अंतर्नाद : सत् श्री अकाल.. गुरुबाणी संगीतडॉ. चैतन्य कुंटे [email protected]

Advertisement

संगीताच्या पायावर, रागानुसार एखादा धर्मग्रंथ संकलित होणे ही कल्पनाच किती अजब आहे ना? अनेक धर्माचे पवित्र ग्रंथ गायले जातात व अशा धर्मात संगीताला महत्त्वाचे स्थान आहे हे आपण या लेखमालेत आधीही पाहिले आहे. परंतु एखादा धर्मग्रंथच मुळी रागांनुसार ग्रथित व्हावा हे ‘अगा नवलचि वर्तिले’! हा धर्म म्हणजे ‘सिख’! आणि असा नवलाचा ग्रंथ म्हणजे ‘गुरुग्रंथसाहब.’ सिख धर्माचे संस्थापक गुरू  नानक (१४६९-१५३९) यांची ५५२ वी जयंती नुकतीच कार्तिक पौर्णिमेला झाली. त्यानिमित्ताने शिखांच्या ‘गुरुबाणी संगीता’चा परिचय करून घेऊ.

सिख (शिक्षा, शिक्खा सिखा) म्हणजे ‘शिक्षा’, गुरूंचा उपदेश. गुरू नानकांचा तत्त्वपर उपदेश पाळणारा धर्म ‘सिख’ आणि त्यानुसार आचरण करणारे लोक हे ‘शीख.’ ‘एक ओंकार’चा मंत्र सांगणाऱ्या गुरू नानकांचा हा एकेश्वरी धर्म समता, बंधुता, निर्वैर, सदाचार यांवर भर देणारा. मात्र १६ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंतच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीनुसार या धर्मास शस्त्रही हाती घ्यावे लागले. म्हणून तर दहावे गुरू गोविंदसिंह यांनी केश, कंघा, कडा, कच्छा आणि कृपाण या पंच ‘क’कारांचे पालन करायला सांगितले. गुरुद्वारात ‘सेवा’ आणि ‘लंगर’ यांचे खूप महत्त्व असते. प्रत्येक शिखाने समाजाला उपयोगी पडेल असे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे काहीतरी काम म्हणजे ‘सेवा’ करणे अनिवार्य असते. तसेच गुरुद्वारात सर्वासाठी चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्रात ‘लंगर’मध्येही सहभागी होणे हे धार्मिकच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे लक्षण असते.

Advertisement

सिख धर्म समता व सेवा मानतो. त्यात जातपात इ. भेद नाहीत. अर्थातच प्रार्थना गातानाही सर्व जमाव एका पातळीवर असतो. त्यात उच्च-नीच भेद नसतो. हिंदू कीर्तनात सगुण साकाराचे गुणगान असते; मात्र सिख कीर्तनात निर्गुण निराकाराचे स्तवन असते. कोणत्याही मूर्तीची, सगुण रूपाची उपासना न करता नैतिक तत्त्वाचरणाचा संदेश देणारे ‘शबद’ गाणे असे सिख उपासनेचे स्वरूप असते. शिखांचे ‘शबदकीर्तना’तील संगीत ‘गुरुबाणी संगीत’ अथवा ‘गुरुमत संगीत’ म्हणून ओळखले जाते.

‘शबद’ किंवा ‘बाणी’ म्हणजे गुरू नानकांच्या उपदेशपर रचना ग्रथित होत गेल्या, तसेच अन्यही संतांच्या पदांचे संकलन ‘आदिग्रंथा’त होत गेले. गुरूनानक यांच्या शबदसह अंगद, अमरदास, रामदास, तेगबहादुर इ. सिख गुरू आणि भगत कबीर, नामदेव, त्रिलोचन, रविदास, धन्ना, शेख फरीद, इ. हिंदू-मुस्लीम संतांची वचनेही या ग्रंथात समाविष्ट आहेत. या संकलनाला पाचवे गुरू अर्जुनदेव यांनी अंतिम रूप दिले. दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आदेश दिला-  ‘सब सीखन को होकम है गुरु मान्यो ग्रंथ.’ म्हणजे आपल्या पश्चात कोणत्याही मानवास उत्तराधिकारी व गुरू न मानता गुरुग्रंथ हा परमगुरू माना. अर्थातच या ग्रंथास दहा गुरूंच्या पश्चात अकरावा गुरू मानून शिखांनी सर्वोच्च पूजनीय स्थान दिले.

