चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट्सने पराभूत करत आयपीएलच्या १५ व्या हंगामातील पहिला विजय मिळवला. सीएसकेला सलग ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकीकडे रविंद्र जडेजाची कर्णधार म्हणून कारकिर्द सुरुवातीलाच अडखळताना दिसत आहे, तर दूसरीकडे हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन शनिवारी (९ एप्रिल) मिळालेल्या विजयामुळे संतुष्ट असल्याचे दिसत नाही.
सामन्यानंतर केन विलियम्सन म्हणाला, संघाला खेळाच्या प्रत्येक विभागामध्ये सुधारणा करायची आहे. तो म्हणाला, “लक्ष्य स्पर्धात्मक होते, परंतु विशेष पद्धतीने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठीने शनिवारी सीएसकेविरुद्धचा सामना जिंकणे सोपे केले.”
विलियम्सन म्हणाला, “तुम्ही कोणताही सामना खेळला तरी, तो कठिण असतो. आम्हाला सुधारणा करायची आहे. आमचा हा पहिलाच विजय आहे, आम्हाला काही गोष्टी पाहाव्या लागतील, ज्या आम्ही मागील सामन्यात योग्य केल्या होत्या. शांत राहणे आणि काम करत राहणे. आम्हाला स्मार्ट क्रिकेट खेळण्यावर लक्ष्य केंद्रित करावे लागेल.”
पहिल्यांदा फंलदाजी करताना सीएसकेने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. चेन्नईकडून मोइन अलीने ३५ चेंडूत ४८ धावा केल्या. रायुडूने २७ धावा केल्या, तर जडेजाने २३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने १५ चेंडूत ३९ धावा केल्या, तसेच अभिषेक शर्माने ५० चेंडूत ७५ धावा केल्या आणि संघाला हा सामना १७.४ षटकातच जिंकवून दिला.
विलियम्सन आणि अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी करताना १५५ धावांचे लक्ष्य गाठले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांचे योगदान दिले. हैदराबादचा सुद्धा हा पहिलाच विजय आहे, तर ४ वेळा आयपीएल ट्रॅाफी जिंकलेल्या सीएसकेला चारही सामन्यात अपयश आले आहे. सीएसके आपला पाचवा सामना आरसीबीविरुद्ध खेळणार आहे.