अंतर्नाद : पारसी संगीतडॉ. चैतन्य कुंटे
आज पतेती. उद्या नवरोज. यानिमित्ताने पारसी धर्मसंगीताचे आख्यान.. होय महाराजा!

Advertisement

इराणमधील जरथुश्त्र हा धर्मवेत्ता इसवी सनपूर्व १५००च्या काळात होऊन गेला. ‘जरथुश्त्र’चा अर्थ पवित्र हृदयाचा, तेजस्वी, गायीगुरांचा थोर त्राता. अहुर मज्दा देवाची उपासना करणाऱ्या मज्दायस्नी कुटुंबात जन्मलेल्या जरथुश्त्राने आधी जो बहुदैवत धर्म होता, तो एकेश्वरी केला व त्यास ‘जरथुश्त्री’ वा ‘झोरोअ‍ॅस्ट्रिअन’ धर्म म्हणतात.

जरथुश्त्री उपासक आतश म्हणजे ज्योत, प्रकाशस्रोतापुढे प्रार्थना करतात. अग्नी हे अहुर मज्दाच्या उपासनेचे एक साधन आहे. ‘मैन्यू अथ्रा’ म्हणजे आत्मिक शक्ती, ईश्वरी निर्मितीचे प्रतीक म्हणून अग्नीची उपासना होते. ही ज्योत ‘अशा’ म्हणजे सात्त्विकता, न्याय, उदारता, अनुशासन या गुणांचेही प्रतीक आहे. जरथुश्त्रींत मूर्तिपूजा नाही.

Advertisement

जेंद अवेस्ता हा धर्मग्रंथ अवेस्ता या संस्कृतशी जवळीक असलेल्या इंडो-इराणी मूलभाषेत आहे. त्यात मंथ्र वा मथ्र म्हणजे श्लोकांचा गाथा हा विभाग आहे. हा प्रत्यक्ष ईश्वराशी जरथुश्त्राने साधलेला संवाद असून, त्यात सत्यान्वेषण, नैतिक व तात्त्विक आशय आहे. ही वचने अहुर मज्दा व जरथुश्त्राच्या मुखातील असल्याने मौखिक परंपरेत त्यांचे निष्ठेने जतन झाले.

इसवी सनपूर्व काळातील दुसरा दारियस या अखेमेनिड राजाच्या राजवटीत जरथुश्त्री हा साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. त्याचा प्रसार इराण, इजिप्तपासून ग्रीसपर्यंतच्या मोठय़ा भूभागात झाला. अलेक्झांडरच्या स्वारीमुळे हे साम्राज्य आणि जरथुश्त्री धर्मासही मोठा धक्का बसला. मात्र, पुढे पार्थियन सत्तेच्या काळात जरथुश्त्री धर्मास पुन्हा राजाश्रय लाभला. ससानी राजवंशाचा काल या धर्माच्या भरभराटीचा होता. इसवी सन ६५० च्या सुमारास ससानी राजसत्तेस अरब मुस्लिमांनी उखडून टाकले. तेव्हा हजारो जरथुश्त्री मारले गेले, बळाने मुस्लीम केले गेले. मुस्लीम आक्रमणांमुळे इराणमधील एक जरथुश्त्री समूह आपला जीव मुठीत धरून समुद्रमार्गे भारतात पोहोचला. तेव्हाची मोठी मनोज्ञ आख्यायिका ‘किस्सा-इ-संजाण’मध्ये आहे.

Advertisement

जरथुश्त्री लोकांच्या दस्तूर- म्हणजे पुरोहिताने राजा यादव राणाला आश्रयासाठी विनवले. राजाने उत्तरादाखल पूर्ण भरलेला दुधाचा प्याला पाठवला. अर्थ असा की, ‘येथे तुमच्यासाठी जागा नाही.’ दस्तूरने चिमूटभर साखर घालून तो प्याला राजाकडे पाठवला. ‘आम्ही तुमच्यात साखरेसारखे मिळून जाऊ..’ हा अर्थ. राजाने त्यांना स्वीकारले. मात्र, स्थानिक जीवनशैली अंगीकारणे व शस्त्रांचा वापर न करणे- या अटींवर. आपल्या शब्दाला जागून हे नवागत इथली भाषा, जीवनशैली स्वीकारून एतद्देशीय समाजाशी एकरूप झाले. मात्र, आपला मूळचा धर्म त्यांनी टिकवला- अर्थात अनाक्रमकपणे.

पारसदेशातून म्हणजे पर्शियातून आलेले म्हणून हे लोक ‘पारसी’! गुजरातेतील दीव, उदवाडा, संजाण, सुरत, नवसारी इ. भागांत त्यांनी प्रथम वस्ती केली. भारतात रुजू पाहणाऱ्या पारसी समाजाकडे शस्त्रबळ नसले तरी बुद्धी, उद्यमशीलतेच्या बळावर अल्पावधीत हा समाज स्थिरावला. १९-२० व्या शतकात अत्यंत धनिकवर्ग म्हणून त्याचा लौकिक झाला. भारतातील पारसी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आणि प्रार्थनागृहेही मुंबईत आहेत.

Advertisement

या पारसी समूहाखेरीज थोडय़ा वेगळ्या चालीरीती पाळणारा इराणी जरथुश्त्री समाज इथे नंतर स्थायिक झाला. १८-१९ व्या शतकातही इराणमधील मुस्लिमांच्या आक्रमक धोरणामुळे जरथुश्त्री समाजातील अनेक कुटुंबे जगभरात आणि विशेषत: भारतात स्थलांतरित झाली. पारसी लोकांपेक्षा हे इराणी लोक वेगळे ठरतात ते मुख्यत: फारसी भाषा व जीवनशैलीमुळे. पारसी व इराणी यांत महत्त्वाचा फरक आहे पंचांगाचा. शहनशाही, कडमी आणि फसली वा बस्तनी अशा पर्शियन कालगणना आहेत. त्यांनुसार नववर्ष वेगवेगळ्या महिन्यांत सुरू होत असल्याने पतेती (पापक्षालन करण्याचा, वर्षांचा शेवटचा दिवस) व नवरोज (नववर्षांचा प्रथम दिन) हे उत्सव वेगवेगळ्या महिन्यांत ते साजरे करतात. फसलीनुसार पारसी ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान, कडमीनुसार भारतीय इराणी जुलैत, तर शहनशाहीप्रमाणे मूळचे इराणी मार्च महिन्यात नवरोज साजरा करतात.

बुद्धिमान, उद्यमशील, कनवाळूपणे सामाजिक कार्य करणाऱ्या पारशांची प्रतिमा अंतर्मुख, चटकन् इतरांत न मिसळणारे, काहीसे विक्षिप्त अशीही आहे. मात्र हे खरे की, आधुनिक भारताच्या घडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ज्ञान, शिक्षण, आरोग्य, व्यापार इ. क्षेत्रांतील अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या स्थापनेत पारशांचा थोर वाटा आहे. याची साक्ष टाटा, गोदरेज, भाभा, वाडिया, इ. सर्वपरिचित पारसी नावे देतात.

Advertisement

हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातही पारशांची भरीव कामगिरी आहे. १८७० साली कैखुश्रू नवरोजी काब्राजी यांनी मुंबईत स्थापन केलेली ‘गायन उत्तेजक मंडळी’ व तिच्या संगीतशाळेचे आधुनिक भारतीय संगीताच्या इतिहासात मोक्याचे स्थान आहे. याच संगीतशाळेत वि. ना. भातखंडे यांनी आरंभी संगीताचे धडे गिरवले. आधुनिक भारतीय संगीतशास्त्राच्या आरंभीच्या टप्प्यात बेहराम चिनॉय, फिरोझ फ्रामजी ही पारसी नावे मोलाची आहेत. गायक फिरोझ दस्तूर, जाल बालापोरीया, सरोदवादिका झरीन दारूवाला, तबलावादिका आबान मेस्त्री यांच्या उल्लेखातून हिंदुस्थानी कलासंगीतातील पारसी लोकांचे स्थान स्पष्ट होते.

१८५३ साली नौशेरवानजी दोराबजी अप्पाखत्यार यांचे पहिले पारशी संगीत नाटक मुंबईत सादर झाले. तेव्हा मुंबईत पारसी लोकांच्या व्हिक्टोरिया नाटक कंपनी, अल्फ्रेड नाटक कंपनी, बालीवाला नाटक कंपनी, तर कलकत्त्यात मादन नाटक कंपनी अशा नाटक मंडळ्या होत्या. पुढे भारतीय चित्रपटसृष्टीतही अनेक पारसी लोकांनी महत्त्वपूर्ण योगदान केले. ‘आलमआरा’ या पहिल्या भारतीय बोलपटाचे संगीत दिग्दर्शक पिरोजशा मेस्त्री आणि त्यांचे पुत्र केकी व केर्सी मेस्त्री, पहिल्या संगीत दिग्दर्शिका सरस्वतीदेवी, पिआनोवादक व्ही. बलसारा, गुडी सेरवाई, कावस लॉर्ड, केर्सी लॉर्ड, होमी मुल्ला यांनी चित्रपट संगीतात भरीव कामगिरी केली. पाश्चात्त्य संगीतप्रवीण झुबीन मेहता, फ्रेनी दलाल, गझल गायिका पिनाझ मसानी, पॉप गायिका अलीशा चिनॉय, रॉक गायक फ्रेडी मक्र्युरी, नर्तक आस्ताद देबू, शामक दावर ही नावेही कलाक्षेत्रात चमकली आहेत.

Advertisement

पारसी लोकांचे प्रार्थनाघर म्हणजे अग्यारी. अग्यारीतील केबला या गर्भगृहात अफ्रिगान हा अग्निकलश असतो व त्यात निरंतर तेवणारा पवित्र अग्नी असतो. आतश दादगाह म्हणजे घरातील अग्निकुंड, आतश आदरान म्हणजे अग्यारीतील अग्निकुंभ. आतश बेहराम हा अग्यारीचा विशेष प्रकार आहे. आतश बेहराममध्ये सोळा नैसर्गिक स्रोतांतून मिळालेल्या अग्नींचे एकत्रित रूप असते व त्याची विधिवत प्रतिष्ठापना केलेली असते. भारतात केवळ आठ आतश बेहराम आहेत. उदवाडा व नवसारीला प्रत्येकी एक, सुरतेस दोन, तर मुंबईत सर्वाधिक म्हणजे चार आतश बेहराम आहेत.

अग्यारीत दस्तूर (अवेस्ताचे ज्ञान असलेले वरिष्ठ पुरोहित), मोबेड (नित्यपूजेचा पुजारी), इर्वाद (कनिष्ठ पुरोहित), पंथकी (अग्यारीचा प्रमुख) असा पुरोहितवर्ग असतो. श्वासोच्छ्वास वा बोलण्यामुळे पवित्र अग्नीस बाधा येऊ नये म्हणून हे पुरोहित अग्नीसमोर आपले तोंड कापडाने झाकतात. मोठय़ाने बोलणे, गोंगाट करणे वा ध्वनिवर्धक वापरणे यांवर प्रतिबंध असतो. तेथे पुरोहिताच्या किणकिणणाऱ्या लहान घंटेखेरीज कोणतेही वाद्य वाजवत नाहीत. अग्यारीत, विशेषत: अंतर्गृहात अन्यधर्मीयांना प्रवेश पूर्णत: निषिद्ध असतो.

Advertisement

अग्यारीत उपासनेसाठी निश्चित केलेले दिवसाचे पाच विभाग म्हणजे गेह पाळले जातात. हावन (सूर्योदय ते साडेबारापर्यंत), रपीथ्वन् (दुपारी साडेबारा ते साडेतीन), उजीरन् (साडेतीन ते सूर्यास्त), ऐविस्रुथ्रेम (सायं. सात ते मध्यरात्र), उशाहेन् (मध्यरात्र ते सूर्योदय) या पाच गेहच्या आरंभी व अंती विशिष्ट प्रार्थना म्हणतात. आफ्रिनगान विधीत देवतांना आवाहन केले जाते. अग्नीस सुखाद (चंदन), उद अर्पण करतात. रोज कस्तीबंधन विधीनंतर फरझ्यात प्रार्थना करतात; ज्यात सरोश बाज व गेहनुसार श्लोकांचे पठण होते. रोज रात्री निजण्यापूर्वी सरोश यश्त म्हणतात.

दैनंदिन प्रार्थनेशिवाय ‘झरथोस्तनो दिसो’ (जरथुश्त्र पुण्यतिथी), मुक्ताद वा फर्वरदेगन अशा नैमित्तिक प्रार्थना असतात. शिवाय नवरोज, पतेती, खोरदाद साल (जरथुश्त्र जयंती) असे वार्षिक उत्सव खास प्रार्थनांनी साजरे होतात. जन्म, वाढदिवस इ. शुभदिनी ‘यजसनी’ हा विधी करतात. नवजोत हा विधी उपनयनासारखा असतो. अग्निसमक्ष मंत्रोच्चार करून मुलामुलींना ‘सदरा’ व ‘कस्ती’ (कमरेभोवती गुंडाळण्याचा लोकरी धागा) घालून दीक्षा देतात. तेव्हापासून दर दिवशी कस्ती बांधताना मनश्नी, गवश्नी व कुनश्नी (सद्विचार, सत्कृत्य, सद्वचन) या त्रिसूत्रीचे स्मरण, आचरण केले जाते.

Advertisement

हमबंदगी ही सामूहिक, तर जशन ही वैयक्तिक प्रार्थना आहे. ‘सद-ओ-यक नाम-इ-खोदा वा बाझ’ ही अहुर मज्दाच्या १०१ नावांची नामावली असून, तिचा जप विशेष फलदायक मानतात. सरोश बाझ ही बेहराम बावा या संरक्षक देवदूताची प्रार्थना असते. माची म्हणजे इच्छापूर्तीनंतर वा संकटनिरसनाच्या वेळी, तसेच मृतांच्या स्मृतीखातर केलेली विशेष प्रार्थना असते. आरोग्यासाठी तंदुरुस्ती प्रार्थना, तर मृतात्म्यांसाठी मुक्ताद म्हणतात.

अग्यारीत केवळ मोबेड, दस्तुर हे पुरोहितच प्रार्थनेचा उच्चार करतात. अन्य उपासक मूक असतात. केंद्रस्थानी पूजाग्नी असल्याने हवेच्या व आवाजाच्या झोतापासून त्यास बाधा न यावी म्हणून पुरोहित मंद्र व मंद ध्वनीत प्रार्थना म्हणतात. विधींतील विशिष्ट भागाचा आरंभ वा समापन सूचित करण्यासाठी पुरोहिताने केलेला घंटानाद हाही एक सांगीत घटक जरथुश्त्री धर्मसंगीतात आढळतो.

Advertisement

पारसी पठणात्मक प्रार्थना चार-पाच स्वरांच्या सुबक साच्यात असतात. त्या विनाताल, संथ लयीत, गंभीरपणे उच्चारल्या जातात. बव्हंशी चालींत बिलावल आणि भैरवी थाटातील स्वर असतात. एकंदरीत पाहता या पठणाचे वैदिक ऋचा, मंत्रोच्चारांशी खूपच साम्य वाटते. अवेस्ता व वैदिक संस्कृत यांतील प्राचीनतम संबंध लक्षात घेता तसे असणे स्वाभाविकच आहे. अवेस्तामधील मंत्र, गाथा यांच्या पठणात मूळचे प्राचीन जरथुश्त्री स्वरसमूह आहेत. त्यांत हजारो वर्षांत फरक झालेला नाही असे मानतात. परंतु नादेरी प्रार्थनांत, मनोजातच्या धुनांत लोकधुना, अन्य सुरावटीही येत गेल्या आणि हे संगीत कालानुरूप बदलत गेले.

धार्मिक समारंभांत, नवजोतसारख्या विशेष प्रसंगी अग्यारीच्या अंगणात वा घरांत आकर्षक चालींची तालबद्ध अशी मनोजात ही भक्तिगीते, उत्सवगीते गातात. मनोजात आणि पारसी विवाहगीतांत एकेकाळी गुजराती भजनाच्या चाली होत्या, तर ब्रिटिशकाळात त्यांत पाश्चात्त्य झाक आली. १९६० नंतरच्या काळात त्यांच्यावर हिंदी चित्रपटगीतांचा प्रभाव स्पष्ट दिसतो आणि १९९० नंतर पॉप म्युझिकचा असर जाणवतो.

Advertisement

गुजराती प्रभावामुळे पारसी समाजात उत्सवप्रसंगी ‘ददार अहुर मज्दानो गरबो’सारखी गरबागीते गायली जातात. पन्नासेक वर्षांपूर्वी व्ही. बलसारा, धनवाझ इंदूरवाला यांनी मनोजात, गरबागीतांच्या पारंपरिक रचनांचे संकलन करून त्या ध्वनिमुद्रित केल्या. मात्र, आज असे बरेचसे पारसी संगीत विस्मृत आहे. अगदी ५०-६० वर्षांपूर्वी गोयन (गायिका) व पोसागीर (गायक) यांची पारसी भजनी मंडळे असत आणि ‘हमबंदगी’मध्ये त्यांना पाचारण करत. मुंबईत एकेकाळी मेहरबाई, रतनबाई गोयन, ‘सोराबजी चिकन’ ऊर्फ सोली बइलो असे नावाजलेले गोयन व पोसागीर होते. मृत्यूप्रसंगी ‘मराशिया’ ही शोकगीते गाणाऱ्या व्यावसायिक ‘छाजिया’ स्त्रियाही बोलावल्या जात. परंतु आज या प्रथा लोप पावल्या आहेत.

मराठी लावणीतील ‘कलगीतुरा’ हा तात्त्विक, धार्मिक गूढ आशय असलेला द्वंद्वगीताचा खास प्रकार आहे. याच प्रभावातून १९व्या शतकात पारसी लोकांतही कलगीतुरा होऊ लागला. त्यावर मुस्लीम कव्वालीचाही प्रभाव होता. ‘बेतबाजी’ या फारसी काव्यप्रकारावर बेतलेल्या कलगीतुऱ्याच्या रचना गुजराती भाषेत, पण मराठी ढंगाच्या चालीत रचल्या गेल्या. विशेष म्हणजे कलगीतुऱ्याच्या रचनांना ‘ख्याल’ ही संज्ञा होती! आरंभी दोन ओळींची ‘साखी’ विनाताल गायची आणि मग चटकन् ठेका धरायला लावणारा आकर्षक, उडत्या चालीतील ख्याल गायला जायचा. अर्धवर्तुळात बसून दोन्ही पक्षांचे कलाकार डफ, चंग, तुणतुणे, घुंगरू यांच्या साथीने पेशकश करीत. रात्रभर कलगीतुऱ्याची ‘दंगल’ चाले. कलगीतुरा पेश करणारे पारसी मुख्यत्वे कुस्तीगीर वा सैन्यदलातले असत. कलगीतुऱ्याच्या दंगलीत क्वचित मुस्लीम कव्वालही सामील होत.

Advertisement

मात्र, एका प्रसंगानंतर पारसी कलगीतुरा पूर्णत: नष्ट झाला. झाले असे की, १९ व्या शतकाच्या मध्यकालात मुंबईतील प्रसिद्ध अशा वाडियाजी आतश बेहराम या अग्यारीच्या स्थापनादिनी कलगीतुऱ्याची दंगल झाली. तेव्हा पारसी व मुस्लिमांत बेबनाव झाला. कलगीतुऱ्याच्या स्वरांच्या दंगलीचे पर्यावसान रक्तरंजित दंगलीत झाले! या प्रसंगानंतर पारसी समाजाने कलगीतुऱ्याचे नाव टाकले ते कायमचे. पारसी कलगीतुऱ्यातील ख्यालाची एकही रचना आज उदाहरण म्हणूनही शिल्लक नाही, हे केवढे दुर्दैव!

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल येथे संगीताचे अध्यापक आहेत.)

Advertisement

[email protected]

The post अंतर्नाद : पारसी संगीत appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement