प्रतिनिधी | अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
वरुड तालुक्यातील एकलविहीर गावातील तलावालगतच्या शेतात असलेल्या एका विहिरीत रविवारी (दि. १४) एक अनोळखी मृतदेह आढळून आला. या मृतदेहाला शीर (डोकं) आणि हात नाही. तसेच पोत्यात केवळ शरीराचा सांगाडाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे खून करुन शीर आणि हात कापून मृतदेह विहिरीत टाकल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहे. त्यामुळे वरुड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
एकलविहीर गावातील ढोके यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्याची शनिवारी दुपारी दुर्गंधी आली. ही बाब शेतमालकाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी रविवारी सकाळपासून विहिरीच्या पाण्याचा उपसा सुरू केला. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसल्यानंतर बुडात दोन पोते दिसले. त्यामधून दुर्गंधी येत होती. म्हणून पोते बाहेर काढले. त्यावेळी एका पोत्यात मानवी मृतदेह (सांगडासदृश) तर दुसऱ्या पोत्यात दगड होते. दोन्ही पोते एकमेकांना बांधले होते. यावरुन आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगायला नको, म्हणून दगड बांधल्याचे समोर आले आहे. मृतदेहावर मास शिल्लक नाही, डोक नाही, हात नाही त्यामुळे ओळख पटवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले आहे. मात्र अंगात निळ्या रंगाची जीन पॅन्ट असून, तो तरुणाचा मृतदेह असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या आधारे वरुड पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खून करणे तसेच पुरावा नष्ट करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एक महिन्यापूर्वीची घटना असल्याचा अंदाज
मृतदेहाची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी हे कृत्य एक महिन्यापूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. कारण मृतदेहाचे केवळ हाड उरलेली आहे, शीर आणि हात नाही. तसेच एका पोत्यात मृतदेह व दगड भरलेले दुसरे पोते मृतदेहाच्या पोत्याला बांधून होते, त्यावरुन हा पूर्वनियोजीत कट असल्याचे समोर येत आहे. तपास सुरू आहे.- तपन कोल्हे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.