Advertisement

धर्मसंबद्ध ग्रंथांचे विभाग बऱ्याचदा वर्णित विषय, देवता, तत्त्वज्ञान इत्यादी निकषांवर होतात. मात्र, गुरुग्रंथसाहबचे वैशिष्टय़ असे की यातील बाणी या वण्र्यविषयानुसार नव्हे, तर रागांनुसार वर्गीकृत केल्या गेल्या. रागासारख्या सांगीतिक संकल्पनेनुसार एखाद्या धर्मग्रंथाचे विभाग पाडले जाण्याची ही एकमेवाद्वितीय घटना आहे. धर्मग्रंथाला असे सांगीतिक अधिष्ठान देणारा सिख हा जगभरातील सर्व धर्मातील एकमेव आहे. आणि यावरूनच या धर्माने संगीताशी केवढा दृढ संबंध जोडला आहे ते ध्यानात येते. गुरुग्रंथाशिवाय गुरू गोविंदसिंहांच्या ‘दशमग्रंथ’मधील वचने, तसेच भाई गुरुदास, भाई नंदलाल यांची कवनेही गायली जातात.

गुरुग्रंथातील प्रत्येक शबदच्या शीर्षकात त्याचा विशिष्ट राग, रहाउ, अंक, घर व जति नमूद केला आहे. रहाउ म्हणजे ध्रुवपद वा टेक- त्यात पदातील मुख्य आशयाचे आणि रागाचेही सार असते. हा भाग स्थायीप्रमाणे गायला जातो व पुढले चरण हे अंतरा ठरतात. कधी कधी एखाद्या पदास दोन रहाउ असतात, तेव्हा दुसरा रहाउ ‘मंझा’चे- म्हणजे स्थायी आणि अंतरा यांना सांगीतिकदृष्टय़ा जोडणाऱ्या चरणाचे कार्य करतो. नमूद केलेला अंक हा चरण म्हणजे अंतऱ्याचे सूचन करतो. घर हे लयतालास, तर जति हे तालवादनक्रियेचा निर्देश करतात. म्हणजेच प्रत्येक पदाचे गायन कसे असावे याचे प्रत्यक्ष संकेत गुरुग्रंथात दिलेत. म्हणूनच गुरुग्रंथ हा केवळ शिखांचा धर्मग्रंथ म्हणून नव्हे, तर संगीतग्रंथ म्हणूनही लक्षणीय आहे.

Advertisement

आद्य गुरूनानकांनी आपल्या गुरुमताचा प्रसार करण्यासाठी शबदकीर्तनाचा आरंभ केला. भाई मर्दाना हे त्यांचे बालमित्र असलेले मुस्लीम रबाबवादक त्यांना शबदकीर्तनात संगत करत. गुरू नानक आणि भाई मर्दाना यांनी भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही केलेल्या एकंदर चार ‘उदासी’ म्हणजे यात्रांत कीर्तनांद्वारे धर्मतत्त्वे सर्वदूर पोहोचवली. गुरूनानक आणि भाई मर्दाना यांनी भारतभरात तीर्थाटन करताना त्या, त्या ठिकाणची कीर्तन पद्धती पाहिली आणि तत्कालीन ध्रुपद शैलीच्या साच्यात आपली स्वतंत्र संगीत पद्धती बनवली. गुरू नानकांनंतर पुढच्या गुरूंनी, कीर्तनीयांनी त्याचा विकास केला आणि ‘गुरुबाणी संगीत’ ही स्वतंत्र गानविधा बनली. त्यामुळे गुरुबाणी संगीत हे पंजाबातील कलासंगीताची एक स्वतंत्र प्रणाली मानता येते. १५-१६ व्या शतकात पंजाब-सिंध भागात अस्तित्वात असलेली रागरूपे आणि गानविधा गुरुबाणी संगीताद्वारे आज जतन झाल्या आहेत. एकेकाळी गुरुबाणी संगीतातील रागताल, रचना आणि विस्तारक्रियाही निराळ्या होत्या. मात्र, गेल्या शतकाच्या काळात हिंदुस्थानी संगीताच्या, ख्याल गायनशैलीच्या वाढत्या प्रभावामुळे गुरुबाणी संगीतातही परिवर्तन झाले आणि आताचे बरेचसे रागी मूळचे गुरुबाणी संगीत न गाता परिवर्तित, ख्यालाकडे झुकलेले संगीत गाताना आढळतात. हल्ली तर त्यावर गझल आणि फिल्म संगीताचाही दाट प्रभाव दिसतो. मात्र, काही मोजक्या जुन्या जाणत्या रागींनी अस्सल गुरुबाणी संगीताचे जतन केले आहे.

गुरुग्रंथातील बानींचे ३१ मुख्य राग आणि त्यांचे उपप्रकार अशा एकूण ६२ रागांत विभाजन झाले आहे. गुरुग्रंथातील हे राग असे- श्री, मांझ, गौडी, आसा, गुजरी, देवगांधारी, बिहागडा, बडहंस, सोरठी, धनाश्री, जैतश्री, तोडी, बैराडी, तिलंग, सुही, बिलावल, गौड, रामकली, नटनारायण, मालीगौरा, मारू, तुखारी, केदार, भैरव, वसंत, सारंग, मल्लार, कानडा, कल्याण, प्रभाती, जैजावंती. शिवाय या रागांचे अनेक उपप्रकारही आहेत. गुरुग्रंथात काही शबद हे रागलक्षणांचेही आहेत- त्यांतून या रागांच्या स्वरूपाबद्दल थोडा उलगडा होतो. या रागांखेरीज मांझ की वार, गौडी की वार, आसा की वार, इ. सात ‘धुनी’चाही उल्लेख गुरुग्रंथात आहे.

Advertisement

गुरुग्रंथात प्रत्येक पदासाठी ‘घर’ दिले आहे. घर म्हणजे ते पद कोणत्या तालछंदात गावे याचे संकेत. असे एकूण १७ घर- म्हणजे तालछंद आहेत. शबदच्या काव्यातील वृत्तछंदाचा संबंध या घराशी आहे. तीनताल, चौताल, धमार, झपताल, तेवरा, रूपक, दादरा, केरवा या प्रचलित तालांखेरीज- जगपाल (११ मात्रा), जय (१३), पंज (१५), शिखर (१७), खट (१८), इंद्र (१९), मट (२१), अष्टमंगल (२२), मोहिनी (२३), ब्रह्म (२८), रुद्र (३२), विष्णु (३६), मुचकुंद (३४), महाशनी (४२), चर्चरी (४०), कुल (४२), मिश्रबरन (४७), भानमती तथा चारताल दी सवारी असे अप्रचलित तालही गुरुबाणी संगीतात आहेत. उपताल झंपक (साडेआठ मात्रा) अशा अर्धमात्रातालांचा वापरही इथे होतो. पखवाज आणि तबल्याच्या पंजाब घराण्यात वाजवल्या जाणाऱ्या अर्धमात्रा तालांचा मूलस्रोत हा गुरुबाणी मानला जातो. 

गुरुबाणी संगीतातील मुख्य रचनाप्रकार असलेल्या शबदशिवाय इतरही गीतप्रकार आहेत. हे प्रकार केवळ काव्यवैशिष्टय़ांमुळे वेगळे होत नसून त्यांच्या ठरावीक चाली, गाण्याची रीत यामुळेही निराळे ठरतात. गुरुबाणी संगीतात ‘सनातनी’ म्हणजे शास्त्रोक्त रागांवर आधारित आणि ‘देसी’ म्हणजे लोकपरंपरेतील चाली अशा दोन प्रकारच्या स्वररचना गायल्या जातात. अष्टपदी, पंचपदे, चौपदे, पडताल हे प्रकार ‘सनातनी’, तर घोडीआ (विवाहगीते), अलाहुणीआ (शोकगीते), करहाले (यात्रागीते), छत, वार, फरमान, इ. गीते ‘देसी’ परंपरेतील चालींत गातात. शबदखेरीज सिख भक्तिपदेही व्यावसायिक अल्बम्समधून तयार होतात. त्यांचा गुरुबाणी संगीताशी काहीएक संबंध नाही. ही भजने चित्रपट संगीताच्या साच्यातली, त्या प्रकारच्या धुना आणि वाद्यमेळाने सजवलेली असल्याने त्यांना ‘सिख धर्मातील जनप्रिय संगीत’ म्हणता येईल.

Advertisement

जपजी (पहाटेचे नामस्मरण), आसा दि वार (प्रात:कालीन) व रेहरास (सायंकालीन) या नित्य प्रार्थना असतात. ‘पाठ’ आणि ‘हुकूमनामा’ने प्रार्थनेचा आरंभ होतो. याचे पठण पहाटे ४ ते ७ वाजता होते. यानंतर समयानुसार ठरावीक रागांत अरदास प्रार्थना गायल्या जातात. मग ‘कथा’ म्हणजे उपदेशकाचे प्रवचन होते व शेवट रागीच्या शबदगायनाने होतो. याच क्रमाने सायंकालीन प्रार्थनाही होते. गुरुद्वारामध्ये रोजच्या आठ चौकी- म्हणजेच ‘अमृत कीर्तन’ किंवा ‘अखंड कीर्तन’ असते. पूर्ण वर्षांत या दैनंदिन आठ चौकींतील ठरावीक बानींची निश्चित अशी योजना परंपरेने केली आहे. या नित्य कीर्तनाशिवाय उत्सवादि पर्वात नैमित्तिक कीर्तनही असते. त्यात ऋतु वा समयानुसार गायन केले जाते. उत्सवांच्या वेळी रात्रभर चालणाऱ्या कीर्तनास ‘रैन सबइ’ (आनिश सेवा) म्हटले जाते, तर मिरवणुकीतील संगीतास ‘नगरकीर्तन’ म्हणतात.

शिखांत कीर्तन करणाऱ्यास कीर्तनी वा कीर्तनिया म्हणतात. पण गुरुग्रंथात दिलेल्या विशिष्ट रागांनुसार शबद गाणाऱ्यांस ‘रागी’ ही विशेष संज्ञा आहे. गुरुद्वारातील ‘दरबार’ म्हणजे मुख्य सभागारात कोणतीही मूर्ती नसते, तर केंद्रस्थानी गुरुग्रंथ ठेवलेली ‘गद्दी’ किंवा ‘सचखंड’ असते. त्याच्या शेजारीच ‘चौकी’ म्हणजे रागींचा चौथरा असतो. मुख्य गायकाबरोबर बऱ्याचदा एखादा सहगायक, तालवाद्य वादक व स्वरवाद्य वादक असतात. हे वाद्यवादकदेखील मुख्य गायकाच्या बरोबरीने गातात. रागी हे मुख्यत: पुरुषच असतात. परंतु स्त्रियांना शबद गाण्याची मनाई नाही. गुरुद्वारात ‘स्त्री-संतसंग’मध्ये केवळ स्त्रियाच शबद गातात व वादनही करतात.

