डॉ. चैतन्य कुंटे [email protected]
चर्चच्या भव्य वास्तूत घुमणाऱ्या कॉयरच्या धुना- अनेक मुखांतून येऊनही एकमुखातून आल्यासारख्या! सुरांचे अनेक स्तर असूनही एकजीव वाटणाऱ्या! जीवाला आश्वस्त करणारे ऑर्गनचे मंद्रगभीर सूर. चर्चबेलचा दूरवर गुंजणारा अनुनाद. ख्रिस्ती चर्चमधील प्रार्थनेचा मनावर जो खोलवर परिणाम होतो, त्यात तेथील स्थापत्य, शिस्त, शांतता आणि संगीत या सर्वाचा वाटा आहे.
‘अंतर्नाद’ या लेखमालेत भारतातील विविध धर्मपंथांच्या संगीतांची माहिती घेतल्यानंतर अंतिम दोन लेखांत परिचय करून घेऊ ख्रिस्ती धर्मसंगीताचा. ख्रिस्ती धर्माने प्रभावित नसलेला देश आधुनिक काळात शोधूनही सापडायचा नाही. ख्रिस्ती धर्माच्या वाढत्या प्रभावाप्रमाणेच या धर्माशी संबंधित संगीताचाही प्रसार झाला. जगभरातील नानाविध संगीतपद्धतींना मागे सारत आज पूर्ण विश्वावर ज्या संगीतप्रणालीची अधिसत्ता आहे, त्या युरोप-अमेरिकन संगीताच्या घडणीत ख्रिस्ती धर्मसंगीताचा मोठा वाटा आहे.
‘जीझस ख्राईस्ट ऑफ नाझरथ’ मूळचा ज्यू होता. (‘ख्राईस्ट’ या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे- प्रेषित, मसिहा!) त्यामुळे ज्यू धर्माच्या पायावर आणि रोमन उपासनेच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती धर्मोपासना विकसित झाली. या दोन्ही परंपरांतील धर्मसंगीताचे बाळकडू घेऊन चर्चसंगीत वाढले. पाचव्या शतकापासून ख्रिस्ती स्तोत्रगीतांच्या (चँटस्) धुनांचे संहितीकरण सुरू झाले. मध्ययुग (इसवी ६०० ते सुमारे १४५०) व रेनेसाँ म्हणजे पुनरुज्जीवन काळ (सुमारे १४५० ते १६००) हे चर्चसंगीताच्या घडणीत फार महत्त्वाचे आहेत. मध्ययुगात हिब्रू, ग्रीक व पौर्वात्य मौखिक परंपरांतल्या प्रार्थनागीतांमधून प्लेनसाँग वा प्लेनचँट हा ढाचा विकसित झाला. बायझंटाईन, आर्मिनिया, सीरिया इ. भागातील चर्चसंगीत मोनोडी प्रकारचे- म्हणजे एकआवाजी होते. मात्र रोमन कॅथलिक पंथाच्या विकासामुळे नवव्या शतकापासून बहुआवाजी आविष्काराचा प्रवेश झाला. ग्रेगरीअन चँट्सचे सादरीकरण हा रोमन कॅथलिक चर्चमधील संगीताचा महत्त्वाचा भाग बनला. मेलडी म्हणजे स्वरसंहती पद्धतीने, वाद्यसाथीशिवाय, मुख्यत्वे पुरुषवृंद असे गायन करतो.
सातव्या शतकात पोप विटालिअनच्या आदेशाने चर्चसंगीतात ऑर्गनचा प्रवेश झाला. (चर्चमधील वाद्ये, विशेषत: चर्चबेल्स हा फारच रंजक, पण मोठा विषय आहे.. स्वतंत्र लेखाचा. तेव्हा तूर्तास तो सोडून देतो!) नवव्या शतकाच्या सुमारास चर्चमध्ये स्त्री-पुरुष समूहाच्या एकत्रित गायनाची वहिवाट सुरू झाली. स्त्रिया व पुरुषांच्या आवाजातील नैसर्गिक फरक लक्षात घेता एकस्वनी (मोनोफोनिक) सुरावटीपेक्षा बहुस्वनी (पॉलीफोनिक) प्रस्तुतीकडे वाटचाल सुरू झाली. यामुळे आज यूरपीय संगीताचा खास विशेष मानले जाणारे हार्मनी- म्हणजे स्वरसंवाद तत्त्व ठळकपणे आकार घेऊ लागले. आजच्या यूरपीय संगीतातील अनेक संकल्पना, रचनाप्रकार, वाद्ये यांच्या विकासात चर्चसंगीताचा महत्त्वपूर्ण वाटा आहे; त्याचा आरंभ इथून झाला.
