मुंबई30 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.
मुंबईला स्वप्नांचे शहर, मायानगरी असे म्हटले जाते. या मुंबईने लाखो लोकांना आपल्यात सामावून घेतले आहे. महाराष्ट्रातील छोट्या छोट्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत रोजगाराच्या शोधात अनेकजण याठिकाणी येतात. यात परप्रांतीयांची देखील मोठी संख्या आहे. येथे येणारे कायमचे मुंबईकर होऊन जातात.
4 हजार 83 घरांसाठी सोडत
मुंबईत स्वतःचे घर असावे, ही यातल्या अनेकांची इच्छा असते. अशावेळी म्हाडा घेऊन येत असलेल्या संधीच्या लाखो लोक प्रतिक्षेत आहेत. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी, 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरे गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेव या भागांमध्ये असणार आहेत.
शेवटची सोडत 2019 मध्ये
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची 1 वर्षापासून चर्चा सुरु होती. याआधी मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत 2019 मध्ये काढण्यात आली होती. यात केवळ 217 घरांचा समावेश होता. आता मंडळाने 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही
जाहिरात 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवसापासून नोंदणी करता येणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. तर सोडतीचे ठिकाण रंगशारदा, वांद्रे, पश्चिम आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 26 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे.