अकोला14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
- कस्तुरी चॅरिटेबल साेसायटीच्या वतीने आत्मजागर उपक्रमाचे १७ ला आयाेजन
कर्जापोटी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासनाकडून मदत करण्यात येते. मात्र, जर कर्ज खासगी व्यक्तीकडून असेल, तर कुटूंब शासकीय मदतीपासून वंचित राहते. हीच बाब हेरून सेवाभावी संस्था कस्तुरी संस्थेने जिल्ह्यातील जानेवारी २३ नंतर आत्महत्या केलेल्या, परंतु शासकीय मदतीसाठी निकषात न बसणाऱ्या १९ शेतकऱ्यांच्या वारसांना स्वयंपूर्ण बनवण्याकरता “आत्मजागर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा विस्कटलेला संसार, वारस्यांच्या मनात उठलेले प्रश्न, पोरकी मुलं, म्हातारे आई-वडील आणि मोडकळीस आलेल्या घरातील सदस्यांचे दु:ख कस्तुरीच्या सदस्यांनी जाणले. त्यांच्या अडचणी समजून अशा कुटूंबातील महिलांना स्वयंसिद्ध करून त्यांच्या पायावर त्यांना उभं करण्याचा निश्चय संस्थेकडून करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवारी कस्तुरीच्या परिसरात होणार आहे.
या वेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, माजी आमदार वसंतराव खोटरे, गोपाल खंडेलवाल, प्राचार्य डॉ. शांताराम बुटे माजी नगराध्यक्षा शिला गहिलोत यांच्या हस्ते गरजूंना मदत प्रदान करण्यात येईल. उपक्रमासाठी यशवंत देशपांडे, संजय ठाकरे, संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, गोविंदसिंह गहिलोत, प्रा. किशोर बुटोले यांचे मोलाचे पाठबळ आहे.
अशी करणार मदत
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या, मात्र शासकीय मदतीसाठी निकषात न बसणाऱ्या कुटुंबातील महिलांना ५००० रूपयाची आर्थिक मदत आणि भावी आयुष्यात त्यांना स्वबळावर उभं करण्याचा आश्वासन हेच यानिमित्त देण्यात येणार आहे. सोहळ्याचं आयोजन रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कस्तुरीच्या गायगाव मार्गावर असलेल्या परिसरात करण्यात आले आहे.