Advertisement

गुरूनानकांचे सहकारी भाई मर्दाना यांच्यामुळे रबाब हे वाद्य गुरुबाणी संगीतातले आद्य वाद्य ठरले. गुरूअर्जुनदेवांच्या काळात सारिंदा, इसराज व दिलरुबा या वाद्यांची भर पडली. गुरू हरगोविंदांच्या काळी ताउस, सारंगी, ढड्ड यांची, तर गुरूतेगबहादुर यांच्या काळात मृदंग, गुरू गोविंदसिंहांच्या काळात तानपुरा ही वाद्ये कीर्तनात वाजवली जाऊ लागली. या वाद्यांखेरीज धामाजोडी अथवा तबला, हार्मोनियम ही वाद्येही शबदकीर्तनात संगतीला असतात. हल्ली तर बव्हंशी गुरुबाणी गायक स्वत: हार्मोनियम वाजवत गातात.

गुरुबाणी संगीताचे विधिवत शिक्षण दिले जावे म्हणून गुरूनानकांनी करतारपूर साहिब, गुरू अंगददेवांनी खडूर साहिब, गुरूअमरदासांनी गोविंदवाल साहिब, गुरूरामदासांनी रामदासपूर, अर्जुनदेवांनी हरिमंदिर साहेब, तेगबहादुरांनी आनंदपूर साहिब या गुरुद्वारांत तालीमखाने सुरू केले. येथे आजही पारंपरिक पद्धतीने संगीत शिकवले जाते. पूर्वी रबाब वाजवून रागरागिणींची तालीम देणाऱ्या ज्ञानी रागींना ‘बाबे’ म्हटले जायचे. हे बाबे केवळ संगीतकार नसून त्यांचा आध्यात्मिक दर्जाही उच्च मानला जायचा. भाई दीपा, बुला नारायणदास, उग्रसेन, नगौरीमल, भाई रामू, भाई मुकंदा असे अनेक विख्यात बाबे पूर्वी होऊन गेले. त्यांना सिख परंपरेत तानसेनासारखा मान आहे! याशिवाय विविध ठिकाणच्या ‘टकसाल’मधून संगीत शिक्षणाचीही मोठी परंपरा आहे. या टकसालमधून कीर्तनिया रागींची घडण होते. ‘खालसा’ म्हणजे धार्मिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांइतकेच महत्त्व गुरुबाणी संगीताचे शिक्षण देणाऱ्या ‘टकसाल’ला आहे. या टकसाल म्हणजे एक प्रकारे गुरुबाणी संगीतातील विविध घराणी आहेत.

Advertisement

लेखाच्या अखेरी सिख धर्म, संगीत आणि महाराष्ट्राच्या अनुबंधाविषयी थोडेसे..

मराठी कीर्तनाचे प्रणेते संत नामदेव हे पंजाबात गेल्याचे आणि त्यांची काही पदे गुरुग्रंथात समाविष्ट असल्याचे आपल्याला ठाऊक असते. शीख ज्याला ‘अविचलनगर’ म्हणतात, त्या नांदेड शहरात शिखांचे शेवटचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी देह ठेवला. तलवंडी येथील ‘दमदमा साहब’ गुरुद्वारात गुरुग्रंथाच्या संकलनाचे कार्य १७०५च्या सुमारास पूर्ण झाल्यावर गुरूतेगबहादुर यांच्या शबदचा समावेश असलेली गुरुग्रंथाची ‘दमदमा वाली बीर’ ही पहिली प्रत घेऊन गोविंदसिंह नांदेडला आले होते आणि तिथेच या प्रतीची प्रतिष्ठापना झाली. नांदेडच्या ‘तखत श्री हजूरी साहब’ गुरुद्वाराला म्हणूनच सिख धर्मात खूप मानाचे स्थान आहे. इथे गुरुबाणी संगीत शिकवण्याची टकसालही आहे. नांदेडच्या या गुरुद्वारातील शबदकीर्तनाचा आविष्कार- विशेषत: उत्सव-पर्वात रागींचे गायन आवर्जून ऐकण्यासारखे  असते.

Advertisement

 (लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)

The post अंतर्नाद : सत् श्री अकाल.. गुरुबाणी संगीत appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement