अनाहत नाद : अभिनयाची कोडी.. गाण्यांनी सोडवली!



दिलीप प्रभावळकर – response.lokprabha@expressindia.com
अगदी लहानपणापासून मी लतादीदींना ऐकत आलो आणि आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर त्यांच्या स्वरांनी मला दिलासा दिला. जाणते-अजाणतेपणी लतादीदींच्या स्वरांची अखंड आणि अतूट साथ लाभली. त्यांचे स्वर माझ्या वेगवेगळय़ा वयातील वेगवेगळय़ा मानसिक अवस्थांचे साक्षीदार आहेत. अगदी बालसुलभ भावनांपासून, पौगंडावस्था, तारुण्य आणि आयुष्यात येणारं कारुण्य या सगळय़ात लतादीदींच्या गाण्याने मला साथ दिली. त्यांची गाणी थेट हृदयाला स्पर्श करतात.

Advertisement

माझ्या आठवणीप्रमाणे मी ऐकलेलं त्यांचं पहिलं भावगीत म्हणजे ‘गंगा यमुना डोळय़ात उभ्या का’. तो स्वर ऐकून मी भारावून गेलो. मग ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘प्रेमस्वरूप आई’, ‘मधु मागसि’, ‘चाफा बोलेना’ अशी कितीतरी भावगीतं आयुष्यात येत गेली. लतादीदींची हिंदूी गाणी लोकप्रिय होऊ लागली ती ‘बरसात’ आणि ‘महल’नंतर. त्यातल्या गाण्यांनंतर तर मला त्यांच्या गाण्यांचं वेडच लागलं. अजूनही मला त्यांची गाणी तोंडपाठ आहेत. माझ्या ‘हसवाफसवी’ नाटकात शेवटच्या- सहाव्या पात्रात, म्हणजे कृष्णराव हेरंबकर या व्यक्तिरेखेत ‘धीरे से आजा रे’ हे गाणं मी रंगमंचावर गायचो. लतादीदींच्या गाण्याने माझ्या अनेक व्यक्तिरेखांची कोडी सोडवली. एखाद्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेचा अभिनयाविष्कार व्यक्त करायला लतादीदींच्या गाण्यांची मदत झाली. मी रत्नाकर मतकरीचं ‘घर तिघांचं हवं’ नावाचं नाटक करत होतो. ते बालशिक्षण आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ताराबाई मोडक यांच्या जीवनावर आधारित होतं. ताराबाई मोडक यांच्या भूमिकेत रीमा लागू होत्या. आणि त्यांच्या नवऱ्याचं- जो अत्यंत हुशार पण व्यसनाधीन वकील होता, ते पात्र मी साकारत होतो. त्या व्यक्तिरेखेचं कोडं उलगडायला मला लतादीदींच्या ‘हाय रे वो दिन क्यू न आए’ या गाण्याने मदत केली. किंवा अगदी चौकट राजाच्या वेळीससुद्धा दीदींचं गाणं मला ती व्यक्तिरेखा समजायला प्रेरित करत होतं.

एक मात्र राहून राहून वाटतं, दीदींनी मराठी संगीतसृष्टीत जेवढं योगदान दिलं, त्याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक मराठी गाणी गायली. दीदी उत्तम संगीत दिग्दर्शक होत्या. त्यांनी ‘आनंदघन’ नावाने चाली रचल्या. मोहित्यांची मंजुळा, साधी माणसं अशा काही सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. ‘मराठा तितुका मेळवावा’ असेल किंवा मग अगदी ‘ऐरणीच्या देवा तुला’ सारखं गाणं, दीदींनी या गाण्यांना चाली देऊन अजरामर केलं.

Advertisement

हिंदूी संगीतसृष्टीला तर त्यांनी श्रीमंत केलंच आहे. त्या काळचे जेवढे आघाडीचे संगीतकार होते त्यांच्या सर्जनशीलतेला न्याय फक्त लता मंगेशकरच देऊ  शकत होत्या. इतकी वर्ष होऊन गेली, तरी त्या गाण्यांचा प्रभाव अजूनही जनमानसावर आहे आणि तो कायम राहील.

एकदा भालजी पेंढारकरांनी मला कोल्हापूरला बोलावलं होतं. तिथे त्या आल्या होत्या, तेव्हा आमची अचानक भेट झाली. मात्र माझी एक इच्छा अपूर्णच राहिली, असं म्हणावं लागेल. माझं ‘हसवाफसवी’ हे नाटक त्यांनी पाहावं, अशी माझी फार इच्छा होती. मी त्यात सहा पात्रं साकारायचो. एकदा शिवाजी मंदिर नाटय़गृहातल्या प्रयोगाला अनिल मोहिले आले होते. प्रयोग संपल्यानंतर आमची भेट झाली. लतादीदींचा वाद्यवृंद तेव्हा अनिल मोहिले सांभाळायचे. मी त्यांना विनंती केली की माझ्या एखाद्या प्रयोगाला लतादीदींना बोलवाल का, माझी फार इच्छा आहे. त्यांनीही मला होकार दिला आणि मी ठरल्यावेळी फोन केला. दीदींना मी आमच्या एका विशेष प्रयोगाचं आमंत्रण दिलं. त्या सुमारास दीदी बऱ्याच गडबडीत होत्या, त्यांना कोल्हापूरला जायचं होतं, त्यामुळे त्या प्रयोगाला येऊ शकल्या नाहीत. मात्र इच्छा अपूर्णच राहिली ती कायमचीच!

Advertisement

आपण भाग्यवान आहोत की आपण दीदींच्या युगात जन्माला आलो. आपण दीदींचा काळ प्रत्यक्ष अनुभवला. आता मात्र खूप मोठं काहीतरी गमावल्यासारखं वाटतंय.

(शब्दांकन- सौरभ नाईक)

Advertisement

The post अनाहत नाद : अभिनयाची कोडी.. गाण्यांनी सोडवली! appeared first on Loksatta.



Source link

Advertisement