अकोला8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
खुले नाट्यगृह चौक-फतेह चौक-खंडेलवाल टॉवर चौक या मार्गावरील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. दरम्यान जनता भाजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी थेट विद्युत खांबावरुन घेतलेली वीज जोडणीही पथकाने तोडली.
महापालिकेच्या वतीने शहरात 18 जानेवारी पासून दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या – ज्या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्या सर्व मार्गावरील अतिक्रमण जैसे-थे आहे. यामुळे पुन्हा ही मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान अतिक्रमण हटाव पथक खुले नाट्यगृह चौकात दाखल झाल्यावर अनेक फळ विक्रेते, लघु व्यावसायीक यांनी आपल्या चारचाकी गाड्या घराकडे वळवल्या तर जे रस्त्यालगत विविध वस्तुची विक्री करतात, त्यांनी आपली दुकाने आवरती घेतली. या दरम्यान जनता भाजी बाजारातील मार्गावर पुन्हा भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. यापैकी काही भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने काढून घेतली. अतिक्रमण विभागाने भाजी विक्रेत्यांनी तयार केलेले कच्चे ओटे पुन्हा जमिनदोस्त केले.
ही कारवाई अतिक्रमण हटाव पथकाचे चंद्रशेखर इंगळे, प्रविण मिश्रा, सुनिल इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रुपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उपर्वट, कविता सगडे आदींनी राबविली. अतिक्रमण हटाव मोहिमेत गुरुवारी दि. १९ रोजी जेल चौक-अशोक वाटिका चौक-मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौक-रेल्वे स्थानक चौक या मार्गावर राबवली जाणार आहे.
जनता भाजी बाजारातील रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी थेट विद्युत खांबावरुन अवैधरित्या वीज जोडण्या घेतल्या होत्या. अतिक्रमण हटाव मोहीमे दरम्यान महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी या अवैध वीज जोडण्या तोडल्या. मात्र अवैध वीज जोडण्या तोडण्याची जबाबदारी ही महावितरणची असताना, महावितरणने या अवैध वीज जोडण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. ही झालेली वीज चोरी महावितरण सर्व सामान्य नागिरकांच्या खिशातून वसुल करीत आहे.