथपेस्टचा कंटेनर असतो प्लास्टिकचा. त्यातली पेस्ट संपली की मी ते कंटेनर कचऱ्यात टाकून देतो, किंवा ब्रश पुरेसा वापरून झाला की मी कचऱ्यात टाकून देतो. कचऱ्याची बादली असते प्लास्टिकची. पण या अशा कचऱ्याचे काय होते याचा विचार माझ्या मनात कधीच आलेला नसतो. डंपिंग ग्राऊंडवर जाऊन पडतात अशा प्लास्टिकच्या गोष्टी. कधी कधी डंपिंग ग्राऊंडला आग लागते, किंवा लावलीही जाते. अशा प्लास्टिकचा धूर हवा अधिकच प्रदूषित करतो.

इथे मला आठवते विनोबा आणि जोसे सारामागो यांची प्रतिगामी विकासाची संकल्पना! या संकल्पनेप्रमाणे, गरज नसलेली आणि माणसाचे नुकसान करणारी प्रगती गाळून टाकायची. तर दंतमंजन आणि हाताचे बोट यानेच घासावेत दात. त्याने हिरडय़ाही मजबूत होतात. माझी दैनंदिनी तपासून पाहिली तर मी दिवसभरात प्लास्टिकचाच जास्तीत जास्त वापर करत असतो.

Advertisement

यासंबंधीची एक छोटीशी दृष्टान्तकथा..

एक आई आपल्या लहान मुलाला चिऊ-काऊची गोष्ट सांगत जेवण भरवीत होती. तर मुलाने हातवारे करून, अर्धवट उच्चारात सांगितले की, ‘चिऊ कुठे आहे आई? मला चिऊ पाहायचीय.’ आई चिऊ शोधायला लागली तर ती काही तिला जवळ किंवा दूर कुठेच दिसेना. तिने शेवटी मोबाइलवर चिऊ दाखवली. चिमण्या नष्ट झाल्या तरी मोबाइलवर त्या असणारच आहेत. मोबाइल टॉवर्समुळे चिमण्या मरताहेत. मुलाचे वडील वर्तमानपत्र वाचणारे होते. ते म्हणाले, ‘‘हे जे मोबाइल टॉवर्स आहेत, त्यातून निघणाऱ्या रेडिएशनच्या वेव्हज्मुळे चिमण्या नष्ट होत चालल्या आहेत आणि त्यांची संख्या कमी कमी होत आहे. मी आपल्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडला, की आपल्या सोसायटीच्या टेरेसवरचे मोबाइल टॉवर्स हलवायला हवेत. त्यांतून निघणाऱ्या वेव्हज्चा माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्या वेव्हज्मुळे चिमण्या मरताहेत.. वगैरे.’’ अध्यक्ष म्हणाले, ‘‘टॉवर्समधून निघणाऱ्या वेव्हज्चा त्रास समोरच्या इमारतींना किंवा सोसायटय़ांना होणार आहे, आपल्याला नाही. आणि चिमण्या मरताहेत तर मरू दे की! नाही तरी त्यांचा काय उपयोग आहे?’’ साधारण साठएक वय असलेल्या त्या माणसाचे मन वयानुरूप प्रगल्भ न होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे आपली शिक्षणपद्धती आणि त्या माणसाच्या कुटुंबातले मानसिक, भावनिक पर्यावरण ही आहेत. वरच्या पातळीवरचे कारण हे की, देशाच्या आर्थिक धोरणांत निसर्गरक्षण आणि पर्यावरण यांचा विचार फारसा केलेला नसतो, हे. एकमेकांत मोकळेपणा किंवा खरेपणा नसल्यामुळे माणसामाणसांतील नातीही अशीच प्रदूषित झाली आहेत. अशा प्रदूषित नात्यांच्या घरातला माणूसच एखाद्या मोठय़ा यांत्रिकीकरणाच्या प्रोजेक्टचा मॅनेजर असतो. हा माणूस कसा असतो? तर तो एखाद्या हॉटेलमध्ये प्यायला बसलेला असतो आणि त्याला घरून बायकोचा फोन येतो.. ‘‘कुठे आहात?’’ तर तो सांगतो, ‘‘आताशा मी कळंबोलीपर्यंत आलेलो आहे.’’ बायकोने हा फोन सावधगिरी म्हणून केलेला असतो. तिच्या घरी तिचा मित्र आलेला असतो आणि दोघे रमलेले असतानाच तिला आठवण येते की, नवरा केव्हाही घरी पोहोचू शकतो. कळंबोली म्हणजे अजून दीड तास तरी लागतील घरी पोहोचायला त्याला. त्यामुळे मित्राच्या सहवासाचा अवधी वाढतो. अशा घरांतली मुले पुढे तथाकथित उच्च शिक्षण घेऊन देशाच्या एखाद्या व्यवस्थेत उच्चपदावर विराजमान होणार असतात.

Advertisement

कला क्षेत्रातले पर्यावरण पाहायचे झाले तर सत्ताकेंद्र ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ते स्वहितासाठी आणि त्यांच्या भजनी लागलेल्यांचे भले करण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर कारवायांनी प्रदूषित केलेले आहे. शिवाय यातले अधिक महत्त्वाचे प्रदूषण म्हणजे अंडरवर्ल्डमधली माणसे आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर करताहेत. त्यांच्या शक्तीच्या बळावर कला क्षेत्रातली काही मंडळी गुंडगिरी करून आपल्याला हवे ते मिळवताहेत. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष, विद्यापीठातला एखाद्या विषयाचा विभागप्रमुख, पत्रकार, आकाशवाणी, दूरदर्शन (सरकारी, खाजगी वाहिन्या) इथले पदाधिकारी, कलावंतांच्या निरनिराळ्या गटातटांचे प्रमुख, वाङ्मयीन समजली जाणारी साहित्यविषयक मासिके आदींच्या करतुतीचे फळ म्हणजे कला क्षेत्रातले हे एकूणच प्रदूषण! कला क्षेत्रात सर्वात जास्त प्रदूषण विशिष्ट विचारसरणीच्या लेखक-कलावंतांनी माजवलेले आहे. पुरस्कार, पदव्या आणि मानसन्मान वगैरे अशा एखाद्या विचारसरणीच्या मठाच्या ताब्यात असतात आणि त्या मठाचा अधिपती हा सर्व कारभार चालवीत असतो. प्रत्येक कला क्षेत्रात हेच चित्र आहे. ज्यातून संस्कृती फुलते त्या गोष्टीत खोटी सभ्यता घुसलेली आहे. संस्कृती फुलली, समाजात रुजली की तो समाज सुसंस्कृत होतो. सुसंस्कृत होणे म्हणजे काय, तर आपल्या जगण्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होऊ नये, हा विचार मनात बाळगून जगायला शिकणे. पण आता ते शक्य नाही. कारण हे जीवघेण्या स्पर्धेचे युग आहे. एकमेकांशी स्पर्धा करण्यात मोबाइल कंपन्या सहा महिन्यांत आपल्या कंपनीचे नवे मॉडेल आणताहेत. त्यांच्या जाहिरातींच्या ताब्यात गेलेला माणूस नव्या मॉडेलचा मोबाइल विकत घेतोय. जे मोबाइल कंपन्यांच्या बाबतीत, तेच इतर चैनीच्या आणि सुखसोयींसाठीच्या यंत्रांच्या बाबतीत आणि व्यक्तींच्या बाबतीतही!

आयटी कंपन्यांच्या कामाच्या अनिश्चित वेळांमुळे नवरा-बायकोमध्ये एकदम आठवडय़ानेच संवाद किंवा विसंवाद  घडतोय. बहुतेकदा विसंवादच! यांची मुले परदेशात स्थायिक होताहेत. आई-वडील वृद्धाश्रमात किंवा आपल्या घरात आपल्या अशक्त, जीर्ण झालेल्या देहाला जगवताहेत. समाजात असंख्य प्रकारचे अन्याय, अत्याचार घडताहेत. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर सतत कुठे ना कुठे होणारे बलात्कार. शेजारच्याला असा बलात्कार होतोय हे कळूनसुद्धा पोलिसांना घाबरून तो पोलिसांकडे जात नाही. त्याला कायद्याच्या दीर्घ प्रक्रियेत अडकायचे नाहीए. अशी आपली पोलीस आणि न्यायव्यवस्था आहे. या देशातील माणसाला जबाबदारी अंगावर पडेल अशा कुठल्याही प्रक्रियेत अडकायचे नसते. हे असे अगदी खालच्या स्तरावरचे प्रदूषण दूर झाल्याशिवाय वरच्या.. राजकारणाच्या आणि बाजारीकरणाच्या पातळीवरचे प्रदूषण थांबणार नाही. हे होणे कठीण आहे. याचे कारण आपली शिक्षणपद्धती आणि कुटुंबव्यवस्थाच अशी आहे, की जीवनदृष्टी तयार न झालेली माणसे वयाने, शिक्षणाने वाढताहेत नि मोठमोठी पदे भूषवताहेत. अशा अविचारी माणसांकडून होणारी कामे प्रदूषणवाढीला हातभार लावणारीच घडली तर यात नवल ते काय?

Advertisement

‘१९८५ च्या दुष्काळात दिग्विजयसिंह यांनी वरपासून खालपर्यंत अख्खी यंत्रणा उभी करून मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये नवी हिरवळ उभी केली. त्यामुळे या भागात मोठा बदल घडून आला. अडीचशे कोटींच्या निधीतून त्यांनी आठ हजार गावांतील तीन कोटी हेक्टर जमिनीत पाणलोट विकासाची कामे उभी केली. दिग्विजयसिंह यांच्या यंत्रणेचा अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल की, संपूर्ण योजनेची रक्कम थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचली. गावकऱ्यांना या कामाशी जोडून घेण्याचा, सरकारी यंत्रणा लोकाभिमुख बनविण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयोग म्हणता येईल. मध्य प्रदेशात इतका मोठा प्रकल्प राबवला जात होता, परंतु त्याकडे प्रसार माध्यमांनी ढुंकूनही पाहिलं नाही.’ (‘करके देखो’ या पुस्तकातील अनिल अगरवाल यांच्या लेखातून.)

या देशामध्ये अनिल अगरवाल यांच्यासारखी एकेकटय़ाने कामे करणारी अनेक माणसे आहेत. वंदना शिवा, सुनीता नारायण, अभय बंग, पी. साईनाथ, राजा रामण्णा, योगेन्द्र यादव, जल पुरस्कार आणि रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले राजेन्द्र सिंह.. शिवाय तरुण पिढीतही अशी कामे करणारी अनेक मुले आहेत, ज्यांच्या आशेवर आपण जगू यात.

Advertisement

माझे घर नदीच्या तीरावरच होते. नदी गायब झाली. माझे घर डोंगराच्या पायथ्याशीच होते. डोंगर चोरला कुणीतरी. माझ्या घराभोवती मोठ्ठी बाग होती. आता बाग इमारतींच्या खाली आहे.

यातल्या कुठल्याही उणिवेवर दु:ख व्यक्त करायला वेळ आहे कुणाकडे? प्रत्येकाचे घर वेळेच्या तीरावर, वेळेच्या पायथ्याशी आहे.. घराभोवती वेळेची बाग आहे.

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement