अखेर हातोडा पडला…!: पाेलिस बंदाेबस्तात हटवली राहुरीतील अतिक्रमणे, काही व्यापाऱ्यांना सूट दिल्याने झाला वाद


अहमदनगर4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राहुरी शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेच्या रस्त्याला अडथळा करणारी अतिक्रमणे हटवण्याची मोहिम शुक्रवारपासून पोलिस बंदोबस्तात सुरू झाल्याने लहान मोठ्या व्यावसायिकांचे धाबे दणालले आहे. दरम्यान, सांडपाण्याच्या गटारीवरील पक्की अतिक्रमणे तसेच रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमणे काढताना काही व्यापाऱ्यांना दिलेली सूट ही वादाला तोंड फोडणारी ठरली.

Advertisement

तालुक्याचे ठिकाण असलेल्या राहुरी शहरात रस्त्याला अडथळा करणारी कच्च्या व पक्क्या स्वरूपाची अतिक्रमणे हा चिंतेचा विषय ठरला आहे. यापूर्वी अतिक्रमणे हटाव मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. मात्र अवघ्या दोन दिवसांत जैसे थे परस्थिती झाल्याने ही कारवाई निव्वळ फार्स ठरली होती. तीन दिवसापूर्वी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकऱ्याला हुसकावून लावण्यात आल्याने नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले.

या घटनेनंतर रस्त्याला अडथळा करणारी अतिक्रमणे हटवण्याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांना कळवण्यात आले होते. मात्र, नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी सकाळपासून नगर परिषदेच्या १५ ते २० कर्मचारी व अधिकारी जेसीबी घेऊन शहरातील बाजारपेठेत दाखल झाले. राहुरीच्या शनिमंदिरा भोवताली झालेली टपऱ्यांची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जागेवर तोडण्यात आली.

Advertisement

बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरील सांडपाण्याच्या गटारीवरील तसेच दुकानाच्या दर्शनी भागातील शेड जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, शिवाजी चौक ते शुक्लेश्वर मंदिर चौक या मार्गावरील सांडपाण्याच्या गटारीवर झालेले ठरावीक अतिक्रमण तोडण्यात आल्याने दुकानदार व नगर परिषद अतिक्रमण हटाव विभाग प्रशासनात चांगलाच वाद पेटला.

शुक्लेश्वर चौक ते नवीपेठ मार्गावरील अतिक्रमणे हटवताना देखील ठरावीक व्यावसायिकांना सूट दिल्याच्या घटना वादाला तोंड फोडणाऱ्या ठरल्या. राहुरी ग्रामीण रुग्णालय, भागिरथीबाई कन्या शाळा, नगर परिषद अग्निशमन केंद्र ते पाण्याची टाकी हा नगर परिषद दप्तरी २० मीटर रुंदीची नोंद असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पक्की अतिक्रमणे करण्यात आली. मात्र, ही अतिक्रमणे हटवण्याबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आजवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेस सुरुवात झाली. आडवी पेठेतील छोट्या मोठ्या टपऱ्या काढून घेतल्यामुळे या मार्गावरील रस्ते पूर्णपणे मोकळे होऊन वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Advertisement



Source link

Advertisement