मलकापूर27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
येथील बाजार समिती मधील अडते व व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजुला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी येथील बाजार समितीत तुरीला ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपये भाव होता. परंतु आज अचानक मार्केटमध्ये तुरीची आवक वाढल्याने बाजार समिती मधील अडते व व्यापाऱ्यांनी बेभाव सहा हजारांपासून बोली लावणे सुरू केली. खामगाव मार्केटला आजचा तुरीचा भाव ७ हजार ५०० रुपये भाव आहे. तर दुसरीकडे येथील बाजार समितीत बेभाव बोली लावली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विचारणा करून देखील अधिकारी कर्मचारी कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंगोटे यांनी मार्केटमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु कोणीच बोलायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. त्यानंतर शहर ठाणेदार अशोक रत्नपारखी यांनी शेतकरी व उत्पन्न बाजार समिती कमिटी सोबत चर्चा करून मार्ग काढू तोपर्यंत रस्ता मोकळा करावा, असे आवाहन शेतकऱ्यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. चर्चेनंतर पुन्हा खरेदीची सुरूवात ७ हजार २०० रुपया पासून बोली सुरु झाली. तुरीचे भाव वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. भविष्यात पुन्हा बाजार समितीने बे भाव तुरीची खरेदी केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंगोटे, जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, तालुका अध्यक्ष नारखेडे, शिवाजी हिवाळे, अजय बावस्कर यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.