डॉ. अशोक दा. रानडे यांनी ‘पाश्चात्त्य संगीत संज्ञा कोशा’त चर्चसंगीताच्या संदर्भात एक मार्मिक निरीक्षण नोंदवलेय : ‘चर्चसंगीताच्या विकासात आलटून पालटून दोन प्रवाह दिसतात. अस्वीकरणीय वाटणारे संगीताचे प्रघात रूढ होत आणि मग सुधारणावादी त्यांना पुन्हा झुगारून देऊ पाहत. उदा. काउन्सिल ऑफ ट्रेंटच्या आदेशान्वये कोणते संगीत पूजाविधींतून वगळावे यासंबंधी धर्मगुरूंना निश्चित आदेश देण्यात आले. संगीताने शब्द झाकले जातात म्हणून बहुआवाजी गायनपद्धतीच गाळावी, हा विचारही काही काळ जोरावर होता. धर्मसुधारणेनंतरच्या काळातही संगीताच्या बाजूने व विरुद्ध अशा चळवळी होतच राहिल्या. रांगडय़ा लोकसंगीत शैलीपासून दूर ठेवता येईल असे गंभीर व अधिक पद्धतशीर संगीत बांधण्याकडे चर्चसंस्थेचा कल असे. मात्र, बहुतेक वेळा लोकप्रिय लौकिक संगीतास सामावून घेऊन स्वत:ची स्वीकारार्हता वाढवायची असे धोरण चर्चने बरेचसे अवलंबिले.’ ख्रिस्ती धर्मात रोमन कॅथलिक, अँग्लिकन, प्रोटेस्टंट, प्रेस्बेटेरीयन, इ. अनेक पंथोपपंथ व त्यांची निरनिराळी सांगीतिक धारणा आहे. ख्रिस्ती धर्मात संगीताचे स्थान अढळ आहे. मात्र त्याला डावलले गेल्याचेही काही दाखले आहेत. उदा. ‘प्रार्थना हा आत्म्याने परमशक्तीशी केलेला संवाद असल्याने तो मनोमनच करणे इष्ट. तेव्हा मोठय़ा आवाजात प्रार्थना म्हणण्याचे प्रयोजनच काय? प्रार्थनांचे गायन तर मुळीच नको. त्याने धर्मतत्त्वांवरून लक्ष विचलित होते,’ असा पवित्रा घेऊन झ्विंगली या धर्मसुधारणा चळवळीतील एका अध्वर्युने चर्चसंगीताला शह दिला होता. मौनातच प्रार्थना केली जावी अशी धारणा क्वेकर पंथीयांचीही होती. परंतु हे संगीतविरोधी सूर फारसे टिकले नाहीत. चटकन विरले!
ख्रिस्ती प्रार्थनागृहांचे चर्च, चॅपेल, कॅथ्रेडल, मोनॅस्टरी असे प्रकार आहेत. बिशप वा आर्चबिशप या धर्मगुरूचे सिंहासन (कॅथेड्रा) व वास्तव्य असलेल्या जागेस ‘कॅथ्रेडल’ म्हणतात. अर्थातच येथील प्रार्थनासंगीताची प्रस्तुती साध्या चर्चपेक्षा अधिक आखीवरेखीव असते. झगा या अर्थाच्या ‘चाप्पा’ या शब्दापासून ‘चॅपेल’ वा ‘काप्पेल’ (म्हणजे संतांचे झगे इ. वस्त्रे, इतर पवित्र अवशेष ठेवण्याची जागा) हा शब्द बनला. पोप, बिशप इ. धर्मगुरूंचे खाजगी चर्च म्हणजे चॅपेल. चॅपेलमध्ये नेमणूक झालेले संगीतकार, वाद्यवृंद यांना ‘चॅपेल रॉयल’ म्हणतात, तर संगीत नियोजकास ‘चॅपेलमास्टर’! पारंपरिक चर्चसंगीताचे जतन व संवर्धन करण्यात यांचा मोठा वाटा होता. आरंभी चर्चमधील गायन हे वाद्यविरहित असे. त्यामुळे ‘काप्पेल’ या शब्दावरून ‘अ काप्पेल्ला’ म्हणजे वाद्यसाथीखेरीज केवळ कंठध्वनीतून केलेली प्रस्तुती हा शब्द रूढ झाला. आज ‘अ काप्पेल्ला’ हा एक स्वतंत्र गायनाविष्कार प्रचलित आहे.
