छत्रपती संभाजीनगर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
निम्न दुधना प्रकल्पात संपादित केलेल्या जमिनीचे वाढीव मावेजासाठीचे प्रकरण तीन आठवड्यांत दिवाणी न्यायालयात दाखल करण्याचेे आदेश न्या.मंगेश पाटील आणि न्या.संतोष चपळगावकर यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले.तुरा (ता. पाथरी, जि. परभणी) येथे राहणाऱ्या गंगुबाई बन्सीधर गायकवाड यांची गट क्र. १२/२ मध्ये २ हेक्टर ५४ आर व गट क्र. ९४/अ मौजे मापेगाव येथील त्यांच्या हिश्श्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २ हेक्टर २ गुंठे जमीन निम्न दुधना प्रकल्पासाठी संपादित केली होती.
११ फेब्रुवारी २००६ रोजी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी अंतिम निवाडा प्रसिद्ध केला. मात्र समाधानकारक मावेजा न मिळाल्याने गंगुबाई गायकवाड यांनी जालन्यातील विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे वाढीव मावेजा मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले. भूसंपादन अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. गंगुबाई यांनी २००७ ते २०२२ पर्यंत वेळोवेळी अर्ज करूनही भूसंपादन अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे गंगुबाई यांनी अॅड. विलास हुंबे यांचच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली. दिलेल्या आदेशापासून तीन आठवड्यांत प्रकरण दाखल करावे, असे आदेश खंडपीठाने दिले. शासनातर्फे अॅड. एस. बी. यावलकर यांनी काम पाहिले.