वैष्णव अष्टयाम संगीतसेवेसारखेच ख्रिस्ती चर्चमध्ये आठ प्रार्थनाविधी असतात. त्यांना ‘डिवाईन ऑफिस’ म्हणतात. कॅननिकल अवर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवसाच्या आठ विभागांत दैनंदिन प्रार्थना गायल्या जातात. मॅटीन्स, लॉव्ड, प्राइम, टर्स, सेक्स्ट, नोन, व्हेस्पर्स आणि कम्प्लाइन असे हे आठ प्रार्थनाविधी आहेत. डिवाईन ऑफिसचा हा दैनंदिन गायनक्रम रोमन कॅथलिक चर्च, कॅथ्रेडल व मठांत पाळतात. अँग्लिकन चर्चमध्ये मात्र केवळ मॅटीन्स व इव्हनसाँग या दोनच दैनंदिन उपासना होतात.
ख्रिस्ती प्रार्थनांचा मूलस्रोत म्हणजे बायबल. त्याचे ओल्ड टेस्टामेंट (हिब्रू बायबल) व न्यू टेस्टामेंट (ख्रिस्तचरित्र, संदेश, अनुयायांच्या कथा, इ. भाग) असे दोन विभाग आहेत. विविध प्रसंगी बायबलमधील वचने गायली जातात, काहींचे पठण होते, तर काही भाग गद्यरूपातही सादर होतो. हिम्स, साम्स व कँटिकल्स ही चर्चसंगीतातील ठळक गीते आहेत.
देवता, संत यांच्या स्तुतीप्रीत्यर्थ असलेले गीत म्हणजे ‘हिम’! प्रॉटेस्टंट पंथीयांत बायबलमधून न घेतलेल्या हिम्सचे समूहगान होते. हिमची धुन म्हणजे कोरेल. आरंभी हिम्सचे गद्य पठण होई. पुढे प्लेनसाँगच्या धाटणीने त्यांचे गायन होऊ लागले. १६ व्या शतकापासून हिम्सच्या बहुआवाजी रचनांमध्ये बरेच नावीन्य निर्माण होऊ लागले. लायनिंग आउट (अमेरिकेत ‘डेकनिंग’) या प्रकारात धर्मोपदेशक हिमची प्रत्येक ओळ प्रथम वाचतो व मग जमाव ती गातो. पूर्वी जमावास अक्षरओळख नसल्याने ही प्रथा सुरू झाली आणि मग तिला पवित्र मानून तिची रूढी बनली! जिथे लायनिंग आउट नसेल, तिथे ऑर्गनवादक प्रत्येक चरणाच्या अखेरीस मुक्त वादन करतो. वाद्यांच्या साथीने गायला जाणारा हिम्सचा प्रकार म्हणजे साम. साम्सच्या रचना बऱ्याचदा वृत्त, यमकादी बंधनातून मुक्त असल्याने त्यांचे संगीतही मुक्त-लय व सुरावटींचे वैविध्य राखणारे असते. हिम व साम यांच्या छंदोबद्ध चालींना ‘सामोडी’ म्हणतात. हिम्सच्या काही सुरावटींवरून बाखसारख्या संगीतकारांनी स्वतंत्र रचनाही बांधल्या.
कँटिकल म्हणजे बायबल वा तत्सम धर्मग्रंथातून निवडलेला, सामखेरीज कोणताही अन्य गेय अंश. रोमन व अँग्लिकन पंथात कँटिकल हे सामसारखेच आहेत. मात्र ‘बुक ऑफ साम्स’मध्ये समाविष्ट नसलेल्या अन्य प्रार्थनागीतांना ‘कँटिकल’ असे म्हणतात. एकेकाळी चर्चमध्ये पूर्ण जमाव एकत्र झाल्यावर जो पहिला साम गायला जाई त्यास ‘गॅदरिंग साम’ म्हणू लागले. आज याची जागा ऑर्गनवर वाजवल्या जाणाऱ्या ‘ओपनिंग व्हॉलंटरी’ने घेतली आहे.
‘चँट’ ही उपासनागीते एकस्वनी व मुक्त-लय असतात. परंतु ‘चँटिंग’ हा शब्द विशेषकरून रोमन कॅथलिक व अँग्लिकन चर्चच्या दैनंदिन उपासनेतील साम व कँटिकलचे गायन या अर्थाने वापरतात. ग्रेगरीयन चँट हा रोमन कॅथलिक उपासनेत अनिवार्यपणे गायल्या जाणाऱ्या चँट्सचा समूह. पोप पहिला ग्रेगरीला यांच्या रचनेचे श्रेय दिले जाते. युरोपमधील गायकवृंदांनी केलेले यांचे बहुस्वनी आविष्कार केवळ स्तिमित करणारे असतात. मिलानचा बिशप अॅम्ब्रोज (३४०-३९७) याने रचलेल्या ‘अॅम्ब्रोजिअन चँट’ही प्रसिद्ध आहेत. अँग्लिकन चर्चमधील साम्स व कँटिकल्सच्या गायनासाठी वापरल्या जाणाऱ्या सोप्या धुनांना ‘अँग्लिकन चँट’ म्हणतात. मुळात चर्चसंगीताचा भाग नसलेला व लौकिक संगीतातून घेतलेल्या कँटाटा प्रकारच्या रचनांना ‘चर्च कँटाटा’ म्हणतात. या विशेषत: संस्कारविधींत वापरतात.
चर्चसंगीतात डॉक्सॉलजी (ईश्वराच्या दिव्यत्वाचे स्तुतिगान), बेनेडिक्शन (नित्योपासनेच्या अखेरी खासकरून व्हेस्पर्स या सायंप्रार्थनेत समूहास उद्देशून धर्मोपदेशकाने म्हटलेली आशीर्वचने), इनकँटेशन (गूढविधींत आत्म्यांस आवाहन करणे, तुर्यावस्था निर्माण करणे, जादुई परिणाम करणे अशा उद्देशाने केलेले स्वरयुक्त उच्चारण), आन्थेम (बायबल वा अन्य धर्मग्रंथांतील ईशस्तुतिपर कवनांचे समूहगीत, विशेषत: प्रोटेस्टंट पंथीय), अॅक्लमेशन (संत इ.चे अभिवादनगीत), रेक्वियम (मृतांस समर्पित मासमधील गीत), इव्हनसाँग (अँग्लिकन चर्चमधील सायंप्रार्थना गीत), रोझरी (जपमाळ ओढत धार्मिक वचनांचे सस्वर पठण), आरीया दा चिएजा (वाद्यमेळासह प्रस्तुत चर्च-आरिया), इ. अनेक प्रार्थनाप्रकार आहेत. या साऱ्यांचे काही खास असे सांगीतिक स्थान आहे. कॅरल्स म्हणजे नाताळची गाणी हा ख्रिस्ती धर्मसंगीतातील सर्वज्ञात गीतप्रकार. आलेलुईया (मूळ शब्द ‘हालेलुया’= ‘देवाचा जयजयकार’) या शब्दाचा समावेश असलेल्या गीतरचनाही ख्रिसमसला गायल्या जातात.
चर्चमधील संगीतकारांची मोठी परंपरा आहे. गायकवृंदास स्कोला, कॉयर, कोरस असे म्हणतात. तर एकटय़ाने प्रार्थना गाण्यासाठी चर्चने नियुक्त केलेल्या गायकास ‘कँटर’ म्हणतात. कॅथ्रेडलमधील वेदीनजीकच्या ‘चान्सेल’ या चौथऱ्यावर गायकवृंद स्थानापन्न असतो. (या ‘चान्सेल’वरूनच ‘चान्सेलर’ शब्द आलाय!) ‘प्रेसेंटर’ हा मुख्य प्रार्थनागायक ‘कँटरिस’ या चौथऱ्यावर उभा राहून प्रार्थनागीतांचे गायन करतो. अँग्लिकन चर्चमध्ये डेकनी व कँटोरिस असे दोन गायकवृंद असतात. डेकनी हा वेदीच्या उजव्या बाजूस असलेल्या डीनच्या चौथऱ्याशेजारी असतो, तर कँटोरिस हा कँटरच्या शेजारी, डाव्या बाजूला असतो. चँटचे इन्सिपिट (आरंभ वाक्य) व व्हर्स (पुढील काव्यांश) हे विभाग दोन कँटर्स एकेकटे गातात. ‘पॅरिश क्लर्क’ हे चर्चचे नियुक्त अधिकारी. सामूहिक प्रार्थनांत जमावाचे नेतृत्व करणे, तसेच प्रवचनांत जमावाच्या प्रतिसादात ‘आमेन’चा मोठय़ाने गजर करणे, इ. कामे या अधिकाऱ्याकडे सोपवलेली असतात.
चर्चमधील गायकवृंदाचे आळीपाळीने होणारे गायन म्हणजे ‘अँटिफोनल सिंगिंग’! दोन वा अधिक गायकसमूहांनी विपर्यायी रीतीने गाण्यासाठी रचलेल्या संगीतासाठीही हा शब्द वापरला जातो. चर्चसंगीतात एकल गायन व कँटर्सचे सहगान यांइतकेच महत्त्व जमावाच्या गायनालाही असते. उपदेशकाने पूजाविधीत केलेल्या प्रार्थना, याचना यांना जमाव आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गायकवृंदाने प्रतिसादी गायन (रिस्पाँस) करण्याचा प्रघात असतो. हा प्रतिसाद कधी ‘आमेन’सारख्या एखाद्या शब्दातून असतो, तर कधी गीताच्या पूर्ण चरणाच्या पुनरुक्तीतून केला जातो. पूर्णत: प्रतिसादी प्रार्थनांना ‘प्रिसेस’ म्हणतात.
चर्चसंगीताच्या या परीटघडीच्या आविष्कारांपेक्षा खूपच वेगळे असणारे नमुनेही आहेत. गुलामगिरीविरोधी चळवळीच्या पृष्ठभूमीवर ‘पेंटेकोस्टालिस्ट’ पंथीय अमेरिकन आफ्रिकींचे ‘गॉस्पेल’ गायन त्यातील वेदनामय आक्रंदन, उसासे, पॉप म्युझिकसारखा उच्चरवाचा वाद्यमेळ अशा बाबींमुळे खूपच वेगळे ठरते. ‘रस्तफारीअन’ या जमेकन उगमाच्या, आफ्रिकी ख्रिस्तींच्या पंथाच्या तर तीन मुख्य खुणा मानतात. केसांच्या जटा, गांजाचे सेवन आणि ‘रेग्गाय’ हे काहीसे कर्णकटू वाटावे असे अत्यंत जोरकस, तालप्रधान आकर्षक संगीत! ब्लूज, जाझ अशा अमेरिकन संगीतशैलींच्या मुळाशी असलेल्या ‘स्पिरिच्युअल्स’ या संगीताविष्काराचाही आफ्रिकी ख्रिस्ती संगीताशी गहिरा संबंध आहे.
इस्लाम जसा विविध भूभागांत प्रसारित झाला, तसा स्थानिक संगीताच्या ढंगाने रंगलेले प्रांतीय इस्लामी संगीत बनत गेले. हीच बाब ख्रिस्ती चर्चसंगीताबद्दलही म्हणता येईल. युरोपपेक्षा आफ्रिका, आशियातील चर्चसंगीत निराळे आहे. एक मात्र नक्की की, चर्चसंगीताचा स्वत:चा खास ठसा सर्वत्र राहिला आहे.
सांस्कृतिक आणि सांगीतिकदृष्टय़ाही बहुरंगी असलेल्या भारतासारख्या देशात चर्चसंगीत आले तेव्हा काय घडले, ते पुढल्या लेखात पाहू!
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)
The post अंतर्नाद: बहुपदरी चर्चसंगीत appeared first on Loksatta.